Wednesday, 1 November 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 01.11.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 01 November 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु आहे. या बैठकीला सत्ताधारी पक्षांसह, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, लोकभारती पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, महाराष्ट्र नवनिर्मान सेना, रिपब्लिकन पक्ष आदी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.

दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी आज मंत्रालयाच्या आवारात सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन करुन, मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर कुलूप लावलं होतं. पोलिसांनी आंदोलक आमदारांना ताब्यात घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेली संचारबंदी आज संध्याकाळी पाच वाजेपासून मागे घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी यासंदर्भातले आदेश जारी केले. मात्र जमावबंदी लागू असेल, असं या आदेशात म्हटलं आहे. दरम्यान, संचारबंदीमुळे आज जिल्ह्यातल्या शाळा -महाविद्यालयं आणि सर्व आस्थापना पूर्णपणे बंद आहेत.

****

मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या पुतळ्याची निर्मिती अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी केली आहे. २२ फुट उंचीचा हा पुतळा एका पृथ्वी गोलावर उभारण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा दिवंगत गोलंदाज फिरकीपटू शेन वॉर्न यांच्या चेंडूवर सचिननं षटकार मारला, तो क्षण या पुतळ्याच्या रूपानं कायम स्मरणात राहणार आहे.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर १७ भरुन खाजगी विद्यार्थी म्हणून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी सात नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत काल संपणार होती.

****

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची नवीन संगणक प्रणालीवर नोंदणी सुरू झाली असून, नांदेड जिल्ह्यातल्या गर्भवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केलं आहे. या योजनेअंतर्गत पहिल्यावेळी पाच हजार रुपयांचं अनुदान दोन टप्प्यातच मिळणार आहे, तर दुसरी मुलगी झाल्यास सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.

****

हवामान बदलामुळे होणारं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी संरक्षित शेतीचं तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार असल्याचं, राहुरी इथल्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील यांनी केलं आहे. संरक्षित शेती तंत्रज्ञानावरील राज्यस्तरीय कार्यशाळेत ते काल बोलत होते. या कार्यशाळेत हरितगृह, शेडनेटगृह उभारणीविषयीचं तंत्रज्ञान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं.

****

एक जानेवारी २०२४ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या युवक-युवतींनी सुधारित मतदार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण अभियानांतर्गंत आयोजित शिबिरांमध्ये मतदार यादीत नावनोंदणी करण्याचं आवाहन, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. जिल्ह्यात या कार्यक्रमांतर्गत १८ आणि १९ नोव्हेंबर आणि दोन, तीन डिसेंबर रोजी विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत, प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वेमार्गाच्या कामामुळे रद्द केलेल्या गाड्या पूर्ववत सुरु करण्यात आल्याचं रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे. त्यानुसार दौंड - निझामाबाद ही गाडी नियोजित वेळेनुसार धावेल, मात्र उद्या आणि परवा तीन तारखेला मुदखेड ते निझामाबाद दरम्यान रद्द असेल, तर निझामाबाद - पंढरपूर ही गाडी देखील नियोजित वेळेनुसार धावेल, मात्र आज, उद्या आणि परवा तीन तारखेला निझामाबाद ते मुदखेड दरम्यान रद्द असेल. निझामाबाद - पुणे आणि पंढरपूर - निझामाबाद या गाड्या नियोजित वेळेनुसार धावतील.

****

धाराशिव इथं १६ ते २० नोव्हेंबर दरम्यान राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंची गैरसोय होणार नाही यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.

****

आशियाई महिला हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. काल रांची इथं झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने जपानचा दोन - एक असा पराभव केला. शेवटच्या लीग सामन्यात भारताचा सामना दक्षिण कोरियासोबत होणार आहे.

****

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान सामना होणार आहे. पुणे इथं दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

No comments: