Saturday, 25 November 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 25.11.2023 रोजीचे सकाळी : 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 25 November 2023

Time : 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २५ नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      विकसित भारत संकल्प यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद;छत्रपती संभाजीनगर इथं प्रचार रथ मार्गस्थ;लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही यात्रेला प्रारंभ

·      ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संवेदनशीलतेनं प्रयत्न करावेत-ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचं आवाहन

·      दुधाला प्रतिलीटर ३४ रुपये दर देण्याचा दूध दर समितीच्या निर्णयाविरोधात दूध संघ आणि दूध कंपन्यांचं आंदोलन

आणि

·      पैठणच्या जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याचे आदेश;नाशिकच्या दारणा धरणातून १०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू

 

सविस्तर बातम्या

विकसित भारत संकल्प यात्रेला सर्वत्र उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं या अभियानातल्या आठ रथांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत काल ग्रामीण भागासाठी मार्गस्थ करण्यात आलं. जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा औपचारिक प्रारंभ येत्या २८ तारखेला गंगापूर तालुक्यातल्या रांजणगाव शेणपुंजी इथून होणार असल्याची माहिती कराड यांनी दिली. ते म्हणाले,

Byte…

भारत हा एक विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प करून या रथयात्रेला २८ तारखेला सुरूवात केली जाईल. आणि सर्व जनतेला ग्रामीण आणि शहरी भागातील याचा लाभ होईल.

 

या यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातल्या लक्षित लोकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या यात्रेंतर्गत प्रत्येक व्हॅन दर दिवशी दोन ग्रामपंचायतींमध्ये फिरणार आहे. नागरिकांनी या यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असं आवाहन कराड यांनी केलं आहे.

लातूर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला काल सुरुवात झाली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी विविध योजनांची माहिती देणारे चित्ररथ रवाना केले. ही यात्रा २६ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात फिरणार आहे. शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांशी संवाद साधून त्यांचे अनुभव आणि सूचना जाणून घेणं हा या यात्रेचा मुळ उद्देश आहे.

हिंगोली जिल्ह्यातही बळसोंड इथून काल या यात्रेला सुरुवात झाली. केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव कौस्तुभ गिरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते फित कापून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यात पाच एलईडी चित्ररथाद्वारे दररोज दोन गावात विविध कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे, तसंच यात्रेदरम्यान विशेष कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करुन या मोहिमेच्या माध्यमातून वंचित घटकापर्यंत लाभ पोहोचवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिल्या आहेत.

परभणी इथं विकसित भारत संकल्प यात्रेला काल जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते सुरुवात झाली. निवासी जिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोंशिकर यावेळी उपस्थित होते.

****

राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल, असं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत राष्ट्रीय स्थावर मालमत्ता विकास परिषदेच्या एका प्रदर्शनाचं उद्‌घाटन केल्यानंतर बोलत होते. राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला परवडणारं घर मिळावं, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं त्यांनी नमूद केलं. नवीन धोरणासाठी विकासकांनी सूचना कराव्यात, त्यांचा नव्या धोरणात समावेश केला जाईल, असं सावे यांनी सांगितलं.

****

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संवेदनशीलतेनं प्रयत्न करण्याचं आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. ते काल पुण्यात ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या  राज्यस्तरीय प्रशिक्षण आणि कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायतराज, ग्राम स्वराज्य अभियान, आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

****

दुधाला ३४ रुपये दर देण्याचा सरकारच्या दूध दर समितीचा शासन आदेश राज्यातल्या दूध संघ आणि दूध कंपन्यांनी फेटाळला आहे. राज्यात काल २१ जिल्ह्यांमध्ये दूध संकलन केंद्रांवर या आदेशाची होळी करण्यात आली. समन्वयक डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वात काल अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले इथं आंदोलन करण्यात आलं.

****

उत्तराखंड मधल्या उत्तरकाशी इथल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तांत्रिक कारणामुळे काल संध्याकाळी बचाव कार्य थांबवण्यात आलं होतं. अडकलेल्या कामगारांची स्थिती, त्यांना पुरवलं जाणाऱ्या अन्न आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंसह, मदत आणि बचाव कार्याची स्थिती आणि सुरक्षेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालही माहिती घेतली.

****

समन्यायी पाणी वाटप तत्वानुसार गोदावरीच्या ऊर्ध्व खोर्यातल्या धरणांमधून पैठणच्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले आहेत. त्यानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून साडे आठ हजार दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यात काल रात्री नाशिकच्या दारणा धरणातून १०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, या जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन मराठवाडा पाणी जनआंदोलन समितीला आणि मराठवाडयाच्या जनतेला न्याय दिल्याबद्दल माजी मंत्री राजेश टोपे यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहे.

मराठा आरक्षणाचं कारण देत, पाणी सोडण्याचा निर्णय थांबवल्याचं कारण दिल्याबद्दल मराठा आंदोलकांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याचे निर्देश दिल्याचं, विभागाकडून सांगण्यात आलं.

****

जातनिहाय जनगणना केल्यास मराठा, ओबीसी, धनगर समाजासह सर्व समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सुटू शकतात, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात महागाई, शेतकऱ्याचे प्रश्न अत्यंत ज्वलंत असून, शेतकऱ्यांना काय मदत देणार ते सरकारनं सांगावं, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

****

मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात आपल्या नावाची दोन बनावट पत्रे तयार करण्यात आल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पोलिसांना दिली आहे. ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असतानाच्या काळातले कोरे लेटरपॅड तयार करून त्यावर बनावट पत्रं लिहिण्यात आल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या दोन्ही खोट्या पत्रांमध्ये आपली भूमिका आरक्षणाविरोधी भासवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे.

****

भारतीय रिजर्व्ह बँकेनं अभ्युदय सहकारी बँकेचा कारभार वर्षभरासाठी प्रशासकांच्या हाती सोपवला आहे. अभ्युदय बँकेच्या व्यवस्थापनातल्या त्रुटींमुळं बँकेनं हा निर्णय घेतला असला, तरी बँकेच्या व्यवहारांवर कुठलेही निर्बंध नाहीत, त्यामुळे बँकेचं कामकाज प्रशासकांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे सुरू राहील, असं रिजर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे.

****

प्रधानमंत्री आवास योजनेत जालना जिल्ह्यानं सहा हजार ६७० घरकुलांना मंजुरी देऊन शंभर टक्के उदिष्ट्य पूर्ण केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अध्यक्ष वर्षा मीना यांचा मुंबईत राज्य शासनातर्फे सत्कार करण्यात आला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून त्यांना गौरवण्यात आलं.

****

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून लातूर जिल्ह्यातल्या उदगीर आणि जळकोट तालुक्यातल्या सहा रस्ते विकास कामांचं भूमिपूजन काल मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं. या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातही उदगीर आणि जळकोट तालुक्याला जास्तीत जास्त निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं बनसोडे यांनी यावेळी सांगितलं.

****

१५ वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत धाराशिवच्या श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या संघाने मुलांच्या तसंच मुलींच्या गटाचं विजेतेपद पटकावलं आहे. काल जालना इथं या स्पर्धेचे अंतिम सामने झाले. विजेत्या संघांना जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आलं. विजेत्या संघातल्या खेळाडूंना तसंच राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्यसंघात निवड झालेल्या खेळाडूंना  स्मार्टवॉच देण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

****

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी काल उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात इंडोनेशीयाच्या लिओ रॉली कार्नांडो आणि डॅनीयल मार्टीन यांच्या जोडीवर दोन - शून्य असा सहज विजय मिळवला.

तर पुरुष एकेरीत भारताच्या एच एस प्रणॉयचं आव्हान संपुष्टात आलं. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या कोडाई नरावका यानं प्रणॉयचा पराभव केला.

****

नांदेड जिल्ह्यात नायगाव इथल्या सहाय्यक निबंधक कार्यालयातला सहकार अधिकारी बाबुराव चतरु पवार याला दहा हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. वेअर हाऊस परवान्याचं नूतनीकरण करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

सायबर भामट्यांकडून वीजग्राहकांना बनावट संदेश पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत, त्यामुळे ग्राहकांनी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या फसव्या संदेशाला प्रतिसाद देऊ नये, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर महावितरणकडून करण्यात आलं आहे.

****

No comments: