Monday, 27 November 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 26.11.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 27 November 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २७ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून सोडण्यात आलेलं पाणी आज पैठणच्या जायकवाडी धरणात पोहोचण्याची शक्यता आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यामार्फत १५ हजार ६५ घनफूट तर भंडारदरा धरणातून नऊ हजार ५३६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सध्या धरणात ३९ टक्के पाणी साठा असल्याचं छत्रपती संभाजीनगर इथल्या गोदावरी पाटबंधारे मराठवाडा विकास महामंडळाच्यावतीनं कळवण्यात आलं आहे.

                                    ****

सोलापूर जिल्ह्यातल्या हत्तूर गावात मडीवस्तीत घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानं बोळूरे कुटुंबातील चौघेजण जखमी झाले. आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास स्वयंपाक करत असताना ही दुर्घटना घडली. जखमींना तातडीनं सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.  
                                    ****
नाशिक जिल्ह्यात काल झालेल्या पावसादरम्यान, वीज कोसळल्यामुळं दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. निफाड तालुक्यात कसबे सुकेणे परिसरात गारपीटीमुळं द्राक्षबागांचंही मोठं नुकसान झालं आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी काल या ठिका
ची पाहणी करत तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे.

                                    **** 
शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केलं आहे
. 'गुरू नानकदेव यांनी गुरुभक्तीला सर्वश्रेष्ठ स्थान दि
लं. त्यांनी दिलेली प्रेम, सद्भावना आणि बंधुभाव ही शिकवण तसंच शांती आणि मानवतेचा संदेश आजही प्रेरणादायी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी शीख बांधवांना शुभेच्छा दिल्या आहे.
                                    ****
यंदाचा आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार आध्यात्मिक गुरू श्री. श्री. रविशंकर यांना प्रदान करण्यात आला
. काल झालेल्या दिव्याज् फाऊंडेशनच्यावतीनं आयोजित 'ग्लोबल पीस ऑनर' या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  २६/११ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी तसंच सैन्यातील कुटुंबियांचा योवळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
                                    ****

प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, प्राध्यापक डॉ. शंकर किसन बोऱ्हाडे यांचं काल नाशिक इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६२ वर्षांचे होते. मरणगाथा कवितासंग्रह, कडा आणि कंगोरे, उजेडा आधीचा काळोख, देशभक्त शेषराव घाटगे, विडीची गोष्ट, शोध डॉ. वसंतराव पवारांचा, लोकपरंपरेचे सिन्नर ही त्यांची काही पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
                                    ****
छत्रपती संभाजीनगर इथल्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या नवीन बोधचिन्हाचं अनावरण आणि संकेतस्थळा
च्या पुनर्प्रदर्शन कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं आहे. एमजीएम स्कुल ऑफ फिल्म आर्ट्स इथं संध्याकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

                                    ****
शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजां
चं ४२५ वं समाधी वर्ष तसंच एकनाथी भागवत ग्रंथाच्या साडे चारशेव्या जयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं अखंड हरिनाम सप्ताह आणि एकनाथी भागवत पारायण सोहळा सुरू आहे. या सोहळ्यात आज गजारूढ ग्रंथदिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. भागवत ग्रंथ डोक्यावर घेत शेकडो महिला, पुरुष भाविक या प्रदक्षिणेत भक्तिभावाने सहभागी झाले.
                                    ****

 

बीड जिल्ह्यातल्या श्री श्रेत्र कपिलधार इथं कार्तिक पोर्णिमेनिमित्त शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते काल शासकीय महापूजा संपन्न झाली. संत मन्मथ स्वामी महान संत होते, श्री क्षेत्र कपिलधार हे एक महत्त्वपूर्ण तीर्थस्थान असल्याचं केसरकर यांनी यावेळी आयोजित मेळाव्यात म्हटलं. अधिकाधिक तरुणांनी कौशल्य प्रशिक्षण घेण्याचं आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी केलं. शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये तिसऱ्या वर्गापासून कृषी हा विषय शिकवला जाईल असंही मुंडे यांनी यावेळी सांगितलं.   

                                    ****
छत्रपती संभाजीनगर शहरात आज दुपारी पावसाला सुरुवात झाली असून हिंगोली जिल्ह्यात काल रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. औंढा तालुक्यातल्या गोजेगाव शिवारात वीज कोसळल्यानं राजू जायभाये या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर सेनगाव, कळमनुरी, वसमत, औंढा तालुक्यांमध्ये पावसामुळं ज्वारी, तूर, हरभरा, गहू या पिकांचं मोठं नुकसान झालं. 

दरम्यान, परभणी जिल्ह्यात मध्यरात्रीपासून विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. यामुळं ऊस, ज्वारी, हळद पिकांना दिलासा मिळाला, मात्र हरभरा, तूर पिकांसह वेचानीला आलेला कापूस भिजल्यानं मोठं नुकसान झालं आहे.

                                    ****
जालना जिल्ह्यातल्या अंबड इथल्या मत्स्योदरी देवी मंदिरात काल त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी पेटवलेल्या दिव्यांमुळं मंदिर परिसर लख्ख प्रकाशानं उजाळून निघाला होता.

                                    ****

 

No comments: