Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 November
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
· अंमली पदार्थ प्रकरणात दोषींविरोधात कठोर कारवाईचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री
देवेंद्र फडणवीस यांचे संकेत.
· राज्यभरातल्या २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान
· भरडधान्य हे मुख्य अन्न आणि मुख्य पीक असावं-पद्मश्री राहीबाई पोपरे यांचं आवाहन
आणि
· अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा-निळवंडे धरणातून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात
येणार
****
अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना
राबवली जाणार असून,
या संदर्भातल्या दोषींविरोधात कठोर कारवाईचे संकेत उपमुख्यमंत्री
तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
अमंली पदार्थांच्या प्रकरणात पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळून आला, तर
त्यांना निलंबित नव्हे तर थेट बडतर्फ केलं जाईल, असं फडणवीस यांनी स्पष्ट
केलं. ते म्हणाले -
ड्रगच्या संदर्भात जे जे लोकं, कुठल्या
प्रकारचा व्यवहार करत असतील, त्याच्यामध्ये
जे जे लोक इनव्हॉल्व असतील, जेवढे
कडक कायदे असतील ते सगळे कायदे त्यांच्यावर लावण्यात येतील. आपण ड्रग फ्री महाराष्ट्र
हे अभियान सुरु केलं आहे. मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण छापे टाकत आहोत.
आणि एक मोठी लढाई ही लढावी लागणार आहे. पण ही राष्ट्रीय स्तरावर देखील आता आपण लढणं
सुरु केलं आहे. जे अपराधी असतील त्यांच्यावर तर कडक कारवाई होईलच, पण जे पोलिसवाले त्याच्यामध्ये इनव्हॉल्व निघतील त्यांना केवळ सस्पेंड नाही, तर ३११ प्रमाणे त्यांना डिसमीस केले जाईल.
****
राज्यभरातल्या २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या
सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे. याबरोबरच राज्यातल्या २ हजार ९५०
सदस्य आणि १३० सरपंचांच्या रिक्तपदांची पोटनिवणूक होत असून त्यासाठीही उद्या मतदान
होणार आहे.
****
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना
मंत्री दादा भुसे यांची बदनामी केल्याप्रकरणी मालेगांव न्यायालयाने राऊत यांच्या विरुद्ध
वॉरंट जारी केलं आहे. राऊत यांना आज न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश मालेगावचे अतिरिक्त
मुख्य न्यायदंडाधिकारी तेजवंतसिंग संधू यांनी दिले होते. मात्र मराठा आरक्षण आंदोलनामुळे
राजकीय नेत्यांना केलेली गावबंदी यामुळे आपण न्यायालयात उपस्थित राहू शकत नसल्याचं
राऊत यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं. दोन्हीही बाजूंचा युक्तिवाद ऐकत न्यायलयाने
५० हजार रुपयांच्या जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
****
मराठा समाजास मराठा कुणबी, कुणबी
मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली
स्थापन झालेल्या समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यभर करण्याच्या शासन निर्णयावर मराठा
आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या शासन निर्णयाची प्रत
आज शासनाच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर इथं प्रत्यक्ष
भेटून दिली. तसच त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. या समितीत रोजगार हमी योजना
आणि फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण
मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे, मुख्यमंत्र्यांचे
विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांचा समावेश होता. शिंदे समितीची व्याप्ती संपूर्ण
राज्यासाठी झाल्याने राज्यभरातील समाज बांधवांना न्याय मिळेल, अशी
अपेक्षाही जरांगे यांनी व्यक्त केली. जरांगे यांच्यावर संभाजीनगरच्या एका खासगी रुग्णालयात
उपचार सुरु आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी
मनोज जरांगे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांची चौकशी केली. माजी खासदार युवराज
संभाजीराजे छत्रपती यांनीही जरांगे यांची आज रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.
****
दिवाळीच्या काळात खासगी बस चालकांनी आणि
कंपन्यांनी तिकीट दराची जास्त आकारणी केल्यास कडक कारवाईचा इशारा, पुण्याचे
प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिला आहे. पुणे इथं सर्व खासगी बस मालकांची
बैठक नुकतीच घेण्यात आली,
त्यावेळी ते बोलत होते. दिवाळीच्या काळात खासगी बस एसटी तिकीट
दराच्या ५० टक्क्यांहून अधिक दर आकारून प्रवाशांची आर्थिक लूट करतात, त्यामुळे
बस चालकांनी अशी दरवाढ करू नये, अशी सूचना परिवहन अधिकाऱ्यांनी केली आहे.
असा प्रकार घडल्यास संबंधित बस आणि चालकांवर देखील कडक कारवाईचा इशारा भोर यांनी दिला
आहे.
****
भरडधान्य हे आपलं मुख्य अन्न असावं आणि तेच
आपण आपल्या शेतात पिकवावं,
असं आवाहन बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी केलं आहे. अहमदनगर
जिल्ह्यात राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात आज आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य
वर्षा निमित्त घेण्यात आलेल्या 'शाश्वत श्री अन्न शेती' या
विषयावरील राज्यस्तरीय परिषदेत त्या बोलत होत्या. आपण केलेलं कार्य प्रत्येक शेतकऱ्यांपर्यत
पोहोचायला हवं,
असं पोपरे म्हणाल्या. पौष्टिक तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याला
दोन पैसे अधिक मिळावेत आणि त्याचबरोबर शहरातील ग्राहकालाही तृणधान्य वाजवी दरात उपलब्ध
व्हावं, अशी अपेक्षा कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार यांनी यावेळी व्यक्त केली.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा-निळवंडे
धरणातून पैठणच्या जायकवाडी धरणासाठी प्रवरा नदीमार्गे पाणी सोडण्यात येणार आहे. नदीपात्रामध्ये
पाणी सोडल्यानंतर काही ठिकाणी कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यात शेतकरी बर्गे टाकण्याचा
प्रयत्न करण्याची शक्यता असते. तसंच प्रवाह कालावधीत अनधिकृत पाणी उपसा होण्याची शक्यताही
नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर प्रवरानदीवरील नेवासा तालुक्यातल्या पाचेगाव, पुनतगाव
आणि मधमेश्वर बंधारा परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. अहमदनगर विभागाचे
उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
****
दरम्यान, मराठवाड्याच्या हक्काच्या
पाण्यासाठी किसान सभेने परवा सोमवारी गोदावरी मराठवाडा सिंचनविकास महामंडळावर धडक सत्याग्रहाचा
इशारा दिला आहे. जायकवाडी प्रकल्पासाठी २० हजार दशलक्ष घनफूट आणि माजलगाव
प्रकल्पासाठी पाच हजार दशलक्ष घनफूट पाणीवाटा वरच्या धरणातून तत्काळ उपलब्ध करून द्यावा, तसंच
या दोन्ही प्रकल्पातील संपूर्ण लाभ क्षेत्रासाठी रब्बी आणि उन्हाळी १२ पाणी पाळ्या
उपलब्ध करा. यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
****
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज बंगळुरू इथं
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड
संघानं ५० षटकांत ६ बाद ४०१ धावा करत पाकिस्तानसमोर ४०२ धावांच लक्ष्य ठेवलं आहे.
अहमदाबाद इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात
ऑस्ट्रेलियानं २८६ धावा करत इंग्लंडसमोर २८७ धावांचं आव्हान ठेवलं आहे.
****
गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या ३७ व्या
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आतापर्यंत ६३ सूवर्ण, ५६
रौप्य आणि ५७ कांस्यपदकांसह एकूण १७६ पदके जिंकली आहेत. या स्पर्धेत सेनादल दुसऱ्या
आणि हरियाणा तिसऱ्या स्थानावर आहे.
****
मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून छत्रपती
संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या नाट्य
शास्त्र विभागाने रंगभूमी समोरील आव्हाने आणि उपाय या विषयावर परिसंवादाचं आयोजन केलं
आहे. विद्यापीठाच्या चिंतन गाह परिसरात उद्या सकाळी साडेदहा वाजता हा परिसंवाद होणार
आहे. शहरातील रंगकर्मी, नाट्य रसिकांनी परिसंवादा मध्ये सहभागी व्हावं
असं आहवान विभाग प्रमुख डॉ राजू सोनवणे यांनी केले आहे.
****
पालघर इथं गुजरात आणि राज्यस्थान इथून अवैधरित्या
राज्यात विक्रीस आणला जाणारा खवा अन्न आणि औषध प्रशासनाने ताब्यात घेतला आहे. अन्न
आणि औषध प्रशासनानं काल रात्री उशिरा ही कारवाई केली.
****
नांदेड इथं अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्यावतीने
भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा सुमारे २८ हजाराहून अधिक रकमेचा साठा नष्ट केला आहे.
देगलूर नाका परिसरातल्या एका डेयरीतून सुमारे ७० किलो खवा तर १७८ किलो दही नष्ट करण्यात
आलं.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या शेंडी बायपास जवळ
नगरच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा सहाय्यक अभियंता किशोर गायकवाड याला एक
कोटी रुपयांची लाच घेताना नाशिक इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहाथ
अटक केली. एवढ्या मोठ्या रकमेची लाच घेताना कारवाई झालेली ही राज्यातली पहिली घटना
आहे.
****
अकोला इथले भारतीय जनता पक्षाचे नेते तथा
अकोला पश्चिम विधानसभेचे आमदार दिवंगत गोवर्धन मांगीलाल शर्मा यांच्या पार्थिव देहावर
आज अकोला इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शर्मा
यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली,
****
लातूर जिल्ह्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर
आजपासून ‘आनंदाचा शिधा’ वितरण सुरु
करण्यात आले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात पात्र लाभधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला. जिल्ह्यात सुमारे चार लाख सहा हजार कुटुंबांना ‘आनंदाचा
शिधा’ वितरीत केला जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment