Sunday, 5 November 2023

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक: ०५ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 05 November 2023

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०५ नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यभरातल्या २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान ;मराठवाड्यातल्या  २४८ ग्राम पंचायतींचा समावेश;उद्या मतमोजणी

·      वाढतं प्रदूषण पाहता शहरांमध्ये बांबू पार्क उभारण्याचा मानस मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त

·      अहमदनगर इथं एमआयडीसी अभियंत्याला एक कोटी रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक

      आणि

·      सुलतान जोहोर चषक कनिष्ठ हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवून भारताला कांस्यपदक 

****

राज्यभरातल्या २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. आज सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मराठवाड्यातील २४८ ग्राम पंचायतींसाठी मतदान होत असून, यामध्ये बीड जिल्ह्यातल्या सर्वाधिक १८६, नांदेड १९, छत्रपती संभाजीनगर १६, लातूर १३, धाराशिव सहा, तर परभणी आणि जालना जिह्यातील प्रत्येकी चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

नांदेड जिल्ह्यात २५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती, त्यापैकी तीन ग्राम पंचायती बिनविरोध झाल्या, दोन ग्रामपंचायतीसाठी अर्जच प्राप्त झाले नाहीत तर एका ग्रामपंचायतीमध्ये सदस्य बिनविरोध निवडले असून, फक्त सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे.

धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ ही ग्राम पंचायत बिनविरोध निवडून आली आहे.

राज्यातल्या २ हजार ९५० सदस्य आणि १३० सरपंचांच्या रिक्तपदांची पोटनिवडणूकही आज होत असून या सर्व मतदानाची मतमोजणी उद्या होणार आहे.   

दरम्यान, गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागासाठी मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते दुपारी ३ वाजेपर्यंतच असणार आहे. तिथं ७ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.

****

वाढतं प्रदूषण पाहता शहरांमध्ये बांबू पार्क उभारण्याचा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते काल सातारा जिल्ह्यात दरे या आपल्या गावी बांबू लागवड केल्यानंतर बोलत होते. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त बांबू लागवड करावी, असं आवाहन  मुख्यमंत्र्यांनी केलं. सातारा जिल्ह्यातल्या कंदाटी खोऱ्यात तरुणांना रोजगार मिळावा यासाठी बांबू पासून उत्पादन करणारा उद्योग उभारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना राबवली जाणार असून, या संदर्भातल्या दोषींविरोधात कठोर कारवाईचे संकेत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल नागपुरात बोलत होते. अमंली पदार्थांच्या प्रकरणात पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळून आला, तर त्यांना निलंबित नव्हे तर थेट बडतर्फ केलं जाईल, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

  ****

अहमदनगर इथला औद्योगिक विकास महामंडळाचा सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याला एक कोटी रुपयांची लाच घेताना नाशिक इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहाथ अटक केली. कंत्राटदाराचं अडीच कोटी रुपये देयक अदा करण्यासाठी त्याने लाच मागितली होती. न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गायकवाड याच्या एका साथीदाराचा शोध ही सुरू आहे.

****

मराठा समाजास मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यभर करण्याच्या शासन निर्णयावर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी समाधान व्यक्त केलं आहे. शासनाच्या शिष्टमंडळाने काल छत्रपती संभाजीनगर इथं मनोज जरांगे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या निर्णयाची प्रत सोपवली. या समितीत रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे, तसंच मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांचा समावेश होता.

****

भरडधान्य हे आपलं मुख्य अन्न असावं आणि तेच आपण प्रमुख उत्पादन म्हणून आपल्या शेतात पिकवावं, असं आवाहन बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात काल आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त घेण्यात आलेल्या 'शाश्वत श्री अन्न शेती' या विषयावरील राज्यस्तरीय परिषदेत त्या बोलत होत्या. आपण केलेलं कार्य प्रत्येक शेतकऱ्यांपर्यत पोहोचायला हवं, असं पोपरे म्हणाल्या.

****

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला येत्या पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते काल छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. या योजनेअंतर्गत देशातल्या अंदाजे ऐंशी कोटी नागरिकांना दरमहा पाच किलो धान्य मोफत दिल जातं.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्गसह वगळलेल्या इतर १७ महसूल मंडळांतल्या शेतकऱ्यांना अग्रिम विमा नुकसान भरपाईचे ७० कोटी रुपये मिळणार आहेत, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. ते काल धाराशिव इथं माध्यमांशी बोलत होते. दिवाळीपूर्वी ही रक्कम मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही पाटील यांनी सांगितलं. जिल्ह्यात उर्वरित ४० महसूल मंडळांतल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम विमा वितरणास परवापासूनच सुरुवात झाली आहे.

****

लातूर जिल्ह्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवरआनंदाचा शिधावितरण सुरु करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते काल प्रतिनिधीक स्वरूपात पात्र लाभधारकांनाआनंदाचा शिधावाटप करण्यात आला. जिल्ह्यात सुमारे चार लाख सहा हजार कुटुंबांनाआनंदाचा शिधावितरीत केला जाणार आहे. यामध्ये एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल तर प्रत्येकी अर्धा किलोची रवा, चणाडाळ, मैदा आणि पोह्याची पाकिटं असे एकूण सहा जिन्नस प्रति शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे प्रति संच शंभर रुपये या दराने वितरीत करण्यात येणार आहेत.

****

मलेशियात सुलतान जोहोर चषक कनिष्ठ हॉकी स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं पाकिस्तानला नमवून कांस्यपदक जिंकलं आहे. कालच्या सामन्यात निर्धारित वेळेत तीन तीन अशी बरोबरी झाल्यानंतर, पेनल्टी शूट आउट मध्ये भारतानं तीन-दोन अशी सरशी साधत, भारतानं पाकिस्तानला पराभूत केलं.

****

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल बंगळुरू इथं झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे न्यूझीलंडचा पराभव केला. न्यूझीलंडनं ५० षटकांत सहा बाद ४०१ धावा केल्या. मात्र पावसामुळे व्यत्यय आल्यानं, पाकिस्तानला ४१ षटकांत ३४२ धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं, मात्र पाकिस्तानच्या २६ व्या षटकांत २०० धावा आलेल्या असताना, पुन्हा पावसामुळे सामना थांबला, डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला २१ धावांनी विजयी घोषीत करण्यात आलं.

दरम्यान, अहमदाबाद इथं झालेल्या अन्य एका सामन्यात ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा ३३ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करत, पन्नासाव्या षटकाचे तीन चेंडू शिल्ल्लक असतांना सर्वबाद २८६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ४८व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर २५३ धावांवर  सर्वबाद झाला. इंग्लंडचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

या स्पर्धेत आज यजमान भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत होत आहे. कोलकाता इथं ईडन गार्डन मैदानावर दुपारी दोन वाजता हा सामना होत आहे.

****

गोव्यामध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आत्तापर्यंत १८३ पदकांची कमाई करत पदकतालिकेतलं आपलं प्रथम स्थान कायम राखलं आहे. यात ६५ सुवर्णपदकांसह प्रत्येकी ५९ रौप्य आणि कांस्य पदकांचा समावेश आहे. ५१ सुवर्णांसह एकूण शंभर पदकं मिळवत सैन्यदलानं द्वितीय तर ४६ सुवर्णांसह १२२ पदकं मिळवत हरियाणानं तिसरं स्थान कायम राखलं आहे.

****

शेतीतून कमी खर्चात अधिक उत्पन्न काढणं ही काळाची गरज असून, शेतकऱ्यांनी रासायनिक खतांच्या मर्यादित वापरासह, सेंद्रीय आणि जैविक खतं-औषधांच्या वापरावर भर द्यावा, असं आवाहन नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त भोकर इथं कृषी विभागाच्या वतीने शेतकरी प्रशिक्षण आणि सार्वभौम ग्रामसभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा-निळवंडे धरणातून पैठणच्या जायकवाडी धरणासाठी प्रवरा नदीमार्गे पाणी सोडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रवरानदीवरील नेवासा तालुक्यातल्या पाचेगाव, पुनतगाव आणि मधमेश्वर बंधारा परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. अहमदनगर विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी आदेश दिले आहेत.

दरम्यान, मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी किसान सभेने उद्या सोमवारी गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळावर धडक सत्याग्रहाचा इशारा दिला आहे. जायकवाडी प्रकल्पासाठी २० हजार दशलक्ष घनफूट आणि माजलगाव प्रकल्पासाठी पाच हजार दशलक्ष घनफूट पाणीवाटा वरच्या धरणातून तत्काळ उपलब्ध करून द्यावा, तसंच या दोन्ही प्रकल्पातील संपूर्ण लाभ क्षेत्रासाठी रब्बी आणि उन्हाळी १२ पाणी पाळ्या उपलब्ध कराव्या, यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन आहे.

****

No comments: