Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 29 November 2023
Time : 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २९ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· विकसित भारत संकल्प यात्रा महापालिका क्षेत्रात दाखल; ४१८ स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचणार
· छत्रपती संभाजीनगर इथं यात्रेचं औपचारिक उद्घाटन;जालना जिल्ह्यात बदनापूर इथं यात्रेचं उत्स्फुर्त स्वागत
· राज्यात अवकाळी पावसामुळे अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्रावरील पिकं बाधित
· मराठवाड्यात पावसाशी निगडित घटनांत दोघांचा मृत्यू
आणि
· स्वच्छ-सुंदर बसस्थानक अभियानात हिंगोली आगाराचा विभागात प्रथम क्रमांक
सविस्तर बातम्या
केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं निघालेली विकसित भारत संकल्प यात्रा आता महानगरपालिका क्षेत्रात पोहोचली आहे. ही यात्रा राज्यातल्या एकूण ४१८ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या, दोन हजार ८४ ठिकाणी जाऊन विविध योजनांची माहिती नागरिकांना देणार आहे. या यात्रेच्या पहिल्या टप्यात मुंबई, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नागपूर, सोलापूर, नाशिक, वसई-विरार, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दहा महानगरपालिकांची निवड करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं काल विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली. शहरातल्या सिध्दार्थ उद्यानामध्ये फिरोज खान इब्राहीम, आशाबाई कंदे, सगुणा वाघ, शहेनाज शेख जावेद, संजय सरकटे आणि नसरीन सय्यद रफीक या लाभार्थ्यांच्या हस्ते या यात्रेचं औपचारिक उद्घाटन झालं. संजय सरकटे आणि नसरीन सय्यद रफीक यांनी आपले अनुभव या शब्दांत सांगितले.
या संकल्प यात्रा रथावर विद्यार्थांसाठी क्यू आर कोड आहेत, ते स्कॅन करून प्रश्नांची उत्तरं दिल्यावर बक्षीस देण्यात येणार आहे. ज्या ज्या ठिकाणी रथ फिरणार आहे, त्या त्या ठिकाणी नोंदणी शिबिर राहील, या शिबिरामध्ये पात्र नागरिक आपली नोंदणी करून योग्य त्या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
****
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या वरुडी आणि कडेगाव इथंही काल या यात्रेचं नागरिकांनी यात्रेचं उत्स्फुर्तपणे स्वागत केलं. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन अर्ज करण्यासाठीची पद्धत समजावून सांगण्यात आली. संकल्प रथातल्या एलसीडी स्क्रीनवर ग्रामस्थांना माहितीपटही दाखवण्यात आला.
पुणे, ठाणे, पालघर, सोलापूर, इथेही काल या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला गॅस योजनांची माहिती देण्यात आली.
****
उत्तराखंडमधल्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या सर्व कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी काल उत्तरकाशी इथं पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. गेल्या बारा तारखेपासून हे कामगार या बोगद्यात अडकले होते. बोगद्यातल्या पाईपद्वारे त्यांना अन्न, पाणी, प्राणवायू आणि इतर आवश्यक साहित्य पुरवण्यात येत होतं.
****
५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल गोव्यात समारोप झाला. यावर्षी पहिल्यांदा दिला जाणारा सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार पंचायत भाग दोन ला, तर विशेष परीक्षक पुरस्कार कांतारा चित्रपटला मिळाला. इंडलेस बॉर्डर या चित्रपटला सुवर्ण मयूर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मायकेल डग्लस यांचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
****
राज्यात अवकाळी पावसामुळे आजपर्यंत प्राप्त माहितीनुसार अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. यामध्ये जालना जिल्ह्यातल्या पाच हजार २७९ हेक्टर, बीड २१५ हेक्टर, हिंगोली १०० हेक्टर, परभणी एक हजार हेक्टर, तर नांदेड जिल्ह्यातल्या ५० हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत, आणि ३३ टक्क्यापेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे पाठवण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
****
नांदेड शहरात आज पहाटेपासून पाऊस सुरू आहे. कालही जिल्ह्यात नायगाव तालुक्यात गारपीट तर मुखेड तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. हदगाव तालुक्यात तलंग इथं नदी ओलांडताना त्र्यंबक चव्हाण हा तरूण वाहून गेला, काल त्याचा मृतदेह सापडला.
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या किनोळा गावात गारपीट झाली. विजांच्या कडकडाटासह सर्वत्र पाऊस झाल्याने गहू, हरभरा या पेरणी झालेल्या शेतामध्ये पाणी साचल्यानं, या पिकांचं मोठं नुकसान झालं.
धाराशिव शहर आणि परिसरात मध्यरात्री पाऊस झाला असून आज पहाटेपासून पावसाची रिमझिम सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
बीड जिल्ह्यात गेवराई, बीड, अंबाजोगाई, आष्टी, माजलगाव, आणि पाटोदा या सहा तालुक्यात कालही जोरदार पाऊस झाला. बीड तालुक्यातल्या पाली परिसरात झाडाखाली थाबंलेल्या शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.
परभणी जिल्ह्यात कालपासून ओढे, नाले तसंच पूर्णा, दुधना नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
छत्रपती संभाजीनगर तसंच हिंगोली जिल्ह्यात काल सकाळी सर्वत्र धुकं पसरलं होती. पावसामुळे तापमानात घट होऊन वातावरणात गारठा निर्माण झाला आहे.
दरम्यान, येत्या दोन दिवसात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.
****
रविवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातल्या पूर्णा सहकारी साखर कारखान्यातली साखरेची पोती पाण्याखाली आली. त्यामुळे जवळपास दोन कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं कारखाना प्रशासनाचं सांगितलं आहे.
****
पैठणच्या जायकवाडी धरणात २६ हजार ८२६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणातला एकूण पाणीसाठा सुमारे एक हजार सहाशे सहा दशलक्ष घनमीटर असून तो धरणाच्या एकूण क्षमतेच्या चाळीस टक्क्यांवर असल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे.
****
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियानात, हिंगोली आगारानं विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या अभियानाअंतर्गत राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय पथकाकडून दोन वेळा बसस्थानकातल्या स्वच्छतेसह प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांची आणि स्वच्छतेची तपासणी करण्यात आली होती.
****
गुवाहाटी इथं काल झालेल्या तिसऱ्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पाच गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतानं निर्धारित षटकात तीन बाद २२२ धावा केल्या. ॠतुराज गायकवाडनं ५७ चेंडूत १२३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या संघानं पाच गडी गमावत हे लक्ष्य साध्य केलं. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत दोन - एकनं आघाडीवर आहे.
****
राज्यात शासनातर्फे २०२३-२४ या वर्षात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, आणि खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, लातूर इथं होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज करंडक व्हॉलिबॉल स्पर्धा बुलडाणा इथं, आणि भाई नेरुरकर राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सांगली इथं होणार आहे. क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी काल मुंबईत ही माहिती दिली.
****
बीड जिल्ह्यात रस्ता अपघातात दोन जण ठार तर दोन जण जखमी झाले. बीड - अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी तालुक्यात पोखरी इथं काल सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला. मृतांमध्ये कार चालकासह एका महिलेचा समावेश आहे.
****
घरकुलासाठी पाच लाख रुपयांचं अनुदान द्यावं, अंगणवाडी सेविका, आशा, गटप्रवर्तक आणि शालेय पोषण आहार कामगारांना किमान वेतन द्यावं, या मागण्यांसाठी, जालना इथं काल सीटू आणि राज्य शेतमजूर युनियनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर इथंही काल अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांनी वेतनासह इतर मागण्यांसाठी आंदोलन केलं.
****
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हिंगोली इथं कार्यरत कंत्राटी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. मागील ३६ दिवसांपासून हा संप सुरू आहे. काल पावसाची रिपरिप सुरू असतानाही या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
छत्रपती संभाजीनगर इथंही काल कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. समान काल समान वेतनाचा नारा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
****
धाराशीव जिल्ह्याच्या उमरगा इथल्या रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठानचे महात्मा ज्योतिबा फुले स्मृती पुरस्कार काल जाहीर झाले. ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती कार्य गौरव पुरस्कार, तर विश्वनाथ महाजन यांना, महात्मा ज्योतिबा फुले जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचं वितरण येत्या अठ्ठावीस डिसेंबरला उमरगा इथं होणार आहे.
****
No comments:
Post a Comment