Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 25 November 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २५ नोव्हेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
राजस्थान विधानसभेच्या १९९ जागांसाठीचं मतदान आज सुरु आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत २४ पूर्णांक ७४ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे.
****
दरम्यान, तेलंगणा विधानसभा निवडणुकीमध्ये २० हजारांहून अधिक मतदारांनी घरपोच मतदानाचा वापर केला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी विकास राज यांनी ही माहिती दिली. राज्यात प्रथमच सर्व ११९ मतदारसंघात २९ हजारांहून अधिक लोकांना घरबसल्या मतदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ८० वर्षापेक्षा जास्त वय असलेले नागरीक, ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्ती आणि आपत्कालिन सेवेतल्या व्यक्तींना घरपोच मतदानाची मान्यता देण्यात आली आहे. तेलंगणामध्ये येत्या ३० तारखेला मतदान होणार आहे.
****
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. कराड इथं प्रीतिसंगम या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात एकोपा निर्माण करून समाजकारण आणि राजकारण कसं करायचं याचा आदर्श यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिला, असं पवार यावेळी म्हणाले. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरतात. त्यांचे विचार, त्यांचं साहित्य हे आजही आपणा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे, असं अजित पवार यांनी नमूद केलं.
****
पैठणच्या जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातल्या दारणा धरणामधून २०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यास मध्यरात्री प्रारंभ झाला. गोदावरी पात्रावरील कालव्यांच्या फळ्या काढण्याचं काम सुरू झाल्यानंतर, हळूहळू पुढील विसर्ग करण्यात येणार आहे. दारणा धरण समूहातून दोन पूर्णांक ६४२ दशलक्ष घनफूट आणि गंगापूर धरणातून अर्धा दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश असून, त्यापैकी तूर्तास केवळ दारणा धरणातून पाणी सोडण्यात आलं आहे.
****
संविधान दिवस उद्या साजरा होत आहे. यानिमित्त संविधानातली निहित मूल्ये आणि तत्त्वे अधोरेखित आणि पुनरुत्थान करण्याच्या उद्देशानं विविध उपक्रम आयोजित केले जातात. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयं, स्वायत्त संस्था, आणि संस्थांसह शैक्षणिक संस्थेत संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचनासह विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
संविधान दिनानिमित्त नांदेड इथं उद्या सामाजिक न्याय विभागातर्फे संविधान फेरी काढण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजता शहरातल्या महात्मा ज्योतीबा फुले पुतळा येथून या फेरीला प्रारंभ होणार असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान प्रस्ताविकेचं सामुहिक वाचन करुन फेरीचा समारोप होईल.
****
यंदाच्या कार्तिकी वारीसाठी पंढरपूर इथं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेचं योग्य नियोजन करण्यात आल्यानं, यंदाची कार्तिकी खऱ्या अर्थाने स्वच्छतेची पंढरी ठरली आहे. यात्रा कालावधीत जिल्हा प्रशासनानं स्वच्छता आणि कचरा गोळा करण्याचं काम हाती घेतलं असून, याकामी तेराशे स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. पंढरपूर नगरीत दररोज जवळपास ७० ते १०० टन कचरा उचलण्यात आला. यात्रा कालावधीमध्ये स्थानिक नागरिकांनी आणि भाविकांनी आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी प्रशासनास योग्य सहकार्य केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर इथं आयोजित तीन दिवसीय महाआरोग्य शिबिरामध्ये सव्वा लाखापेक्षा अधिक वारकऱ्यांनी मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला.
****
भारतानं दुर्मिळ आजारांवर उपचार करण्यासाठी अत्यंत स्वस्त दरात चार औषधं विकसित केली असून, ती आता बाजारात उपलब्ध आहेत. टायरोसीनेमिया प्रकार एक, गौचेर्स डिसीज, विल्सन डिसीज आणि ड्रावेट लेनॉक्स गासटाउंट सिंड्रोम अशी या आजारांची नावं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियंशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा एकशे सातवा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
कतार इथं सुरु असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या आशिष भानवालानं २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात कांस्य पदक जिंकलं. काल झालेल्या अंतिम फेरीत आशिषनं ३५ पैकी २७ गुण मिळवत तिसरा क्रमांक प्राप्त केला.
****
हवामान
राज्यात, येत्या तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वीजा आणि जोराच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांसाठी, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment