Thursday, 23 November 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.11.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 November 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      आरक्षणासह राज्यातले विविध प्रश्‍न सोडवण्यात येतील - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन

·      म्हाडाच्या विभागीय मंडळांना रिक्त सदनिका विक्रीसाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे निर्देश

·      बीड, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांत विकसित भारत संकल्प यात्रेचं उत्साहात स्वागत

आणि

·      भाषा हा राष्ट्र आणि समाजाचा आत्मा - राज्यपाल रमेश बैस

****

आरक्षणासह राज्यातले विविध प्रश्‍न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते कार्तिकवारीनिमित्त पंढरपूर, सोलापूर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या जनतेला दिलेल्या आश्‍वासनाची पुर्तता करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. त्यावर कोणी शंका घेण्याचं कारण नाही. मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यावर आपला भर राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. विविध समाजाच्या आरक्षणाचा विषय सध्या सुरू आहे. मराठा, धनगर समाजाची आंदोलनं, मोर्चे, मेळावे सुरू आहेत. न्याय मागण्या मांडणं योग्य आहे, मात्र समाजा समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करणं किंवा एक समाज दुसऱ्या समाजाच्या विरोधात उभा ठाकणं हे अयोग्य असल्याचं फडणवीस म्हणाले. आंदोलकांनी आपल्या पुजेला दर्शवलेला विरोध सोडून पूजा करण्यासाठी परवानगी दिली याबद्दल त्यांनी आभार मानले. राज्यातली शांतता आणि सुव्यवस्था बिघडू नये यांची काळजी सर्वांनीच घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.

****

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण - म्हाडाच्या विभागीय मंडळांनी रिक्त सदनिका विक्रीसाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश मंडळाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. या निर्णयामुळं गेल्या सुमारे १० वर्षांपासून विक्रिअभावी रिक्त सदनिकांच्या विक्रीचा मार्ग खुला झाला असल्याचं त्यांनी नमुद केलं आहे. या माध्यमातून म्हाडाचा अनेक वर्षांपासून अडकलेला निधी मोकळा होण्यास मदत होईल तसंच उपलब्ध होणाऱ्या निधीमुळं म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांना अधिक गती मिळणार असल्याचं जयस्वाल यांनी म्हटलं आहे. या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीनं सुचवलेल्या शिफारशींनुसार एक धोरण निश्चित करण्यात आलं आहे. यामध्ये पाच पर्यायांचा समावेश आहे. म्हाडानं घेतलेल्या आढाव्यानुसार प्राधिकरणातल्या विविध विभागीय मंडळांतल्या ११,१८४ सदनिकांची विक्री झालेली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

****

उत्तराखंडमधल्या निर्माणाधीन सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठीचं बचाव कार्य हे अंतिम टप्प्यात आलं आहे. कामगारांपर्यंत पोहचण्यासाठी आता केवळ दहा मीटर खोदकाम बाकी आहे. या बोगद्यात १२ नोव्हेंबर पासून ४१ कामगार अडकलेले असून या कामगारांना आज सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात येण्याची शक्यता आहे.

****

खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे वगळता राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर खासदारांना अपात्र करण्याची याचिका अजित पवार गटानं लोकसभा सभापती आणि राज्यसभेच्या अध्यक्षांकडे दाखल केली आहे. वंदना चव्हाण, फौजिया खान, श्रीनिवास पाटील, फैजल मोहम्मद यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी यात करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना अपात्र करा अशी मागणी, शरद पवार गटानं यापूर्वीच राज्यसभेच्या अध्यक्षांकडे केली आहे.

****

बीड जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला आज सुरुवात झाली. जिल्ह्यातल्या अकरा तालुक्यांत या अंतर्गत पुढचे ६० दिवस नऊ चित्ररथांमार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी या अभियानाचं उदघाटन केलं. याचा लाभ जिल्ह्यातल्या वंचित घटकानं उचलावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही विकसित भारत संकल्प यात्रेचं आज मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. थेट गावात योजनेची माहिती मिळत असल्यानं ग्रामस्थांनी या यात्रेचं जोरदार स्वागत केलं आहे. तेरा संकल्प रथाच्या माध्यमातून विविध योजनांची यामध्ये माहिती दिली जात आहे. नांदेड तालुक्यात पासदगाव इथं विस्तार अधिकारी व्ही. बी. कांबळे, ग्रामसेवक विलास वाघमारे यांनी ग्रामस्थांना योजनांची माहिती दिली तसंच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात आला. विविध योजनांसाठी लाभार्थ्यांचे अर्ज यावेळी भरून घेण्यात आले. भोकर तालुक्यात किनी, पाळज, बीलोली तालुक्यात तळणी, पाचपिंपळी यांसह जिल्ह्यातल्या २८ गावांमध्ये आज संकल्प रथाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली. धाराशिव जिल्ह्यात आंबेजवळगा इथं आज या अभियानाद्वारे जनजागृती करण्यात आली. तसंच या गावाला स्वच्छता अभियान अंतर्गत विशेष प्रमाणपत्र देऊन आदर्श गाव म्हणून सन्मानित करण्यात आलं. परभणी जिल्ह्यात उद्या विकसित भारत संकल्प यात्रेला प्रारंभ होणार आहे. केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव कौस्तुभ गिरी यावेळी उपस्थित राहणार आहेत. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यंत्रणांना दिल्या आहेत.

****

भाषा हा कोणत्याही राष्ट्राचा आणि समाजाचा आत्मा असतो आणि त्या माध्यमातून तो देश संवाद साधतो, आपल्या भावना व्यक्त करतो, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे आज मुंबईत मध्य आणि पश्चिम विभागांची संयुक्त प्रादेशिक राजभाषा परिषद घेण्यात आली, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. वर्ष २०४७ पर्यंत आपल्याला भाषिकदृष्ट्या समृद्ध व्हायचे आहे, अशी भावना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी यावेळी व्यक्त केली. राजभाषा हिंदीच्या प्रचार व प्रसारासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल केंद्र सरकारची विविध कार्यालये, शासकीय उपक्रम व बँका, नगर राजभाषा कार्यान्वयन समिती, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

****

शैक्षणिक आयुष्यात प्रत्येक विद्यार्थ्यानं अभ्यासासह वेगवेगळे तंत्रज्ञान, निरनिराळे खेळ, योग, व्यायाम आदींवरही भर देणं गरजेचं असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते आज मुंबईत भायखळा इथं शालेय विद्यार्थ्यांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठीच्या 'संकल्प संपूर्ण आरोग्य' मार्गदर्शन शिबिराचं उदघाटन करण्यात आलं, त्यावेळी केसरकर बोलत होते. शाळा व्यवस्थापनानंही मुलांच्या बौद्धीक विकासासह त्यांच्या शारीरिक विकासाकडेही लक्ष द्यायला हवं, असं ते म्हणाले.

****

कोल्हापूर जिल्ह्यात खासगी बस उलटून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातल्या तिघांचा आज मृत्यू झाला. गोव्याहून मुंबईला जाणारी ही बस आज भल्या पहाटे दोन वाजेच्या सुमारास पुईखडीजवळच्या वळणावर उलटल्यानं हा अपघात झाला. पणजीहून काल रात्री आठ वाजता मुंबईकडे निघालेल्या या शयनयान बसमध्ये २५ प्रवासी होते. कोल्हापूर महापालिकेचे अग्निशमन दल आणि करवीर पोलिसांनी अपघातस्थळी जाऊन बचावकार्य करताना जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात हलवलं.

****

लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात किल्लारी इथं शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळं जिल्ह्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी इशारा दिलेलं पायी दिंडी आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं कार्यकर्त्यांतर्फे कळवण्यात आलं आहे. सोयाबीनला किमान नऊ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन होतं.

****

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुर इथं पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग तीन तास रोखून धरला. कारखानदारांनी मागील हंगामातील १०० रुपये तत्काळ जाहीर करावेत, अशी आंदोलकांची मागणी होती.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. यात पाच सामने खेळवले जाणार असून पहिला सामना आज विशाखापट्टणम इथं संध्याकाळी सात वाजता खेळवला जाणार आहे. या मालिकेत कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. ऋतूराज गायकवाड पहिल्या तीन सामन्यांसाठी उपकर्णधार असेल. श्रेयस अय्यर चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी संघात दाखल होणार आहे. इशान किशन, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग या खेळाडुंचाही या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. या मालिकेतले उर्वरित सामने अनुक्रमे तिरुअनंतपुरम, गुवाहाटी, रायपूर आणि बंगळुरू इथं खेळवले जाणार आहेत.

****

संविधानातले आदर्श आणि तत्त्वं अधोरेखित करण्यासह त्यांच्याप्रती वचनबद्धता पुन्हा सुनिश्चित करण्याबरोबरच संविधानाच्या संस्थापकांच्या योगदानाचा सन्मान आणि स्मरण करण्याच्या उद्देशानं येत्या रविवारी म्हणजेच २६ तारखेला संविधान दिवस साजरा केला जाणार आहे. यामाध्यमातून भारतीय संविधानाचा स्वीकार केल्याच्या स्मृती जागवण्यात येणार असल्याचं संसदीय कामकाज मंत्रालयानं म्हटलं आहे. संविधान दिवस साजरा करताना, संसदीय कामकाज मंत्रालयानं सर्व नागरिकांना संविधान प्रश्नमंजुषा आणि उद्देशिकेच्या ऑनलाइन वाचनात सहभागी होण्याचं आवाहनही केलं आहे.

****

No comments: