Friday, 24 November 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 24.11.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 24 November 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २४ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यातल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयं आणि संलग्नित रुग्णालयांचं श्रेणीवर्धन करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून ५०० दशलक्ष डॉलर निधी मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या बँकेचे अधिकारी, मित्रा प्रतिष्ठान आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रालयासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमातल्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. आशियाई विकास बँकेकडून मिळालेला हा पाठिंबा नवा सशक्त महाराष्ट्र घडवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ देईल, असंही फडणवीस यांनी नमुद केलं आहे.

****

राज्यातल्या विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या आश्रम शाळेतल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात एक ते पाच तारखेपर्यंत नियमित वेतन अदा करण्याचे निर्देश इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर मुंबईत बैठक झाली, त्यावेळी सावे बोलत होते. 

****

परभणी इथं आज  विकसित भारत संकल्प यात्रेची केंद्रीय आरोग्य विभागाचे अप्पर सचिव कौस्तुभ आणि जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत  सुरुवात झाली. केंद्र, राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा लाभ समाजातल्या वंचित घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी या यात्रेची विशेष मोहीम सुरू आहे. विदर्भाच्या विविध भागांमध्येही ही यात्रा सुरू झाली आहे. पुणे, नाशिक, रायगड जिल्ह्यांमध्येही विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज यात्रेच्या प्रचार वाहनाला फीत कापून मार्गस्थ केलं. नाशिक इथं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं.

****

उत्तराखंडातल्या उत्तरकाशी जिल्ह्यातल्या सिल्क्याराच्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याची मोहिम युद्धपातळीवर सुरू आहे. आज बोगद्यामध्ये ८०० मिलीमीटर व्यासाची वाहिनी आणखी पुढं पोहचवण्याचं काम सुरू आहे. केंद्र सरकारचे माजी सल्लागार भास्कर खुल्बे यांनी आज दिलेल्या माहितीनुसार ही वाहिनी आता आणखी तीन मीटर पुढं सरकवण्यात आली आहे.

****

गडचिरोलीमधल्या सुरजागड लोहखाणीला समर्थन करत असल्याचा ठपका ठेवून नक्षलवाद्यांनी काल रात्री एटापल्ली तालुक्यातल्या टिटोडा गावचे पोलिस पाटील लालसू वेळदा यांची गोळी घालून हत्या केली. या घटनेमुळं या परिसरात दहशत पसरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. काल रात्री शेकडो नक्षलवादी टिटोडा गावात घुसले आणि त्यांनी वेळदा यांना गावाबाहेर नेऊन त्यांची हत्या केली. नक्षलवाद्यांनी घटनास्थळी टाकलेल्या पत्रकात सुरजागड लोहखाणीमुळं नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट होत असल्याचा आरोप केला आहे. गेल्या १५ नोव्हेंबरला भामरागड तालुक्यातल्या पेनगुंडा इथल्या दिनेश गावडे नामक युवकाचीही नक्षलवाद्यांनी हत्या केली होती.

****

नांदेड इथल्या नानक साई फाऊंडेशनची नववी संत नामदेव सद्भभावना घुमान यात्रा आजपासून  पंजाब दौऱ्यावर जात आहे. चार डिसेंबरपर्यंत ही यात्रा दिल्ली-चंदीगड-हरियाणा-हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधल्या विविध धार्मिक तसंच ऐतिहासिक स्थळांना भेटी देणार असून राज्यातल्या  १७ जिल्ह्यांतले २९८ भाविक या यात्रेत  सहभागी होत आहेत.

****

मथुरा रेल्वे स्थानकावर घेण्यात येणाऱ्या तांत्रिक कामामुळं काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार नांदेड-अमृतसर सचखंड जलद रेल्वे २१ जानेवारी ते चार फेब्रुवारी २०२४ दरम्यान, तर अमृतसर-नांदेड सचखंड गाडी २३ जानेवारी ते सहा फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आली आहे. नांदेड-जम्मू तावी हमसफर साप्ताहिक जलद रेल्वे २६ जानेवारी आणि दोन फेब्रुवारी दरम्यान रद्द झाली आहे. जम्मू तावी-नांदेड हमसफर साप्ताहिक २८ जानेवारी आणि चार फेब्रुवारी रोजी, नांदेड-हजरत निजामुदिन साप्ताहिक गाडी २३ आणि ३० जानेवारी रोजी तर हजरत निजामुदिन- नांदेड साप्ताहिक जलद रेल्वे येत्या २४ आणि ३१ जानेवारी रोजी रद्द करण्यात आली आहे. 

****

सायबर भामट्यांकडून वीजग्राहकांना बनावट संदेश पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळं ग्राहकांनी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या फसव्या संदेशाला प्रतिसाद देऊ नये, असं आवाहन छत्रपती संभाजी नगर महावितरणकडून करण्यात आलं आहे. या संदर्भात तक्रारी असल्यास १९१२, १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या खुल्या क्रमांकावर केंव्हाही संपर्क साधावा, असं महावितरणतर्फे कळवण्यात आलं आहे.

****

No comments: