Wednesday, 29 November 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.11.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 November 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज चार दिवसांच्या दौऱ्यासाठी पुण्यात दाखल

·      प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला एक जानेवारीपासून पाच वर्षं मुदतवाढ

·      राज्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसाच्या नुकसानाचे एकत्रित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 

आणि

·      विकसित भारत संकल्प यात्रेला छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज चार दिवसांच्या दौऱ्यासाठी पुण्यात दाखल झाल्या. वायुदलाच्या विशेष विमानानं आज दुपारी त्यांचं लोहगाव विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रपतींच्या या दौऱ्यात लोणावळा, पुणे आणि नागपूरमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. लोणावळा इथल्या कैवल्यधाम योग संस्था आणि संशोधन केंद्राच्या शताब्दी महोत्सवाचं उद्घाटन आज राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उद्या सकाळी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४५व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना राष्ट्रपती स्वीकारतील. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्तानं विशेष टपाल तिकीटाचं आणि नाण्याचं प्रकाशनही यावेळी होणार आहे.

****

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४५ व्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ आज झाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात एकूण ३५३ कॅडेट्सना दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये बारा परदेशी कॅडेट्सचा समावेश आहे.

****

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला एक जानेवारी २०२४ पासून पुढे पाच वर्षं मुदतवाढ देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या योजनेतून देशभरातल्या एक्क्याऐंशी कोटी गरीबांना दरमहा पाच किलो धान्य मोफत देण्यात येतं.

लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांच्या स्वयं सहाय्यता गटांना ड्रोन पुरवण्याच्या योजनेलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या योजनेअंतर्गत २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षांमध्ये देशातल्या निवडक पंधरा हजार महिला बचत गटांना ड्रोन्स पुरवण्यात येणार असून ड्रोन उडवण्याचं प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. शेतकऱ्यांना शेतीत फवारणी करण्यासाठी ही ड्रोन्स भाडेतत्वावर देण्यात येतील. ड्रोन उडवणाऱ्या महिलांना दरमहा पंधरा हजार रुपयांचं मानधन देण्यात येईल, असं ठाकूर यांनी सांगितलं.

विशेष फास्ट ट्रॅक अर्थत जलदगती न्यायालयांना तीन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सोळाव्या वित्त आयोगाच्या उद्दिष्ट आणि कार्यपद्धतीलाही या बैठकीत मान्यता देण्यात आली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान महिला किसान ड्रोन केंद्राचा ते शुभारंभ करणार आहेत. यातून महिला बचत गटांना येत्या तीन वर्षात पंधरा हजार ड्रोन्स पुरवली जाणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान देवघर इथल्या एम्स मधल्या जनऔषधी केंद्राचं लोकार्पण करतील. हे देशातलं दहा हजारावं जनऔषधी केंद्र असेल. देशातल्या जनऔषधी केंद्रांची संख्या पंचवीस हजारापर्यंत वाढवण्याच्या कार्यक्रमाचाही पंतप्रधान उद्या शुभारंभ करतील.

****

राज्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचे तातडीनं एकत्रित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. तीन हेक्टरपर्यंत ही नुकसानभरपाई देण्यात येणार असून, यासंदर्भात युद्धपातळीवर काम करण्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी प्रशासनाला केली आहे. 

राज्यात 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अभियान राबवण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी चारशे अठ्ठ्याहत्तर शाळांची निवड करण्यात आली आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतल्या सदनिकांच्या हस्तांतरण शुल्कात पन्नास टक्के कपात करण्याचा तसंच औद्योगिक आणि कामगार न्यायालयांच्या न्यायाधीशांना सुधारित सेवानिवृत्तीवेतन लागू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढवण्याचा आणि मराठी भवनाची उभारणी गतीनं करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्याचा महसूल वाढवण्याच्या दृष्टीनं 'महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३' राबवण्यालाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.

****

राज्य विधीमंडळानं हिवाळी अधिवेशन येत्या सात ते २० डिसेंबर दरम्यान नागपूर इथं होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोन आठवड्यांच्या या अधिवेशनात प्रत्यक्ष दहा दिवसांचं कामकाज होण्याची शक्यता आहे.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी एका जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना आज सकाळी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची म्हणजे १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

****

विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर आणि फुलंब्री तालुक्यातल्या विविध गावांत पोहोचली. या गावांमध्ये नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. विविध योजनांचे लाभ घेतलेल्या लाभार्थींनी आपले अनुभव कथन केले. फुलंब्री तालुक्यातल्या बिल्डा इथल्या आशा पगडे, सोमीनाथ मते यांनी आपल्या अनुभवाबाबत अधिक माहिती दिली.

बाईट - सोमीनाथ मते आणि आशा पगडे

जालना जिल्ह्यातल्या गोलापांगरी, खडकवाडी इथं केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेचं आज स्वागत करण्यात आलं. यावेळी ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

****

चंद्रपूर इथल्या महाऔष्णिक विद्युत केंद्रानं, वीज निर्मितीबाबतच्या आपल्या चौदा वर्षांपूर्वीच्या विक्रमाची पुन्हा बरोबरी केली आहे. या केंद्राच्या ५०० मेगावॉटच्या संच क्रमांक ८नं सलग २०० दिवस कार्यरत राहून वीज निर्मितीचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. हा संच यावर्षीच्या दहा मे पासून अखंडपणे वीज निर्मिती करत आहे.

****

'उडान-पाच' या मोहिमेअंतर्गत पुढच्या वर्षापासून जळगाव इथून पुणे, गोवा आणि हैदराबाद या तीन मार्गांवर विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. फ्लाय-91 ही खाजगी कंपनी या सेवा सुरू करणार असून, पुढच्या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जळगाव-पुणे मार्गावर, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जळगाव-गोवा मार्गावर आणि मार्चमध्ये जळगाव-हैदराबाद मार्गावर विमानसेवा सुरू होईल.

****

नांदेड जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसामुळे तीन महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी वीस पूर्णांक नव्वद मिलिमीटर पाऊस झाला आहे. मुखेड तालुक्यात मुखेड आणि चांडोळा इथं, बिलोली तालुक्यातल्या रामतीर्थ इथे आणि लोहा तालुक्यात माळाकोळी इथे अतिवृष्टी झाली.

आज सकाळीही जिल्ह्यातल्या अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे.

****

No comments: