Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 November
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
· उत्तराखंडमधल्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठीचं
बचावकार्य अंतिम टप्प्यात.
·
विकसित भारत संकल्प यात्रा महापालिका
क्षेत्रात दाखल; ४१८ स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचणार.
· छत्रपती
संभाजीनगर इथं यात्रेचं औपचारिक उद्घाटन;जालना जिल्ह्यात बदनापूर
इथं यात्रेचं उत्स्फुर्त स्वागत.
आणि
· महावितरणची वीजचोरीविरोधात धडक मोहीम;छत्रपती संभाजीनगर इथं १९ जणांविरोधात गुन्हा दाखल.
****
उत्तराखंडमधल्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठीचं
बचावकार्य आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. ही मोहीम
यशाच्या जवळ पोहोचली असून, काही वेळातच या कामगारांची
सुटका होण्याची शक्यता, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणाचे सदस्य लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी वर्तवली आहे. ते नवी दिल्लीत
पत्रकार परिषदेत बोलत होते. कामगारांच्या सुटकेसाठी
यंत्राद्वारे सुरू असलेलं काम थांबवून, आपत्ती प्रतिसाद दलाच्या
जवानांनी सुमारे दहा मीटरचं खोदकाम केलं, आता केवळ दोन
मीटर इतकं अंतर उरल्याचं, तसंच या खोदकामाशिवाय इतर मार्ग
वापरण्याचा पर्यायही खुला ठेवल्याचं हसनैन यांनी सांगितलं.
****
देशाच्या आर्थिक वाढीचा दर २०२४-२०२५ या वर्षात ६ पूर्णांक
४ दशांश टक्के
राहण्याची
शक्यता आहे. स्टँडर्ड अँड पूअर्स ग्लोबल या पत मानांकन संस्थेनं
प्रसिद्ध
केलेल्या
आशिया पॅसिफिक क्षेत्रातल्या आर्थिक पाहणी अहवालात हा
अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र अन्नधान्याची भाववाढ,
आणि निर्यातीत घट
होण्याचीही
शक्यता असून त्याचा परिणाम वृद्धिदरावर होऊ शकतो असा इशाराही या
अहवालात देण्यात आला आहे. इतर आर्थिक सर्वेक्षण संस्थांनीही साधारण असाच अंदाज
वर्तवला असून, भारतीय रिझर्व बँकेनंही २०२४-२५ या वर्षात देशाचा
आर्थिक वृद्धिदर साडेसहा टक्के राहील,
असा अंदाज वर्तवला आहे.
****
केंद्रसरकारच्या
विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं निघालेली विकसित
भारत संकल्प यात्रा आता महानगरपालिका क्षेत्रात पोहोचली आहे. ही यात्रा
राज्यातल्या एकूण ४१८ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या २ हजार ८४ ठिकाणी
फिरणार आहे
आज
मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री
तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प
यात्रेला सुरूवात करण्यात आली. मुंबईसाठीच्या यात्रेतील चार वाहनांना आज
मंत्रालयात हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर
इथे आज विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली. शहरातल्या
सिध्दार्थ उद्यानामध्ये फिरोज खान इब्राहीम, आशाबाई कंदे, सगुणा वाघ, शहेनाज शेख जावेद, संजय सरकटे आणि नसरीन सय्यद रफीक या लाभार्थ्यांच्या हस्ते विकसित भारत
संकल्प यात्रेचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. संजय सरकटे
आणि नसरीन सय्यद रफीक यांनी आपले अनुभव सांगितले.
याप्रसंगी
बोलताना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी
श्रीकांत यांनी,
गरीब आणि वंचितांपर्यंत राज्य आणि केंद्रशासनाच्या योजना
पोहचवणं, ही आमची जबाबदारी असल्याचं सांगितलं.
ही यात्रा येत्या बावीस डिसेंबरपर्यंत महानगरपालिकेच्या दहा
प्रभागांमधल्या सत्तेचाळीस ठिकाणी जाणार असून त्यातून शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. या संकल्प
यात्रा रथावर विद्यार्थांसाठी क्यू आर कोड असून यावर स्कॅन करून त्यावरच्या
प्रश्नांची उत्तरं दिल्यावर बक्षीस देण्यात येणार आहेत. ज्या ज्या ठिकाणी रथ
फिरणार आहे त्या त्या ठिकाणी नोंदणी शिबिर राहील, या
शिबिरामध्ये पात्र नागरिक आपली नोंदणी करून योग्य त्या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
****
जालना
जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या वरुडी आणि कडेगाव इथेही आज या यात्रेचं आगमन
झालं. नागरिकांनी यात्रेचं उत्स्फुर्तपणे स्वागत केलं. यावेळी
उपस्थित ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन अर्ज करण्यासाठीची
पध्दत समजावून सांगण्यात आली. संकल्प रथातल्या एलसीडी स्क्रीनवर ग्रामस्थांना
माहितीपटही दाखवण्यात आला.
पुणे, ठाणे,
पालघर, सोलापूर, इथेही
या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला गॅस योजनांची
माहिती देण्यात आली.
****
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले
तसंच स्वातंत्र्य लढ्यातले अग्रणी पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट यांची आज पुण्यतिथी
आहे. मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी या थोर नेत्यांना आदरांजली वाहिली आहे.
****
राष्ट्रीय हरित
न्यायाधीकरणानं महाराष्ट्र राज्य सरकारला ठोठावलेल्या
दंडाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. घनकचरा व्यवस्थापनात हलगर्जीपणा झाल्यानं पर्यावरणाची हानी झाल्याच्या
आरोपावरून हरित न्यायधिकरणानं राज्यसरकारला बारा हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.
याप्रकरणी हरित न्यायाधीकरणासमोर फेरविचार याचिका अद्याप प्रलंबित
असल्याचा आणि दंडाची रक्कम अवाजवी असल्याचा युक्तिवाद सरकारतर्फे वकील मुकुल रोहतगी
यांनी केला. त्यावर सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड
यांच्या नेतृत्वाखालील पीठानं न्यायाधीकरणाच्या आदेशाला स्थगिती देत नोटीस जारी केली.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणार
असलेल्या २०२४ मधल्या नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक
आयोगाच्या mpsc.gov.in आणि mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, तसंच आयोगाकडून वेळोवेळी जाहीर करण्यात
येणाऱ्या सूचनांसाठीही या संकेतस्थळांना भेट द्यावी,असं
आवाहन आयोगानं केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं
नारेगाव परिसरातल्या विविध वसाहतींमध्ये महावितरणनं वीजचोरीविरोधात धडक मोहीम
राबवत एकाचवेळी १९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. नारेगाव परिसरात काही ग्राहक
मीटरमध्ये फेरफार करून तसंच लघुदाब वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी करीत असल्याची
माहिती महावितरणला मिळाली होती.यावरून महावितरणनं ही कारवाई केली. या एकोणीस
जणांनी घरगुती वापरासाठी विद्युत वाहिनीवर आकडे टाकून एक लाख चौदा हजार रुपयांची
वीज चोरी केल्याचं आढळून आलं. या सर्वांना वीजचोरीच्या रकमेसह प्रत्येकी दोन हजार
रुपयांचं तडजोड शुल्कही भरावं लागणार आहे. या सगळ्यांविरोधात सिडको पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
दुधाला ३४ रुपये प्रति लिटर दर देण्यात
यावा यासह विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या दूध
उत्पादक संघटना
आणि किसान
सभेच्या वतीनं आंदोलन करण्यात
येत आहे.
या आंदोलनाचा आज
सहावा दिवस
असून आंदोलनकर्त्यांनी आज
जिल्ह्यातल्या अकोले
तहसील कार्यालयामध्ये
जनावरं नेऊन घोषणाबाजी केली.
या आंदोलनाला आज मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही दूध दरवाढ देण्याची विनंती एका पत्राद्वारे केली आहे.
****
नांदेड इथे अद्ययावत रेल्वे स्थानक उभारणीसाठी दोनशे कोटी
रुपयांचा प्रस्ताव केंद्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असल्याची
माहिती नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.
नांदेड रेल्वे स्थानकावरच्या सोयी
सुविधांची आज खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय
व्यवस्थापक नीती सरकार उपस्थित होत्या. या रेल्वे स्थानकावरच्या गैरसोयींच्या वाढत्या
तक्रारींच्या पार्श्वभूमीवर चिखलीकर यांनी ही पाहणी करत, प्रवाशांना आवश्यक त्या
सर्व सुविधा पुरवण्याची सूचना विभागीय व्यवस्थापकांना केली.
****
No comments:
Post a Comment