आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२५ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
राजस्थान विधानसभेच्या १९९ जागांसाठीच्या मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत मतदानाचा नवा विक्रम प्रस्थापित करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशात केली आहे.
****
उत्तराखंडमध्ये उत्तर काशीमधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरुच आहेत. तांत्रिक अडचणी दूर झाल्यावर आज सकाळी पुन्हा बचावकार्याला सुरुवात झाली.
****
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. कराड इथं प्रीतिसंगम या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं.
****
गोव्यात सुरु असलेल्या ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ओढ या लघुपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त केला आहे. ७५ क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टुमारो या स्पर्धेमध्ये हा चित्रपट अव्वल ठरला आहे. एक मासेमार त्याची बोट पार्किंगसाठी शहरात आणतो अशी ओढ या लघुपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
****
नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यातल्या महाराष्ट्र दालनाला नागरीकांची पसंती मिळत आहे. या दालनात असलेल्या ४८ स्टॉल्समध्ये पैठणच्या पैठणीसह, कोल्हापूरचा मसाला, गूळ, चप्पल, सांगलीची हळद, मनुका, चटई, नागपूरचे संत्रे, महाबळेश्वरचे मध, यासह विविध पारंपरिक वस्तूंचा समावेश आहे. ‘वसुधैव कुटुंबकम-युनिटी इन ट्रेड’ या मध्यवर्ती संकल्पनेच्या धर्तीवर महाराष्ट्र दालन सजवण्यात आलं आहे.
****
सार्वजनिक आरोग्य विभागाशी संबंधित कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अर्थात सी एस आर क्रियाकलापांचं जलद, पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता धोरणात्मक संरचना तयार करण्यात येत आहे. सीएसआर निधीच्या विनियोगासाठी धोरण ठरवण्यात येणार असल्याची माहिती, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी दिली. सीएसआर निधीच्या विनियोगाबाबत मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment