Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 24 November 2023
Time : 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· राज्यातल्या विविध जाती-धर्माच्या नागरिकांचं मागासलेपण तपासण्याचा राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्णय
· राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ
· बीड इथं विकसित भारत संकल्प यात्रेला प्रारंभ;लातूर तसंच परभणी जिल्ह्यात आज उद्घाटन
आणि
· पहिल्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर दोन गडी राखून विजय
सविस्तर बातम्या
राज्यातल्या विविध जाती-धर्मातल्या नागरिकांचं मागासलेपण तपासण्याचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोगानं घेतला आहे. आयोगाच्या काल पुण्यात झालेल्या बैठकीत नागरिकांचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण तपासण्याचा निर्णय झाल्याची माहिती, आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी दिली. यासाठी प्रश्नावली तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. यात सामाजिक मागासलेपणाला सर्वाधिक प्राधान्य दिलं जाणार असल्याचं ते म्हणाले. लवकरच राज्यभरात हे काम सुरू होण्याची शक्यता असून १ लाख कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण केलं जाण्याची शक्यता आहे.
****
राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यामुळं महागाई भत्त्याचा दर ४६ टक्के झाला आहे. १ जुलैपासूनची थकबाकी नोव्हेंबरच्या वेतनात जमा होणार असल्याचं काल प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात नमूद आहे.
****
राज्यातल्या काही भागात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे टंचाई जाणवत असलेल्या भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकर सुरु असलेल्या जिल्ह्यांना एकूण १९ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. दहा जिल्ह्यांमधल्या ३५५ गावं आणि ९५९ वाड्यांमध्ये एकूण ३७७ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
****
मुंबईत काल महाआवास अभियान २०२३-२४ राज्यस्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ आणि २०२१-२२ चे पुरस्कार वितरण ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातल्या खलंग्री या गावाला ग्रामपंचायत गटातून द्वितीय क्रमांकाचा, तर बहुमजली इमारत या घटकात धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या दीपक नगरला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार वितरीत करण्यात आला.
****
खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे वगळता राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर खासदारांना अपात्र करण्याची याचिका, अजित पवार गटानं राज्यसभेचे सभापती आणि लोकसभेच्या अध्यक्षांकडे दाखल केली आहे. वंदना चव्हाण, फौजिया खान, श्रीनिवास पाटील, फैजल मोहम्मद यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी यात करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना अपात्र करण्याची मागणी, शरद पवार गटानं यापूर्वीच राज्यसभेच्या अध्यक्षांकडे केली आहे.
****
उत्तराखंडमधे उत्तरकाशीतल्या सिलक्यारा इथल्या बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी विविध सरकारी यंत्रणां सोबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांकरिता तात्पुरतं मदत केंद्र उभारण्यात आलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा आणि निळवंडे धरणातून पैठणच्या जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. यादरम्यान प्रवरा नदीवरील राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यातल्या कोल्हापूर बंधारा परिसरात चार डिसेंबर पर्यंत जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत.
****
बीड जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला काल सुरुवात झाली. जिल्ह्यातल्या अकरा तालुक्यांमध्ये याअंतर्गत पुढचे ६० दिवस नऊ चित्ररथांमार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी या अभियानाचं उद्घाटन केलं. जिल्ह्यातल्या पात्र वंचित घटकानी याचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही तेरा संकल्प रथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती दिली जात आहे. नांदेड तालुक्यात पासदगाव इथं विस्तार अधिकारी व्ही. बी. कांबळे, ग्रामसेवक विलास वाघमारे यांनी ग्रामस्थांना योजनांची माहिती दिली, तसंच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात आला. थेट गावात योजनेची माहिती मिळत असल्यानं ग्रामस्थांनी या यात्रेचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं.
Byte….
धाराशिव जिल्ह्यातही आंबेजवळगा इथं या अभियानाद्वारे जनजागृती करण्यात आली. तसंच या गावाला स्वच्छता अभियानाअंतर्गत विशेष प्रमाणपत्र देऊन आदर्श गाव म्हणून सन्मानित करण्यात आलं.
Byte…
दरम्यान, परभणी आणि लातूर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला आज प्रारंभ होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र नर्सी इथं काल कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला संत नामदेव महाराजांचा ७५३ वा जन्मोत्सव सोहळा दीपोत्सवाने साजरा झाला. यानिमित्ताने झालेल्या धार्मिक उपक्रमात भक्तगण मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.
****
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांचं काल पुण्यात निधन झालं, ते ७३ वर्षांचे होते. साहित्य परिषदेच्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळलेले पायगुडे यांनी सूत्रसंचालक तसंच क्रीडा समालोचक म्हणून स्वत:चं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक अविनाश पायगुडे यांचे ते बंधू होत.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच टी - ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या काल विशाखापट्टणम इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं दोन गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियानं निर्धारित २० षटकात तीन बाद २०८ धावा केल्या. भारतीय संघानं हे लक्ष्य शेवटच्या षटकात आठ गडी गमावत पूर्ण केलं. सूर्यकुमार यादवनं ८०, तर इशान किशननं ५८ धावा केल्या. या मालिकेतला दुसरा सामना परवा रविवारी तिरुवअनंतपुरम इथं खेळला जाणार आहे.
****
चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच एस प्रणोयनं पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उप-उपांत्यपूर्व फेरीत त्यानं डेन्मार्कच्या मॅग्नस जोहान्सन याचा २१ - १२, २१ - १८ असा पराभव केला. पुरुष दुहेरीतही भारताच्या सात्विक साईराज-चिराग शेट्टी या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
****
धाराशिव इथल्या महाराष्ट्र लोकविकास मंचाचा जीवनगौरव पुरस्कार महिला राजसत्ता आंदोलनाच्या प्रवक्त्या मंगल दैठणकर यांना जाहीर झाला आहे. संघटनेच्या विविध पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. येत्या दहा डिसेंबरला कळंब इथं या पुरस्कारांचं वितरण होणार असल्याचं, संघटनेचे राष्ट्रीय सचिव भूमिपुत्र वाघ यांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरात पाणीपुरवठा तसचं भुयारी गटारे, बढा तलावाच्या कामाबाबतचे विकास प्रकल्प संबंधित यंत्रणेने समन्वयाने तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. वसमत शहरातल्या विकास कामांसाठी १०८ कोटी रुपये निधीस यावेळी मान्यता देण्यात आली.
****
लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात किल्लारी इथं शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी इशारा दिलेलं पायी दिंडी आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. सोयाबीनला किमान नऊ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन होतं.
****
बीड जिल्ह्यात मांजरसुंबा नेकनूर मार्गावर चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. काल संध्याकाळी हा अपघात झाला.
****
लातूर जिल्ह्यात उद्या आणि परवा २६ तारखेला विशेष मतदार नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरांमध्ये पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.
****
अंबाजोगाई इथं तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहास उद्यापासून प्रारंभ होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांचे हस्ते उद्या सायंकाळी या समारोहाचं उद्घाटन होणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना या महोत्सवात पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
****
येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.
****
No comments:
Post a Comment