Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 November
2023
Time : 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ नोव्हेंबर २०२३
सकाळी
७.१० मि.
****
· व्होकल फॉर
लोकलचं अभियान संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत असल्याचं पंतप्रधानांचं मन
की बात मधून प्रतिपादन
· २६/११ च्या दहशतवादी
हल्ल्यातल्या हुतात्म्यांना अभिवादन
· पैठणच्या जायकवाडी
धरणासाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु
आणि
· राज्यात सर्वदूर
विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस
****
व्होकल फॉर
लोकलचं अभियान संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या
एकशे सातव्या भागात देशवासयांशी संवाद साधत होते. आपण आवाहन केलेल्या
‘व्होकल फॉर
लोकल’
अभियानाला
नागरीकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून, दिवाळी, भाऊबीज आणि
छठ या सणांच्या काळात चार लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची व्यावसायिक उलाढाल झाल्याचं
पंतप्रधान म्हणाले.
२६ नोव्हेंबर
२००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही, असं सांगून पंतप्रधानांनी
या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं.
नारी शक्ती
वंदन कायदा, संविधान दिन, बुद्धिमत्ता, विविध कल्पना
आणि नवोन्मेष,
जलसुरक्षा, स्वच्छता मोहिम
या विषयावरही पंतप्रधानांनी मन की बात मध्ये भाष्य केलं. आजच्या कार्तिकी
पौर्णिमा आणि गुरुनानक देवजी यांचं प्रकाशपर्व यानिमित्त त्यांनी देशवासियांना शुभेच्छा
दिल्या.
****
२६ नोव्हेंबर
२००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला काल १५ वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यात
किमान १६६ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. राज्यपाल
रमेश बैस,
मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे,
आणि
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातल्या
पोलीस हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन शहीदांना अभिवादन केलं.
****
संविधान दिनानिमित्त
काल विविध कार्यक्रम पार पडले. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात, संविधानाचे जनक भारतरत्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं. राज्यपाल
रमेश बैस यांनी राजभवनात, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संविधानाच्या
उद्देशिकेचं वाचन केलं.
****
मराठवाड्यात अनेक
ठिकाणी संविधान रॅली काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या
मुख्यालयात संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. शहरातल्या भडकल
गेट इथल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शैक्षणिक, सामाजिक तसंच
विविध संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यातल्या हिवरा फाटा
इथं,
तसंच
लातूर, नांदेड,
धाराशिव आणि जालना शहरातून काढण्यात आलेल्या संविधान रॅलीत
नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.
****
जलयुक्त
शिवार अभियान लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबवणार असल्याचं, मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राज्यात जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यास गती
देण्याकरता सरकारने काल व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसोबत
सामंजस्य करार केला, त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रवीशंकर यावेळी
उपस्थित होते.
या
कराराद्वारे राज्यातल्या लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरसह २४ जिल्ह्यांमधल्या ८६
तालुक्यात जलयुक्त शिवारची विविध कामं होणार आहेत.
****
पैठणच्या जायकवाडी
धरणासाठी नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर, मुकणे, कडवा तसंच अहमदनगर
जिल्ह्यातल्या मुळा आणि निळवंडे या धरणांमधून काल पाणी सोडण्यात आलं. काल दुपारी
दारणा धरणातून पाच हजार ६९६, गंगापूर धरणातून तीन हजार ६७१, मुकणे
धरणातून अकराशे, तर कडवा
धरणातून एक हजार ६२४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं. गंगापूर
धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर नाशिकला गोदाकाठी पुरस्थिती निर्माण झाल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे. निळवंडे धरणातून आठ हजार, तर मुळा धरणातून
दहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं.
****
मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त करण्यासाठी वैध मार्गानं लढा उभारण्याचा
निर्धार, मराठवाडा पाणीप्रश्न जनआंदोलन समितीचे
नेते तथा आमदार राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री
यशवंतराव चव्हाण यांच्या ३९ व्या पुण्यतिथीनिमित्त, यशवंतराव चव्हाण केंद्र आणि एमजीएम विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने, काल छत्रपती संभाजीनगर इथं, ‘२०२४ चा दुष्काळ : मराठवाड्याचा पाणीप्रश्न’ या विषयावर टोपे बोलत होते. हक्काचं पाणी मिळणं हा मराठवाड्याचा अधिकार असून, यापासून कोणीही वंचित ठेऊ शकणार नाही. उर्ध्व भागातील
नेतृत्वाचा अन्याय मराठवाडा यापुढे सहन करणार नाही, असा इशाराही टोपे यांनी यावेळी दिला.
****
उत्तराखंडमधल्या
उत्तरकाशी जिल्ह्यात सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांच्या सुटकेसाठी
बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांची प्रकृती स्थिर आहे.
मजूर आणि बचाव पथकातल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जात
असल्याचं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य लेफ्टनंट जनरल सइद अता
हसनैन यांनी सांगितलं.
****
राज्यात सर्वदूर
काल विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट
झाल्याचं वृत्त आहे. भाजीपाल्यासह रब्बीतल्या काही पिकांना या पावसाचा
फटका बसला आहे.
छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात काल रात्री अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. खुलताबाद, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, पैठण, गंगापूर आणि वैजापूर
इथंही जोरदार पाऊस झाला.
नांदेड, बीड आणि हिंगोली
जिल्ह्यातही आज पहाटेपासून वादळी पाऊस सुरु आहे.
जालना शहरासह
जिल्ह्यातल्या काही भागात मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. हा पाऊस
रब्बीतल्या ज्वारी, हरभरा पिकासाठी पोषक असला तरी फुलोऱ्यात असलेल्या
तुरीच्या पिकाचं काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
नाशिक शहरासह
जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. निफाड
तालुक्यासह अनेक ठिकाणी गारपीटही झाली. बागलाण तालुक्यात साल्हेर इथं सुरेश ठाकरे
या शेतकर्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. वादळी
वाऱ्यामुळे अनेक भागात झाडे कोसळली तसंच वीजपुरवठाही खंडित झाला होता.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, सातारा, अहमदनगर
जिल्ह्यात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
दरम्यान, येत्या दोन
दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी पावसाची
शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी
गारपिटीची शक्यता आहे.
****
बिहारप्रमाणे
महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना व्हायला हवी, अशी आपलीही
मागणी असल्याचं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजब यांनी म्हटलं आहे. हिंगोलीत
काल रामलीला मैदानावर झालेल्या ओबीसी एल्गार महामेळाव्यात ते बोलत होते. मराठा
समाजाला आरक्षण मिळवून देताना ओबीसींवर अन्याय करू नका असं भुजबळ म्हणाले. मराठा
कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्रं देण्यासाठी नेमलेली शिंदे समिती आणि गेल्या
दोन महिन्यांत दिलेली कुणबी प्रमाणपत्रं रद्द करावी, सारथीच्या माध्यमातून
मिळणाऱ्या सवलती ओबीसींना महाज्योतीच्या माध्यमातून द्याव्या, आदी मागण्या
त्यांनी यावेळी केल्या.
****
महाराष्ट्र
प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिविटी - एम पी डी ए कायदा, बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके
उत्पादक,
वितरक
आणि विक्रेते यांना लागू करण्याला शेतकरी संघटनेनं विरोध केला आहे. या निर्णयावरुन
शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. ते काल नांदेड
इथं वार्ताहरांशी बोलत होते. या नव्या कायद्याविरोधात राज्यातल्या
सुमारे ७० हजार कृषी सेवा केंद्रानी बेमुदत बंदचा इशारा दिला असल्याचंही पाटील यांनी
यावेळी सांगितलं.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या
अकोले इथं दुधाला ३४ रुपये भाव मिळावा या मागणीसाठी, गेल्या चार
दिवसांपासून दूध उत्पादक शेतकर्यांचं आमरण उपोषण सुरु आहे. सरकार चार
दिवस उलटूनही उपोषणकडे दुर्लक्ष करत असल्यानं शेतकरी संघटनेचे डॉ. अजित नवले यांनी
देखील उपोषणास सुरुवात केली आहे. अकोले इथं सुरू असलेल्या उपोषणास
राज्यभरातून पाठिंबा मिळत असून, सरकारने तातडीने या प्रश्नात ठोस तोडगा काढावा
असं आवाहन दूध उत्पादकांनी केलं आहे.
****
विकसित भारत
संकल्प यात्रेचं आज जालन्यातल्या परतूर तालुक्यात आष्टी इथं आगमन होत आहे.
यानिमित्त जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण, परतूर पंचायत
समितीचे गटविकास अधिकारी आकाश गोकणवार यांच्या उपस्थितीत विकसित भारताची शपथ घेतली
जाणार असून, आरोग्य
शिबिरासह,
‘धरती
करे पुकार’ हा
सांस्कृतिक उपक्रम यावेळी घेण्यात येणार आहे.
****
चीन मास्टर्स
बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी
यांच्या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.
****
No comments:
Post a Comment