Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date: 04 November 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०४ नोव्हेंबर
२०२३ दुपारी १.०० वा.
****
रायगड जिल्ह्यात महाड इथल्या ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये काल सकाळी
लागलेली आग आता आटोक्यात आली असून रात्री उशिरा राष्ट्रीय आपत्ती दलाची तुकडी दुर्घटना
स्थळी पोहचली
आहे. अंधारामुळं बचावकार्यात अडथळा येत होता. आज सकाळी बचाव कार्य पुन्हा सुरू करण्यात आलं. या स्फोटात
आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह हाती लागले असून उर्वरित बेपत्ता कामगारांचा तपास
सुरू आहे. दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांनी दुर्घटना
स्थळी काल रात्री भेट दिली. दुर्घटनाग्रस्त व्यक्तीच्या नातेवाइकांना जास्तीत
जास्त सहकार्य करू असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या शेंडी बायपास जवळ नगरच्या महाराष्ट्र
औद्योगिक विकास महामंडळाचा सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याला एक कोटी रुपयांची लाच
घेताना नाशिक इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहाथ अटक केली. एवढ्या मोठ्या रकमेची लाच घेताना कारवाई झालेली राज्यातली ही पहिली घटना आहे.
या संदर्भात काल रात्री उशिरा अहमदनगरच्या
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
अकोला इथले भाजप नेते तथा अकोला पश्चिम विधानसभेचे
आमदार गोवर्धन मांगीलाल शर्मा यांचं काल अकोल्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ७४ वर्षाचे होते. काही महिन्यांपासून ते आजारी होते.
१९९५ पासून सातत्यानं पूर्वीच्या अकोला मतदारसंघातून ते भाजपच्या तिकिटावर
आमदार म्हणून निवडून आले. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पार्थिव
देहावर आज दुपारी ३ वाजता अकोल्यातील मोक्षधाम इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचं येत्या महिन्याभरात काँक्रीटीकरण करण्यात येणार
असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.
ते मुंबईत विरारमध्ये वसई जनता सहकारी बँकेच्या सुवर्णजयंती सोहळ्यात
बोलत होते. या महामार्गावर १० फूट पुलाचं कामही करण्यात येणार
असून प्रस्तावित दिल्ली मुंबई एक्सप्रेस-वे या महामार्गाला वसईशी देखील जोडण्यात येणार
असल्याचं मंत्री गडकरी म्हणाले.
****
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बंगळुरू
इथं न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड
संघानं ३१ षटकांत एक बाद २१८ धावा केल्या आहेत.
तसंच आजच्या दिवसातील दुसरा
सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुपारी दोन वाजता अहमदाबाद इथं खेळला जाणार
आहे.
****
केंद्र सरकारच्या विशेष समितीकडून पीएम ई बस सेवा प्रकल्पा अंतर्गत कोल्हापूर महापालिकेसाठी
शंभर ई बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. दोन महिन्यात
या बसेस कोल्हापूरमध्ये दाखल होतील अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
या बसेस वातानुकूलित असतील आणि सांगली, मिरजपर्यंत
धावतील.
****
मानवी तस्करी बाबत जनजागृतीसाठी ओएसिस इंडिया या सामाजिक संस्थेच्या वतीनं मुक्ती
बाईक चॅलेंज २०२३ चं २८ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आलं
आहे. काल रात्री ही राईड नवी मुंबईत दाखल झाली.
या रायडर्संनी बंगळुरू ते मुंबई या मार्गावर दीड हजार किलोमीटरचा प्रवास
केला आहे. तस्करीची चिन्हं ओळखणं आणि महिला आणि मुलांचं संरक्षणाबद्दल
या राईडच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
****
केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाद्वारा
संचालित लातूर जिल्ह्यातल्या जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी
येत्या सात नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी
इयत्ता नववी आणि अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून
याविषयीची संपूर्ण माहिती संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं शासकीय अल्पसंख्यांक
मुलींच्या वसतीगृहामध्ये चालू शैक्षणिक वर्षाकरता प्रवेश देणं चालू आहे. या वसतीगृहामध्ये अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या पात्रता
धारक सर्व गरजू मुलींसाठी ७० टक्के तसंच इतर समाजातील ३० टक्के मुलींना प्रवेश देण्यात
येतो. अधिकाधिक मुलींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून करण्यात आलं आहे.
****
गोव्यातल्या पणजी इथं सुरू असलेल्या
३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी काल नवव्या दिवशी महाराष्ट्राच्या संघानं अग्रस्थान अबाधित राखलं. महाराष्ट्रानं
आतापर्यंत ६३ सूवर्ण, ५६ रौप्य आणि ५७ कांस्यपदकांसह एकूण
१७६ पदके जिंकली आहेत.
****
No comments:
Post a Comment