Sunday, 26 November 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.11.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 November 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      २६/११ चा दहशतवादी हल्ल्याचा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी, मन की बात कार्यक्रमातून हुतात्म्यांना अभिवादन.

·      देशभरात सर्वत्र आज संविधान दिन साजरा, विविध ठिकाणी रॅलीचं आयोजन.

·      पैठणच्या जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर, मुकणे, कडवा या धरणांमधून पाणी सोडण्यास प्रारंभ.

आणि

·      हिंगोली इथं मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी एल्गार महामेळावा.

****

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे सातव्या भागात देशवासयांशी संवाद साधत होते.

26 नवंबर हम कभी भी भूल नहीं सकते हैं आज के ही दिन देश पर सबसे जघन्य आतंकी हमला हुआ था आतंकियों ने, मुंबई को, पूरे देश को, थर्रा कर रख दिया था लेकिन ये भारत का सामर्थ्य है कि हम उस हमले से उबरे और अब पूरे हौसले के साथ आतंक को कुचल भी रहे हैं मुंबई हमले में अपना जीवन गंवाने वाले सभी लोगों को मैं श्रद्धांजलि देता हूँ इस हमले में हमारे जो जांबांज वीरगति को प्राप्त हुए, देश आज उन्हें याद कर रहा है

 

जेव्हा देशातली जनता राष्ट्र उभारणीची जबाबदारी घेते, तेव्हा जगातली कोणतीही शक्ती त्या देशाला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.

आज संविधान दिवस असून याच दिवशी १९४९ मध्ये संविधान सभेनं भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. त्यामुळे हा दिवसही खूप महत्त्वाचा असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. नारी शक्ती वंदन कायदा, व्होकल फॉर लोकल, बुद्धिमत्ता, विविध कल्पना आणि नवोन्मेष, जलसुरक्षा, स्वच्छता मोहिम या विषयावरही पंतप्रधानांनी मन की बात मध्ये भाष्य केलं. उद्याच्या कार्तिकी पौर्णिमा आणि गुरुनानक देवजी यांचं प्रकाशपर्व यानिमित्त त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

****

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १५ वर्ष पूर्ण झाली.

राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह विविध मान्यवरांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातल्या पोलीस हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन शहीदांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने मुंबई पोलीस दलाची झालेली हानी कधीही भरून येणं शक्य नाही, राज्य सरकार सदैव या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटूंबियांसोबत असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

भारतीय लष्करानंही मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

देशभरात सर्वत्र आज संविधान दिन साजरा केला जात आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेनं भारतीय संविधानाचा स्वीकार केला होता आणि २६ जानेवारी १९५० पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात, संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं.

राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनात, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात देखील संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. महानगरपालिकेच्या मुख्यालयात संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रॅली काढण्यात आली.

हिंगोली जिल्ह्यातल्या हिवरा फाटा इथं, लातूर इथं संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली.

नांदेड इथंही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ज्ञानविकास शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान सन्मान रॅली काढण्यात आली.

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. जालना शहरातून काढण्यात आलेल्या संविधान रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.

****

पैठणच्या जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर, मुकणे, कडवा या धरणांमधून पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे. काल मध्यरात्री दारणा धरणातून विसर्ग करण्यास सुरुवात झाली होती. दारणा धरणातून आज दुपारी पाच हजार ६९६, गंगापूर धरणातून तीन हजार ६७१, मुकणे धरणातून अकराशे, तर कडवा धरणातून एक हजार ६२४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे.

****

हिंगोली इथं आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी एल्गार महामेळावा घेण्यात आला. मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्रे देण्यासाठी नेमलेली शिंदे समिती आणि मागील दोन महिन्यांत दिलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा, ज्या सवलती सारथीच्या माध्यमातून मिळतात, त्या ओबीसींनाही द्या, आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, या मागणीचा यावेळी पुनरुच्चार करण्यात आला. मराठा समाजाला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ओबीसींपेक्षा जास्त फायदा झाल्याचं छगन भुजबळ यावेळी म्हणाले. ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते.

ओबीसी आरक्षण परिषदेच्या वतीनं आज यवतमाळ इथं ओबीसी महामोर्चा काढण्यात आला. जातीनिहाय जनगणना करावी, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचं ओबीसीकरण करू नये आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

****

महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिविटी - एम पी डी ए कायदा बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके उत्पादक, वितरक आणि विक्रेते यांना लागू करण्याला, शेतकरी संघटनेनं विरोध केला आहे. या निर्णयावरुन शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. ते आज नांदेड इथं वार्ताहरांशी बोलत होते. या नव्या कायद्याविरोधात राज्यातल्या सुमारे ७० हजार कृषी सेवा केंद्रानी बेमुदत बंदचा इशारा दिला असल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.

****

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. आज झालेल्या अंतिम फेरीत चीनच्या जोडीनं सात्विक - चिराग जोडीचा १९-२१, २१-१८, १९-२१ असा पराभव केला.

****

भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असलेल्या पाच टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज तिरूवनंतपूरम इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत विशाखापट्टणम इथं झालेला पहिला सामना जिंकून भारतीय संघानं १-० अशी आघाडी घेतली आहे.

****

जालना शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या घाणेवाडी जलाशयाची आज जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पाहणी केली. पावसाअभावी यावर्षी तलावात अल्प पाणीसाठा असल्यानं उपलब्ध पाण्याचा अपव्यय टाळावा, तलाव परिसरातल्या दुरुस्तीची कामे तातडीनं करावी, तसंच रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या माध्यमातून तलावातल्या पाणी नुमन्यांची तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

****

लातूर इथं मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी राज्य शासनाकडून १७२ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया सुरु झाली असून, थोड्याच दिवसात कामाला सुरुवात होणार असल्याचं, क्रीडा आणि  युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितलं.

****

धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातल्या तऱ्हाडी गटात १६ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते आज झालं. शिरपूर तालुक्यातल्या अति दुर्गम भागातल्या आदिवासी गोरगरीब जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत सांस्कृतिक मंत्रालयाने मेळा मोमेंट्स छायाचित्र स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये पंढरपूर इथल्या राहुल गोडसे या छायाचित्रकाराने काढलेल्या, मंगळवेढा तालुक्यातल्या हुलजंती इथल्या बिरोबा यात्रेतल्या छायाचित्राची दखल घेण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गोडसे याचं कौतुक केलं आहे.

****

No comments: