Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 November 2023
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
· कुणबी नोंदी शोधमोहीम संपूर्ण राज्यभर मिशन मोडवर राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश;मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेला गती देण्याची सूचना
· एसटीची सरसकट १० टक्के भाडेवाढ;आठ ते २७ नोव्हेंबर कालावधीत वाढीव प्रवासभाडे लागू
· मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यास विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल
· दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील जालना ते उस्मानपूर रेल्वेमार्गाचं विद्युतीकरण पूर्ण
आणि
· एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानचा नेदरलँडवर सात गडी राखून विजय
****
मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी राबवण्यात आलेली मोहीम आता संपूर्ण राज्यभर मिशन मोडवर राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत आपल्या शासकीय निवासस्थानी यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देतानाच मराठा आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीच्या कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला संकेतस्थळावर अपलोड करण्याची सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. या कामाच्या संनियत्रणासाठी मंत्रालयस्तरावर अपर मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यकक्षा आता राज्यभर वाढवण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली. मागासवर्ग आयोगाला इम्पॅरीकल डेटासाठी आवश्यक ती माहिती सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर महिन्याभरात उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
मराठवाड्यात शिंदे समितीनं शिफारस केलेल्या पुराव्यांच्या आधारे कुणबी मराठा, मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतिमान करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
****
विभागात सर्वच जिल्ह्यात पात्र नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे.
बीड इथं काल प्रातिनिधीक स्वरूपात पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्रं प्रदान करण्यात आली. येत्या काळात बीड जिल्ह्यात, शिरूर तसंच गेवराई तालुक्यात विशेष शिबीरं भरवून जात प्रमाणपत्र उपलब्ध करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातल्या वरखेड इथले शैलेश दशरथ घोडके आणि तुकाराम भुजंगराव गरुड या दोन युवकांना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्यात आलं.
लातूर जिल्ह्यात प्रातिनिधिक स्वरुपात भिसे-वाघोली इथल्या ग्रामस्थांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे.
धाराशिव जिल्ह्यात पात्र व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी सहा ते आठ नोव्हेंबर या कालावधीत विशेष शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील बारा विभागांच्या ज्या अभिलेखांमध्ये कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अशा नोंदी आढळून आलेल्या आहेत, असे विभागनिहाय अभिलेखे धाराशिव जिल्ह्याच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर, नांदेड तसंच हिंगोली जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून कुणबी प्रमाणपत्र वाटपला प्रारंभ झाला आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेसाठी नागरिकांच्या लक्षणीय उपस्थितीमुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं होतं. या ४४१ बाधित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ३२ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. एखाद्या सभेमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयाचं शेतकरी बांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनावेळी अंतरवाली सराटी इथं झालेल्या लाठीमारात जखमी झालेल्या आंदोलकांवरील उपचारासाठीही मुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून २५ लाखांहून अधिक रुपयांचं अर्थसहाय्य केलं आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बीड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळ, दगडफेकीत सुमारे ११ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. या प्रकरणात आतापर्यंत ६५ गुन्हे दाखल झाले असून ११९ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. ज्यांच्याकडे जाळपोळ, दगडफेक घटनेचे चित्रीकरण किंवा छायाचित्रं असतील, त्यांनी ते पोलीस प्रशासनाला द्यावेत असं आवाहन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात एसटी बस सेवा कालपासून पूर्ववत झाली, त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या पाच दिवसांत दररोजच्या अडीच हजार फेऱ्यातून दिवसाकाठी मिळणारं सुमारे ५० लाख रुपयांचं उत्पन्न ठप्प झाल्यामुळे एसटी ला पाच दिवसांत जवळपास अडीच कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्य परिवहन महामंडळानं या दिवाळीच्या हंगामात आपल्या सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही भाडेवाढ ७ नोव्हेंबर च्या मध्यरात्रीपासून म्हणजे आठ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे. त्यानंतर मूळ तिकीट दराप्रमाणे तिकीट आकारणी सुरू होईल. ज्या प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षण केलेलं आहे, त्यांना प्रवासादरम्यान, तिकीटाची फरकाची रक्कम वाहकाकडे भरावी लागणार आहे.
****
राज्यातील सर्व शाळांमध्ये निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी 'सखी सावित्री' समिती गठन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील एका महिन्यात सर्व शाळांमध्ये या समित्यांचं गठन करावं, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल दिले.
****
नाशिक जिल्ह्यातल्या धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यास विरोध करणारी याचिका नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असतांनाही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मराठवाड्याला पाणी सोडण्यासंदर्भात सातत्यानं प्रयत्न केले जात असल्याचं, आमदार फरांदे यांनी म्हटलं आहे. गंगापूर आणि दारणा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याची अधिसूचना पाटबंधारे विभागाने दोन दिवसांपूर्वी काढली होती. त्यावर आमदार फरांदे यांनी स्थगिती आणली. फरांदे यांच्या या याचिकेवर येत्या सात नोव्हेंबर रोजी मुंबईत सुनावणी होणार आहे. दरम्यान, जायकवाडी धरणात सध्या ४५ पूर्णांक ५६ शतांश टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील जालना ते उस्मानपूर या ५३ पूर्णांक चार दशांश किलोमीटरचं विद्युतीकरण पूर्ण झालं आहे. मनमाड - मुदखेड - ढोणे या रेल्वेमार्ग विद्युतीकरणाचा भाग असलेल्या या मार्गावर आता मनमाड ते उस्मानपूर असं एकूण २२८ किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं आहे. उर्वरित उस्मानपूर ते धर्माबाद रेल्वेमार्गाचं काम प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्ण होईल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं दिली आहे.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल लखनौ इथं झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं नेदरलँडचा सात गडी आणि १८ षटकं राखून पराभव केला. नेदरलँडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत सत्तेचाळीसाव्या षटकांत सर्वबाद १७९ धावा केल्या. अफगाणिस्तानने हे लक्ष्य ३२ व्या षटकांत तीन गड्यांच्या बदल्यात साध्य केलं.
आज या स्पर्धेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया तसंच न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात सामना होणार आहे.
****
गोव्यामध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळांडूंची आगेकूच सुरू आहे. महाराष्ट्राच्या पलक जोशी हिनं १०० मीटर पोहण्याच्या स्पर्धेत बॅकस्ट्रोक या प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. महाराष्ट्रानं आत्तापर्यंत १६४ पदकांची कमाई करत पदकतालिकेतलं आपलं प्रथम स्थान कायम राखलं आहे. यात ६० सुवर्णपदकांचा समावेश आहे. ४३ सुवर्णांसह एकूण ७४ पदकं मिळवत सैन्यदलानं द्वितीय तर ३२ सुवर्णांसह ८९ पदकं मिळवत हरियाणानं तिसरं स्थान कायम राखलं आहे.
****
बीड जिल्ह्यातील एकूण ११ तालुक्यातल्या १२५ शाळांमधल्या विद्यार्थिंनींसाठी रत्नदीप चॅरिटी ट्रस्टचे राजीव मेहता यांच्याकडून थ्रोबॉल या क्रीडाप्रकाराचं साहित्य देण्यात आलं. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे हे साहित्य सुपूर्द केलं.
****
पुस्तकाचं गाव योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळचा समावेश करण्यात आला आहे. वेरुळसह गोंदिया जिल्ह्यातल्या नवेगाव बांध, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोंभूर्ले आणि सांगली जिल्ह्यातल्या अंकलखोप औंदुंबर इथं या योजनेचा विस्तार करण्यास सरकारनं मान्यता दिली आहे. याठिकाणी दर्जेदार पुस्तकं उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment