आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२४ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यातल्या विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या आश्रम शाळेतल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात एक ते पाच तारखेपर्यंत नियमित वेतन अदा करण्याचे निर्देश इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर मुंबईत बैठक झाली, त्यावेळी सावे बोलत होते.
****
केंद्र, राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा लाभ समाजातल्या वंचित घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ची विशेष मोहीम सुरू आहे. या अंतर्गत आज परभणी आणि लातूर जिल्ह्यातल्या यात्रांचा प्रारंभ होत आहे.
****
नांदेड इथल्या नानक साई फाऊंडेशनची नववी संत नामदेव सद्भभावना घुमान यात्रा आजपासून पंजाब दौऱ्यावर जात आहे. चार डिसेंबरपर्यंत ही यात्रा दिल्ली-चंदीगड-हरियाणा-हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील विविध धार्मिक तसंच ऐतिहासिक स्थळांना भेटी देणार असून राज्याभरातल्या १७ जिल्ह्यातले २९८ भाविक या यात्रेत सहभागी होत आहेत.
****
मातंग आणि तत्स्तम जातीतल्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ व्हावा यासाठी नांदेड इथं आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मेळावा घेण्यात येत आहे. महामंडळाच्या विविध योजनांची माहिती या मेळाव्यात देण्यात येणार आहे.
****
कृषि विभागामार्फत रब्बी हंगामात अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांच्या राज्यांतर्गत पीक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबर पर्यंत तालुका कृषि अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावेत, असं आवाहन लातूरच्या कृषि विभागामार्फत करण्यात आलं आहे.
****
गोव्यात सुरु असलेल्या ५४ व्या इफ्फीचा मध्यावधी टप्पा आज पूर्ण होणार असून, त्यानिमित्त अबाऊट ड्राय ग्रासेस हा तुर्की चित्रपट दाखवण्यात येणार आहे. कान चित्रपट महोत्सवासह इतर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटानं आपला ठसा उमटवला आहे.
****
रेल्वेतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार नांदेड-अमृतसर सचखंड जलद रेल्वे २१ जानेवारी ते चार फेब्रुवारी २०२४ दरम्यान, तर अमृतसर-नांदेड सचखंड गाडी २३ जानेवारी ते सहा फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्य़ात आली आहे.
****
No comments:
Post a Comment