Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 29 November 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २९ नोव्हेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून चार दिवस राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा, पुणे आणि नागपूरमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. लोणावळा इथल्या कैवल्यधाम योग संस्था आणि संशोधन केंद्राच्या शताब्दी महोत्सवाचं उद्घाटन आज राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. शालेय शिक्षण प्रणालीमध्ये योगाचा अंतर्भाव करण्याबाबत विचार मंथन करण्यासाठी कैवल्यधाम इथं आयोजित एका राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. उद्या सकाळी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४५ व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना राष्ट्रपती स्वीकारतील. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्तानं विशेष टपाल तिकीटाचं आणि नाण्याचं प्रकाशनही यावेळी होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दूरस्थ पद्धतीने ५१ हजार नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण करणार आहेत. देशभरात ३७ ठिकाणी याअंतर्गत रोजगार मेळावे होणार आहेत.
****
राज्य विधीमंडळानं हिवाळी अधिवेशन येत्या सात ते २० डिसेंबर दरम्यान नागपूर इथं होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसंच सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी राज्यातल्या महत्वाच्या शहरांमध्ये गुलाबी रिक्षा ही योजना लवकरच सुरू करणार असल्याची माहिती, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. काल मंत्रालयात या विभागाच्या योजनांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. प्रायोगिक तत्वावर मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि ठाणे या ठिकाणी ही योजना सुरू करण्याचा मानस असल्याचं तटकरे यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला विद्यार्थी आणि महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. खरपुडी इथल्या कृषी विज्ञान केंद्रातले विद्यार्थी तसंच खरपुडी गावातल्या महिलांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभाग घेऊन, केंद्र सरकारच्या विविध शासकीय योजनांची माहिती जाणून घेतली. या संकल्प यात्रेत स्थानिक तेजस गॅस एजन्सी यांनी लावलेल्या स्टॉलला महिलांनी भेट देत गॅस जोडणी मिळवण्यासाठीची माहिती घेतली. त्यापूर्वी जालना पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामसेवक, गॅस एजन्सीचे प्रतिनिधी तसंच पंतप्रधान योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी देखील उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्या लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या योजनांबद्दल समाधान व्यक्त करत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
****
वीज वितरण जाळे बळकट करण्यासाठी देशभरात राबवण्यात येत असलेल्या आर डी एस एस योजना धाराशिव जिल्ह्यात वीज सेवा सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल, असं एम एस ई बी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी म्हटलं आहे. धाराशिव इथं काल महावितरण, महापारेषण, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभाग यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. वीज सेवा सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधींनी केलेल्या, नवीन उपकेंद्रं उभारणं, वीज जाळे मजबूत करणं, नवे अधिक क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवणं अशा सूचना महत्त्वाच्या आहेत, ही कामं आगामी अठरा महिन्यात पूर्ण होतील, असं पाठक यांनी सांगितलं.
****
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अन्य सतरा मागण्यांसाठी बीड जिल्ह्यातले शासकीय कर्मचारी येत्या चौदा डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. या मागण्यांसाठी या वर्षीच्या मार्च महिन्यात केलेल्या आंदोलनाला शासनाकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यामुळे दुस-या टप्प्यातलं हे आंदोलन होणार असल्याची माहिती राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या बीड शाखेचे सरचिटणीस रामचंद्र ठोसर यांनी दिली.
****
लातूर शहरासह निलंगा, रेणापूर, औसा, अहमदपूर, उदगीर, चाकूर तालुक्यातल्या अनेक गावात काल रात्री मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस झाला. लातूर तालुक्यातल्या गाधवड इथं विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. अवकाळीने रब्बी पिकांचं नुकसान झालं नसलं, तरी ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
****
उत्तर मध्य रेल्वेने काळवल्यानुसार लाईन ब्लॉक मुळे जालना-छपरा-जालना विशेष रेल्वे काही दिवस रद्द करण्यात आली आहे. जालना ते छपरा गाडी येत्या तीन जानेवारी पर्यंत, तर छपरा ते जालना गाडी पाच जानेवारी पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment