आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२८ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरस्थ पद्धतीने ५१ हजार नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण करणार आहेत. देशभरात अनेक ठिकाणी याअंतर्गत रोजगार मेळावे होणार असून. यावेळी पंतप्रधान या उमेदवारांशी संवाद साधणार आहेत.
****
राष्ट्र सर्वोपरी मानणारी संस्कृती जोपासण्याचं आवाहन, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जनतेला केलं आहे. काल मुंबईत जैन समाजसुधारक श्रीमद राजचंद्रजी यांच्या जयंतिनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जगाला शांतता हवी आहे आणि शाश्वत शांततेसाठी लोकांमध्ये सलोखा तसंच सेवाभाव असणं गरजेचं आहे, असं राज्यपाल रमेश बैस यावेळी म्हणाले.
****
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून रविवारपर्यंत देशातल्या ९९५ ग्रामपंचायतींमधे ५ हजार आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली. या शिबिरांचा सात लाख ८२ हजार लोकांनी लाभ घेतला. या शिबिरांमधे ९ लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड तयार करण्यात आली असून, एक लाखांहून अधिक कार्डांचं वितरण झालं आहे.
****
रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातल्या चरी इथं शेतकर्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या संपाला काल ९० वर्ष पूर्ण झाली. या संपाचा वर्धापन दिन काल चरी इथं साजरा झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांचं नेतृत्व लाभलेला हा संप १९३३ ते १९३९ असा सहा वर्षे चालला. त्यानंतरच राज्यात कसेल त्याची जमीन, हा कायदा संमत झाला.
****
हिंगोली जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशीही सर्वत्र पावसाळी वातावरण असून, धुक्याची दाट चादर पसरली आहे. पहाटे कनेरगाव नाका भागात जोरदार पाऊस झाला.
****
अहमदनगर जिल्ह्यात मागच्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसानं शेती आणि फळबागांचं जे नुकसान झालं आहे त्याचे आणि दगावलेल्या जनावरांचे तातडीनं पंचनामे करावेत, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. त्यांनी काल याबाबतची स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेतली.
****
बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून अनेक जनावरे दगावली आहेत. जिल्ह्यातल्या ओढ्यांना आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतातल्या कपाशीसह इतर पिकांचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment