Saturday, 18 November 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 18.11.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 November 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १८ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      गगनयान आणि आदित्य-एल वन मोहिमेमुळे मानवतेला मोठी मदत होणार - राष्ट्रपतींचं प्रतिपादन

·      विकसित भारत संकल्प यात्रेला नाशिक तसंच नांदेड जिल्ह्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

·      जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मराठवाडा पाणी जन आंदोलन समितीचा आंदोलनाचा इशारा

आणि

·      एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उद्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना

****

गगनयान आणि आदित्य-एल वन मोहिमेमुळे अंतराळ क्षेत्रातच भारताचा दर्जा उंचावण्यासोबतच मानवतेलाही मोठी मदत होणार असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज नवी दिल्ली इथं २०४७ मधील एरोस्पेस आणि हवाई वाहतूक' या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद तसंच प्रदर्शनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. संरक्षण आणि वाहतुकीसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान तयार करून एरोस्पेस क्षेत्र परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे. या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचं कौशल्य वाढवण्याच्या गरजेवर राष्ट्रपतींनी आपल्या मार्गदर्शनातून भर दिला.

****

आधुनिक पद्धतीने मत्स्य शेती करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याची गरज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते आज महाराष्ट्र पशु मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. पारंपारिक शेती सोबत मत्स्यव्यवसाय क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधलं.

****

केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्तानं कल्याणकारी योजनांची माहिती देणारा रथ नाशिक जिल्ह्यातील विविध भागात तसंच आदिवासी बहुल भागात फिरवण्यात येत आहे. आज नाशिक - हरसूल मार्गावर धोंडे गाव इथं या रथाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत, पंतप्रधान मातृ वंदना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, उज्वला योजना, अमृत आहार योजना तसंच बचत गटांसाठी कर्ज योजना आदी विविध योजनांची माहिती देण्यात आली. ज्यांनी या पूर्वी अशा योजनांचा लाभ घेतला आहे, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून अन्य नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणांशी कशा प्रकारे संपर्क साधावा याविषयी माहिती देण्यात आली. अशाच एक लाभार्थी उज्ज्वला दाते यांनी आपला अनुभव या शब्दांत कथन केला -

उज्ज्वला दाते बाईट

****

विकसित भारत संकल्प यात्रेला किनवट तालुक्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी किनवट तालुक्यातील घोटी आणि कमठाळा इथं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती संकल्प रथाच्या माध्यमातून देण्यात आली. आयुष्यमान भव योजनेअंतर्गत जवळपास ४०० लाभार्थ्यांची यावेळी नोंदणी करण्यात आली तर शंभर जणांना आयुष्यमान भव कार्डचें वाटप करण्यात आलं. जिल्हा परिषद, आदिवासी प्रकल्प कार्यालय यांच्यासह राष्ट्रीयकृत बँका, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक, आरोग्य विभाग यांच्यासह इतर विभागांनी आपल्या योजनांच्या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांना माहिती दिली. यावेळी किनवटचे गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, तालुका अधिकारी डॉ. के.पी. गायकवाड, एसबीआय बँकेचे सह व्यवस्थापक अशोक मेहता, ग्रामविकास अधिकारी एस. एस. बल्लूरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

****

विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील केंद्रीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवावा यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. ते आज सोलापूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात हा उपक्रम नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होऊन तो २६ जानेवारी २०२४ पर्यंत राहणार आहे. या दरम्यान केंद्र शासनाकडून आलेले विविध संदेश आणि योजनांच्या माहितीचं प्रसारण पाच चित्ररथांच्या माध्यमातून प्रत्येक गावात चांगल्या पद्धतीने होईल यासाठी सूक्ष्म नियोजन करावं, असंही त्यांनी सूचित केलं.

****

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयातही 'विकसित भारत संकल्प यात्रा' या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात आज आढावा बैठक घेण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याच्या सूचना बुलडाणा जिल्हा यंत्रणेच्या विभाग प्रमुखांना मोहिमेचे प्रमुख रोशन थॉमस यांनी दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, यांच्यासह जिल्हा यंत्रणेचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

****

मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करण्याकरता संसदेचं विशेष सत्र बोलावण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं पत्र शिवसेनेच्या वतीनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर करण्यात आलं आहे. या पत्रावर विधान परिषदेतले विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार संजय जाधव यांच्यासह शिवसेनेच्या खासदार तसंच आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

****

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी येत्या सोमवारी २० तारखेला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा मराठवाडा पाणी जन आंदोलन समितीने दिला आहे. समितीचे समन्वयक तथा माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेमध्ये हा इशारा दिला. या आंदोलनामध्ये उद्योजक, विविध सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक संस्था देखील सहभागी होणार असल्याचं पटेल यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेला विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी सहभागी उपस्थित होते. जायकवाडी धरणात वरच्या धरणातून पाणी सोडण्यात यावं यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचंही पटेल यांनी सांगितलं.

****

प्रबोधिनी कार्तिकी एकादशीचा सोहळा येत्या गुरुवारी साजरा होत आहे. या निमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांची पंढरपुरात मोठी गर्दी होत असते. या काळात जास्तीत जास्त वारकरी भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता यावे, यासाठी विठुरायाचे २४ तास दर्शन सुरु करण्यात आले. ३० नोव्हेंबरपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर अहोरात्र सुरू राहणार आहे.

****

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना उद्या अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी क्रीडा संकुलावर उद्या खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या या सामन्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उप-पंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांच्यासह अनेक मान्यवर या सामन्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या सामन्याच्या प्रारंभी दोन्ही संघांचं राष्ट्रगीत होताच, हवाई दलातील सूर्यकिरण विमानांचा ताफा आकर्षक सादरीकरण करणार आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी विशेष बैठक घेऊन उद्याच्या सामन्यासाठी सुरक्षा, स्वच्छता आणि वाहतूकीच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.

या सामन्यासाठी क्रिकेट रसिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं मुंबई ते अहमदाबाद दरम्यान तीन जलदगती रेल्वे अतिरिक्त शुल्कासहीत चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वे गाड्या मुंबई सेंट्रल, बांद्रा टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणार आहेत.

****

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं छत्रपती संभाजी नगर इथं येत्या सोमवारपासून ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली आहे. जालना, वाळूज आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या नऊ नाट्य संस्था यात नाट्य सादरीकरण करणार आहेत. २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत शहरातील तापडिया नाट्यमंदिर इथं सायंकाळी सात वाजता दररोज एक नाटक सादर होणार आहे.

****

रेल्वेमध्ये तसंच रेल्वे स्थानक परिसरात ज्वलनशील पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी नांदेड रेल्वे विभागानं दिवाळी आणि त्यापूर्वी सुमारे महिनाभराच्या कालावधीत तपासणी मोहीम राबवली. या दरम्यान, रेल्वेच्या आवारात धूम्रपान करणाऱ्या शंभर जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. रेल्वे तसंच रेल्वे स्थानकांवर कोणत्याही ज्वलनशील आणि स्फोटक वस्तू बाळगू नयेत, धूम्रपान करू नये असं आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीती सरकार यांनी केलं आहे.

****

No comments: