Thursday, 2 November 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.11.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 November 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      सरकाची शिष्टमंडळामार्फत जरांगे पाटील यांना उपोषण मागं घेण्याची विनंती

·      मराठा आरक्षणासाठी राज्यात विविध ठिकाणी निदर्शनं सुरूच

·      हिंगोलीमध्ये कुणबी प्रमाणपत्र वितरणाला सुरुवात

आणि

·      विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचं श्रीलंकेसमोर ३५८ धावांचं आव्हान

****

सरसकट मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातल्या आंतरवली सराटी इथं उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची आज सरकारच्या शिष्टमंडळानं भेट घेऊन त्यांना उपोषण मागं घेण्याची विनंती केली. शिष्टमंडळातले सदस्य निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे, एम जी. गायकवाड यांनी आरक्षणासंदर्भातली न्यायालयीन प्रक्रिया त्यांना समजावून सांगितली. आरक्षण एक दोन दिवसांत मिळालं तरी ते न्यायालयात टिकत नाही, असं ते म्हणाले. सरकार टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना सहकार्य करा आणि घाईत कोणताही निर्णय घेऊ नका, अशी विनंतीही जरांगे यांना यावेळी करण्यात आली. सरकारला पुरेसा वेळ दिला तर मराठ्यांना आरक्षण नक्की मिळेल, अशी खात्री निवृत्त न्यायमूर्ती गायकवाड यांनी जरांगे यांना दिली. मराठ्यांना सरसकट आरक्षण सरकार का देऊ शकत नाही, असा प्रश्न जरांगे यांनी विचारला, त्यावर सगळे मराठा मागास असल्याचं सिद्ध झालेलं नाही, असं न्यायमूर्तींनी सांगितलं. मराठा आरक्षणासाठी एक नवा आयोग स्थापन करणार असल्याची माहिती न्यायमूर्तींनी यावेळी दिली.

****

मराठा आरक्षणासाठी आजही राज्यात विविध ठिकाणी आंदोलकांनी निदर्शनं केली. आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी जालना जिल्ह्यातल्या काही भागात आजही रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर नागेवाडी, समृद्धी महामाहार्गावर निधोना परिसरात आणि मंठा इथं मराठा समाजाच्यावतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. दरम्यान मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस असून, वैद्यकीय उपचार घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. जालना जिल्ह्यातली इंटरनेट सेवा आज दुसऱ्या दिवशीही बंद आहे. लातूर तालुक्यातल्या भातांगळी पाटी इथे मराठा आंदोलकांनी लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर दोन तास घोषणाबाजी आणि चक्का जाम आंदोलन करत वाहतूक रोखून धरली. पोलीस प्रशासनानं मध्यस्थी करत आंदोलकांचं निवेदन स्वीकारून महामार्गावरची वाहतूक सुरळीत केली. हिंगोली जिल्ह्यात आज बावीसहून जास्त ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातून बाहेरगावी जाणारी व जिल्ह्यात येणारी सर्व वाहतूक बंद झाली होती. हिंगोली - अकोला राष्ट्रीय महामार्गावर बासंबा फाट्यावर, औंढा नागनाथ इथे औंढा- हिंगोली राज्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सेनगाव- हिंगोली राष्ट्रीय महामार्ग आणि नांदेड- हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर माळेगाव फाटा आणि मसोड फाटा या ठिकाणी महामार्ग अडवण्यात आला होता.यापैकी अनेक ठिकाणी टायर जाळून निषेध करण्यात आला. या आंदोलनात महिलांचा विशेष सहभाग आढळून आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी मुकुंदवाडी भागात रास्ता रोको आंदोलनं करण्यात आलं. धुळे इथे मराठा समाजाच्या आंदोलकांनी, सरकारनं सर्वपक्षीय बैठकीत संमत केलेल्या ठरावाची प्रत जाळून सरकारचा निषेध केला. जंरागे पाटील यांच्या आरोग्य आणि आयुष्यासाठी आज धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं एकविरा देवी मंदिरात सामूहिक आरती करत देवीला साकडं घालण्यात आलं.

****

कुणबी जात प्रमाणपत्रांचं वाटप करण्याबाबत शासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात कुणबी जातीच्या प्रमाणपत्र वाटपाला आज सुरुवात झाली. जिल्ह्यात पहिलं प्रमाणपत्र हिंगोली तालुक्यातल्या खंडाळा गावातल्या सुनील गायकवाड या युवकाला देण्यात आलं. जिल्ह्यात सगळ्या जुन्या निजामकालीन नोंदी तपासण्यात आल्यानंतर, कुणबी जातीच्या तीन हजार तीस नोंदी सापडल्या असून, त्या स्कॅन करून जिल्ह्यातल्या नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यातल्या नागरिकांनी कुणबी जातीचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज केल्यास त्यांना तात्काळ दाखला दिला जाईल, असं हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात कुणबी दस्तऐवजांच्या आतापर्यंत पाचशे एकोणनव्वद नोंदी आढळून आल्या असून, जिल्ह्यात आजपासून कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करणार असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

****

राज्यातली आणि सांगलीतली परिस्थिती लक्षात घेत सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती या संस्थेनं रंगभूमी दिन आणि विष्णुदास भावे गौरव प्रदान सोहळा स्थगित केला आहे.शंभराव्या नाट्य संमेलनाचा मुहूर्तमेढ कार्यक्रमही सध्या स्थगित केल्याचं या संस्थेनं कळवलं आहे.

****

निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागानं काल देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला. देशभरातल्या शंभर शहरांमध्ये या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे. यात पन्नास लाख निवृत्तीवेतनधारकांच्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादरीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२४-२५ राबवण्यासंदर्भातली बैठक आज झाली. अभ्यास मंडळ सदस्यांच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले होते.

****

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं छत्रपती संभाजीनगर इथलं 'पर्यटक निवास' राज्यातलं पहिलं पूर्णत: महिला संचालित पर्यटक निवास म्हणून पर्यटकांच्या सेवेत दाखल झालं आहे. सगळ्या महिला कर्मचारी असलेल्या या पर्यटक निवासात आलेल्या बंगाली पर्यटक सुतापा चॅटर्जी यांच्या हस्ते आज याचं उदघाटन करण्यात आलं. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या या निवासात ब्याऐंशी विविध श्रेणींच्या खोल्या आणि उपहारगृहासह विविध सुविधा उपलब्ध आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केलं आहे.

****

ग्रामविकास आणि राष्ट्रउत्थानासाठी झटणारे तसंच अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं आज अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी इथं दुपारी असंख्य भक्तांनी तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं उत्तराखंडमधल्या बागेश्वरधामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या नियोजित कार्यक्रमाला विरोधाचा आज निषेध करण्यात आला आहे. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीनं याला विरोध दर्शवला असून हिंदू जनजागर समितीतर्फे आज एका पत्रकार परिषदेत याचा निषेध करण्यात आला.

****

भारतानं विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतल्या आपल्या सातव्या सामन्यात श्रीलंकेसमोर विजयासाठी ३५८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर सुरू या सामन्यात नाणेफक गमावल्यानंतर भारतीय संघानं निर्धारित ५० षटकांत आठ बाद ३५७ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा चार धावांवर बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या गड्यासाठी १८९ धावांची दमदार भागीदारी केली. गिल ९२ आणि कोहली ८८ धावांवर बाद झाले. श्रेयस अय्यरनंही सुरेख फलंदाजी करताना ८२ धावा केल्या. दिलशान मदुशंकानं पाच गडी बाद केले. भारतानं हा सामना जिंकला तर संघाचं या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतलं स्थान आजच निश्चित होईल.

****

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लातूर शहरात एक हजार दोनशे तेवीस नव्या लाभधारकांचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाला असून, शहरातल्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घेत लवकरात लवकर बांधकामं सुरू करावीत, असं आवाहन आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे. याआधी या योजनेचा लाभ घेतलेल्या पण अजून घरांची बांधकामं सुरू न केलेल्या लाभधारकांनी आता काम सुरू केलं नाही तर मंजूर झालेलं घरकुल रद्द करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून केली जाईल, असंही आयुक्तांनी सांगितलं आहे.

****

निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातल्या चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. जव्हार, विक्रमगड, डहाणू, तलासरी या तालुक्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. चार तालुक्यात कंत्राटी तत्वावर प्रत्येकी एक जबाबदार समन्वयकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.

****

No comments: