Friday, 3 November 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 03.11.2023, रोजीचे सकाळी: 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 November 2023

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा यशस्वी;सरकारला दोन महिने मुदत देत उपोषण मागे घेण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय

·      आरक्षण देण्याच्या कार्यवाहीत सरकार कुठेही कमी पडणार नाही-मुख्यमंत्र्यांची ग्वाही

·      शिवसेना आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू

आणि

·      एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर ३०२ धावांनी दणदणीत विजय

****

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या यशस्वी चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं काल जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी इथं जाऊन जरांगे यांच्याशी चर्चा केली. या शिष्टमंडळात निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे, निवृत्त न्यायमूर्ती एम जी. गायकवाड, मंत्रिमंडळातील सदस्य धनंजय मुंडे, अतुल सावे, संदीपान भुमरे, उदय सामंत, यांच्यासह आमदार नारायण कुचे आणि आमदार बच्चू कडू यांचा समावेश होता. न्यायमूर्ती शुक्रे आणि न्यायमूर्ती गायकवाड यांनी जरांगे यांना आरक्षणासंदर्भातली न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगितली. सरकार टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे, सरकारला पुरेसा वेळ दिला तर आरक्षण नक्की मिळेल, अशी खात्री देत, शिष्टमंडळाने आणखी दोन महिने मुदत देण्याची मागणी केली. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर...

‘‘शिष्टमंडळाची ही मागणी मान्य करत जरांगे यांनी सरकारला दोन जानेवारीपर्यंत मुदत दिली. आपण आमरण उपोषण मागे घेत असून, साखळी उपोषण मात्र सुरू राहिल, असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याची मागणीही जरांगे यांनी शिष्टमंडळाकडे केली. - आकाशवाणी बातम्यांसाठी बाबासाहेब म्हस्के, जालना’’

मराठा आरक्षणासंदर्भात विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा करण्याचं आश्वासन शिष्टमंडळानं जरांगे यांना दिलं. हे अधिवेशन येत्या सात डिसेंबरपासून सुरु होणार आहे. आठ डिसेंबरला मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल, असं शिष्टमंडळानं सांगितलं.

दरम्यान, जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह सकल मराठा समाजाचे तसंच जरांगे यांच्याशी यशस्वी चर्चा केल्याबद्दल दोन्ही निवृत्त न्यायमूर्ती आणि शिष्टमंडळाचे आभार मानले आहे. राज्यात मराठा - कुणबी, कुणबी - मराठा असलेल्या आणखी नोंदी शोधण्याचं काम केलं जाईल, असं सांगितलं. ते म्हणाले...

‘‘राज्यामध्ये ज्या कुणबी नोंदी आहेत, त्या तपासल्या जातील. आणि त्यावर त्यांना कुणबी दाखले देण्याचा जो जी आर सरकारचा आहे, त्याची अंमलबजावणी पुरेपूर पूर्ण केली जाईल. आज जी मुदत दोन महिन्यांची आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त काम करून, या मराठा समाजाला न्याय कसा देता येईल, आणि त्याच बरोबर इतर जे काही समाज आहेत, त्या इतर समाजाला त्यांच्यावरही काही अन्याय न करता, जे काम आपल्याला करायचंय, त्यामध्ये सरकार कुठेही कमी पडणार नाही, अशा प्रकारचा निर्णय आज आपण घेतलेला आहे.’’

आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात पोलिस कायदेशीर कारवाई करतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दिवाळी तोंडावर आली असल्याने आंदोलकांनी इतर आंदोलनंही मागे घेण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

****

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात कालही विविध ठिकाणी निदर्शनं करण्यात आली.

जालना जिल्ह्यातल्या काही भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. जालना जिल्ह्यातली इंटरनेट सेवा मात्र बहाल करण्यात आली आहे.

लातूर तालुक्यातल्या भातांगळी पाटी इथं मराठा आंदोलकांनी लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर दोन तास घोषणाबाजी आणि चक्का जाम आंदोलन केलं. पोलीस प्रशासनानं मध्यस्थी करत आंदोलकांचं निवेदन स्वीकारून महामार्गावरची वाहतूक सुरळीत केली.

हिंगोली जिल्ह्यातही काल बावीसहून जास्त ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातून बाहेरगावी जाणारी आणि जिल्ह्यात येणारी सर्व वाहतूक ठप्प झाली होती.

छत्रपती संभाजीनगर शहरातही मुकुंदवाडी भागात रास्ता रोको आंदोलनं करण्यात आलं.

****

हिंगोली जिल्ह्यात कुणबी जातीच्या प्रमाणपत्र वाटपाला काल सुरुवात झाली. जिल्ह्यात पहिलं प्रमाणपत्र हिंगोली तालुक्यातल्या खंडाळा गावातल्या सुनील गायकवाड या युवकाला देण्यात आलं. जिल्ह्यात जुन्या निजामकालीन नोंदीत कुणबी जातीच्या तीन हजार तीस नोंदी सापडल्या असून, यातल्या नागरिकांनी अर्ज केल्यास त्यांना तात्काळ कुणबी दाखला दिला जाईल, असं हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातही कालपासून कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यात कुणबी दस्तऐवजांच्या आतापर्यंत पाचशे एकोणनव्वद नोंदी आढळून आल्या आहेत.

****

शिवसेना आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर काल सुनावणीला सुरुवात झाली. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात आपल्याला पक्षादेश मिळाला नसल्याचा दावा शिंदे गटातल्या आमदारांच्या वतीनं करण्यात आला. हा दावा खोडून काढत त्याबाबतचे पुरावे देण्यासाठी वेळ देण्याची मागणी ठाकरे गटाच्या वकिलांनी केली. त्यावर येत्या १६ तारखेपर्यंत कागदपत्रं सादर करावीत, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. यासंदर्भातली पुढची सुनावणी येत्या २१ तारखेला होणार आहे.

****

सर्वोच्च न्यायालयाने भिडे वाड्यासंदर्भातली याचिका काल फेटाळली. भिडे वाडयाचा ताबा पुणे महापालिकेला देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात भाडेकरूंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

****

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत फळ पीक विमा योजनेत केळी पिकाचा विमा भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. ही मुदत ३१ ऑक्टोबरला संपणार होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकरी विमा भरू शकले नव्हते. त्यामुळे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्राकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.

****

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं श्रीलंकेवर ३०२ धावांनी दणदणीत विजय मिळवत, उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. काल मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात आठ बाद ३५७ धावा केल्या. शुभमन गीलनं ९२, विराट कोहलीनं ८८, श्रेयस अय्यरनं ८२, रविंद्र जडेजानं ३५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेल्या श्रीलंकेचा संघ भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे अवघ्या ५५ धावांवर सर्वबाद झाला.

जसप्रित बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघा भारतीय गोलंदाजांनी आपल्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर प्रत्येकी एक गडी बाद केला. पाच षटकात एका निर्धाव षटकासह १८ धावा देत, पाच बळी घेणारा मोहम्मद शमी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

आज या स्पर्धेत लखनौ इथं अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स संघादरम्यान सामना होणार आहे.

****

गोव्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत काल रोल बॉल मध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने सुवर्ण, तर पुरुष संघाने रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत संजिवनी जाधवनं देखील रौप्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत महाराष्ट्र ५९ सुवर्णांसह एकूण १५८ पदकं जिंकून पहिल्या क्रमांकावर कायम आहे. सैन्य दल एकूण ३६ सुवर्णपदकांसह दुसऱ्या तर हरियाणा २८ सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

****

महिला आशियाई हॉकी स्पर्धेत काल रांची इथं झालेल्या सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण कोरियाचा पाच - शून्य असा पराभव केला. सलीमा टेटेनं दोन, तर नवनीत कौर, वंदना कटारिया आणि नेहाने प्रत्येकी एक गोल केला. या विजयासोबत भारतीय संघ १५ गुणांसह गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे. 

****

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं छत्रपती संभाजीनगर इथलं पर्यटक निवास राज्यातलं पहिलं पूर्णत: महिला संचालित पर्यटक निवास म्हणून पर्यटकांच्या सेवेत दाखल झालं आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी ही माहिती दिली. सगळ्या महिला कर्मचारी असलेल्या या पर्यटक निवासाचं उद्घाटन काल बंगाली पर्यटक सुतापा चॅटर्जी यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लातूर शहरात एक हजार २२३ नव्या लाभधारकांचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाला असून, शहरातल्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घेत लवकरात लवकर बांधकामं सुरू करावीत, असं आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केलं आहे. पूर्वी परवानगी मिळालेल्या मात्र बांधकामं सुरू न केलेल्या लाभधारकांनी आता काम सुरू केलं नाही, तर मंजूर झालेलं घरकुल रद्द करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून केली जाईल, असंही आयुक्तांनी सांगितलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या आर्दश पतसंस्थेच्या जप्त केलेल्या मालमत्ता लिलावास प्रतिसाद मिळत नसल्यानं, त्या मालमत्ता शासनाने खरेदी करून गोरगरिब ठेवीदारांची दिवाळी आनंदी करावी, अशी मागणी, खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात प्राणीक्लेष प्रतिबंधक अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत. ते काल जिल्हास्तरीय प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत बोलत होते. कोणत्याही भटक्या किंवा पाळीव प्राण्यांवर अत्याचार किंवा अमानवीय कृत्य होताना आढळल्यास जिल्हास्तरीय प्राणीक्लेष प्रतिबंधक सोसायटी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन गावडे यांनी नागरिकांना केलं आहे.

****

No comments: