आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२९ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून चार दिवस राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा, पुणे आणि नागपूरमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. लोणावळा इथल्या कैवल्यधाम योग संस्था आणि संशोधन केंद्राच्या शताब्दी महोत्सवाचं उद्घाटन आज राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. शालेय शिक्षण प्रणालीमध्ये योगाचा अंतर्भाव करण्याबाबत विचार मंथन करण्यासाठी कैवल्यधाम इथं आयोजित एका राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी माहिती पत्रक आणि फलकांचं अनावरण राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते काल मुंबईत झालं. यावेळी राज्यपालांनी आयोजकांकडून नियोजनाची माहिती घेतली.
****
नाशिक जिल्हा सहकारी बँकेतून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश काल न्यायालयानं दिला. अद्वय हिरे यांना भोपाळमधून अटक करण्यात आली होती.
****
रविवारी गारपीटीसह झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात सुमारे ३४ हजार हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं आहे. आठवडाभरात या सर्व नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहेत.
****
बीड जिल्ह्यात सौताडा इथल्या धबधब्याच्या रामकुंडात पोहताना गुलाब चव्हाण हा युवक बुडाला. सोमवारी ही घटना घडली असून, अद्याप त्याचा मृतदेह सापडलेला नाही. स्थानिक नागरिक, पोलिस आणि वनविभागाचे कर्मचारी या तरुणाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
****
सिकंदराबाद आणि नांदेड रेल्वे विभागातल्या कामांमुळे अंशत: रद्द करण्यात आलेल्या आणि उशिरा धावणाऱ्या काही गाड्या पूर्ववत धावणार आहेत. त्यापैकी, धर्माबाद-मनमाड, काचिगुडा-नगरसोल, मुंबई-नांदेड, नगरसोल-नरसापूर-नगरसोल आणि नांदेड -पुणे या रेल्वेगाड्या आता त्यांच्या नियमित वेळापत्रकानुसार धावतील, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment