Saturday, 25 November 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.11.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 November 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनासाठी राष्ट्रपती येत्या एक डिसेंबरला नागपूर दौऱ्यावर

·      संकटांकडे सकारात्मकतेने पाहण्याची गरज लोकसभेच्या माजी अध्यक्ष पद्मभूषण सुमित्रा महाजन यांच्याकडून व्यक्त

·      छत्रपती संभाजीनगर इथं चौदाशे दिव्यांग नागरिकांना आवश्यक साहित्याचं वाटप

आणि

·      धनगर आरक्षणासाठी जालना इथं २० दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण, पालकमंत्र्यांच्या मध्यस्तीने मागे

****

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ७५ व्या वर्धापन दिन सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. १९४७ साली सुरू झालेल्या या संस्थेतून आत्तापर्यंत ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं आहे. येत्या १ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित या कार्यक्रमाला सुमारे तीन हजार माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. त्यापैकी ४ माजी विद्यार्थ्यांचा राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये ९७ वर्षीय डॉ. बी.जे. सुभेदार यांचा समावेश आहे, ते संस्थेच्या १९४७ च्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहेत. दरम्यान, हा कार्यक्रम पुढील १५ दिवस चालणार आहे. यापूर्वी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि शंकरदयाल शर्मा यांनीही या संस्थेच्या दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगामध्ये भारताची प्रतिमा उंचावली असून जगाला आपली ताकद दाखवून दिल्याचं केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी म्हटलं आहे. पुण्यात सिंम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या वतीनं आज 'आंतरराष्ट्रीय संबंध २०२३' ही परिषद घेण्यात आली, या परिषदेचे उद्घाटन एस.जयशंकर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब. मुजुमदार तसंच कुलगुरू डॉ. रामकृष्ण रमण उपस्थित होते. परराष्ट्रीय धोरण हे अनेक अनियंत्रित घटकांवर अवलंबून असतं आणि म्हणून आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील आपली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणत्याही देशाला कालबद्ध तसंच योजनाबद्ध असे आखीव धोरण ठरवणं शक्य नसतं तर परराष्ट्रीय धोरण परिणामकारक होण्यासाठी त्यात एकसूत्रता आणि लवचिकपणा हे दोन्ही गुण आवश्यक असतात असं ते यावेळी म्हणाले.

****

सध्याच्या अमृत काळातच जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर आणण्यासाठी व्यापारी वर्गाने भरीव योगदान देण्याचे आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी आज पुण्यात केलं आहे. पुणे मर्चंट्स चेंबरच्या आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना यावेळी गौरवण्यात आलं.

****

संकटांकडे सकारात्मकतेने पाहण्याची गरज लोकसभेच्या माजी अध्यक्ष पद्मभूषण सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केली आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं 'पद्मम फेस्टिवल' या मुलाखत वजा संवाद कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात त्या बोलत होत्या. सकारात्मक राजकारणाला आपण सदैव महत्त्व दिलं, त्यामुळेच सलग आठ वेळा निवडणुकीत विजय मिळवता आला, असं महाजन यांनी सांगितलं. हाती घेतलेल्या कार्यात प्रावीण्य मिळवा, इतरांचं ऐकण्याची सवय आणि क्षमता वाढवा, जेणेकरून अधिक ज्ञान आणि माहिती आपल्याला मिळते, असं महाजन यांनी सांगितलं.

****

 

वाचन सुलभता वाढवण्यासाठी अधिकाधिक पुस्तकांचं डिजिटायझेशन करावं अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली आहे. मुंबईचं सांस्कृतिक वैभव असलेल्या एशियाटिक सोसायटीचा २१९ वा वर्धापन दिवस राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. नवी पिढी वाचनापासून दूर जात आहे हा चुकीचा समज असून, डिजिटल माध्यमं आल्यामुळं नवी पिढी वाचन सुलभता शोधत आहे. ग्रंथ वाचन बंद झालेलं नाही तर वाचण्याची पद्धत बदलली आहे, याकडे राज्यपालांनी लक्ष वेधलं.

****

'विकसित भारत संकल्प यात्रा' आज गडचिरोली तालुक्यातील कोटगल इथं पोहचली. याप्रसंगी जिल्हाधिकारी संजय मीणा, तहसीलदार गणवीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, गटविकास अधिकारी साळवे उपस्थित होते. याप्रसंगी शालेय विद्यार्थिनीनी गोंडी नृत्य सादर केलं.

****

'विकसित भारत संकल्प यात्रे'अंतर्गत नांदेड तालुक्यातील नेरली इथं आज घरकुल लाभार्थ्यांसह पीएम किसान सन्मान योजनेतील शेतकऱ्यांचा संकल्प रथयात्रेदरम्यान सन्मान करण्यात आला यावेळी गावकऱ्यांनी संकल्प रथाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात घरकुल लाभार्थी होनाजी नामदेव रासे आणि संदीप सातोरे यांना घराची चावी देण्यात आली, तसंच पीएम किसान लाभार्थी शेख जिलानी शेख बाशा यांचा सत्कार करण्यात आला. गावातील गरोदर माता उजेपा शेख मयूर या गरोदर मातेची ओटी भरण्यात आली. नागरिकांनी या यात्रेअंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनी केलं आहे -

या यात्रेमध्ये छप्पन प्रकारच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजना प्रामुख्याने सगळ्या लाभार्थ्यांपर्यंत याची माहिती आणि जनजागृती होण्यासाठी ही यात्रा सुरू करण्यात आलेली आहे. सर्व नागरिकांना याद्‌वारे आवाहन करण्यात येते की, या विकसित भारत संकल्प यात्रा अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा. आणि केंद्र सरकराच्या ज्या काही योजना आहेत, याच्यामध्ये आपण पात्र ठरत असेल तर ऑन द स्पॉट सर्विसेस या अभियानाअंतर्गत आपल्याला मिळणार आहेत.

****

तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी नांदेड मार्गे हेलिकॉप्टरने बोधन इथं प्रचार सभेसाठी रवाना झाले. दिल्लीहून विशेष विमानाने राहुल गांधी नांदेड विमानतळावर पोहोचले असता, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांचं स्वागत केलं.

****

गोव्यात सुरु असलेल्या, ईफ्फी या ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या वर्षीच्या प्रतिष्ठित ICFT-UNESCO गांधी पदकासाठी दहा चित्रपट स्पर्धेत आहेत. या दहा चित्रपटांमध्ये, राकेश चतुर्वेदी ओम यांचा 'मंडली', विष्णू शशी शंकर यांचा 'मलिकापुरम' आणि सयंतन घोसन यांचा 'रवींद्र काव्य रहस्य' या तीन भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. येत्या २८ नोव्हेंबरला इफ्फीच्या समारोप समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आज दिव्यांग सामाजिक अधिकारता शिबिरात चौदाशे दिव्यांग नागरिकांना विविध प्रकारच्या साहित्याचं वाटप करण्यात आलं. यामध्ये तीन चाकी सायकल, चाकाची खुर्ची, श्रवण यंत्र, काठी, स्मार्ट फोन आदी साहित्याचा समावेश आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यांनी केले. केंद्र शासनाने दिव्यांगांच्या विकासासाठी अनेक योजना प्रभावीपणे राबवून दिव्यांगाना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं महत्त्वपूर्ण काम केल्याचं भौमिक यांनी सांगितलं, तर केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून दिव्यांग नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन डॉ कराड यांनी यावेळी केलं.

****

धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या जामखेड इथं गत २० दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आज रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, पालकमंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. धनगर समाजाच्या मागण्यांबाबत सरकार लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. या विनंतीला मान देऊन उपोषणकर्त्यांनी मंत्री सावे यांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण मागे घेतलं.

****

अंबाजोगाई इथं तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहास आजपासून प्रारंभ होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांचे हस्ते या समारोहाचं उद्घाटन होणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना या महोत्सवात पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

****

लातूर जिल्ह्यात सन २०२३-२४ या वर्षात आंबिया बहारमध्ये डाळिंब आणि आंबा या पिकासाठी पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना अधिसूचित तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळामध्ये लागू करण्यात आली आहे. ही योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेध प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रात नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशीलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देणार आहे. लातूर जिल्ह्यात ही योजना एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स या विमा कंपनी मार्फत कार्यान्वित केली जात आहे.

****

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात कापेवंचा इथं पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी काल रात्री एका युवकाची गोळी झाडून हत्या केली. रामजी आत्राम असं मृत युवकाचं नाव आहे. मागील दहा दिवसांत नक्षल्यांनी केलेली ही तिसरी हत्या असून, या घटनेमुळं परिसरात दहशत पसरली आहे.

****

No comments: