Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 November
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
· ५४ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव-इफ्फीचं गोव्यात दिमाखदार सोहळ्यात
उद्घाटन.
· विकसित भारत संकल्प यात्रेच्या माहिती रथांचं नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यात
उत्साहात स्वागत.
· जायकवाडी पाणी प्रश्नी छत्रपती संभाजीनगर इथं सर्वपक्षीय आंदोलन.
आणि
· लातूर जिल्ह्यात महा रेशीम अभियानाला प्रारंभ.
****
५४ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव-
इफ्फीचं आज गोव्यात पणजी इथं दिमाखदार सोहळ्यात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री
अनुरागसिंह ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या महोत्सवामध्ये चार पडद्यांवर
यंदा २७० पेक्षा जास्त चित्रपट दाखवले जाणार आहेत. यामध्ये भारतातील २५ फीचर फिल्म
आणि २० बिगर फीचर फिल्म्सचा समावेश आहे. हॉलीवुड अभिनेते आणि निर्माते मायकेल डग्लस
यांना यंदाचा सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कार देऊनं गौरवण्यात येणार आहे. ठाकूर यांनी
याबाबत बोलताना आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या -
मायकल डग्लस एक बहोत बडे नेता दुनियाभर मे जाने जाते है। अपनी ॲक्टींग,
अपने हर तरह के रोल के लिये फिल्मों मे। और सत्यजित रे लाईफटाईम अवॉर्ड उनको मिलना
और उनका खुद एक्सेप्ट करना, मुझे लगता है, एक अच्छा संकेत है, उन्होंने एक्सेप्ट भी
कर लिया। स्वयं भी यहां रहेंगे अपने परिवार के साथ मे।
दरम्यान, ठाकूर यांच्या हस्ते
फिल्म बाजारचंही उद्घाटन झालं. हा दक्षिण आशियातील सर्वात मोठा जागतिक चित्रपट बाजार
आहे. या अंतर्गत,
दक्षिण आशियातील चित्रपट-आशय आणि प्रतिभांना पाठबळ देत चित्रपट
निर्मिती आणि वितरणात मदत केली जाते. या संदर्भात बोलताना अनुरागसिंह ठाकूर म्हणाले -
फिल्म बाजार साऊथ ईस्ट एशिया का ही नही अब दुनिया के बडे बाजारों
मे से एक है। और ये फिल्म बाजार के बढते हुये कदम मेडिया अँड एंटरटेनमेंट के लिये अच्छे
कदम भी है। मुझे पूर्ण आशा है, जिस तरह से हजारो पिक्चरों का इस बार सबमिशन हुआ है
इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल के लिये, ये लगातार इफ्फि के बढते कदम को दिखाता है।
****
भंडारा इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
उपस्थितीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
अजित पवार यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासनाच्या विविध योजनांच्या
लाभाचे लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आलं. भंडारा जिल्ह्यात विविध
योजनांसाठी सहा लाख ३८ हजार लाभार्थींची नोंदणी झाली असून यातील दोन लाख १० हजार लाभार्थ्यांना
सुमारे ३०४ कोटींचे लाभ देण्यात येत आहेत.
****
जालन्यातल्या अंतरवाली सराटी इथं झालेल्या
लाठीचार्जचे आदेश हे त्या परिस्थितीनुसार पोलीस अधिकाऱ्यांनी दिले असून या आदेशासाठी
गृहमंत्री किंवा पोलीस महासंचालक यांना विचारणा करण्याचा काही प्रश्न नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते.
हेच सत्य आज चौकशीअंती बाहेर आल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून
नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पहिल्या टप्प्यात सोळा गावांमध्ये केंद्र आणि राज्य
शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे. सोमवारी बोधडी आणि थारा इथं ही यात्रा
पोहोचली. संकल्प रथाच्या माध्यमातून चित्रफितीद्वारे गावकऱ्यांना विविध योजनांची माहिती
देण्यात येत आहे. या संकल्प रथाचे अंगणवाडी बालक, शालेय विद्यार्थी तसंच
गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. या योजनांच्या लाभार्थ्यांनी नागरिकांना
योजनांचं लाभ घेण्याचं आवाहन केलं. पृथ्वी पडियार तसंच अशोक गाडेकर यांनी आपलं मनोगत
या शब्दांत कथन केलं -
बाईट - पृथ्वी
पडियार आणि अशोक गाडेकर
यावेळी गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव
वैद्यकीय अधिकारी डॉ. के. पी. गायकवाड, विस्तार अधिकारी एन. एम. मुकणार
यांनी गावकऱ्यांना योजनांची माहिती दिली. दरम्यान ही संकल्प यात्रा उद्या मंगळवारी
जलधारा आणि नंदगाव तांडा इथं पोहोचणार आहे.
****
संविधान दिनानिमित्त संसदीय कार्य मंत्रालयाने
नागरिकांसाठी संविधान प्रश्नमंजुषा आणि प्रस्तावनेची ऑनलाईन वाचन स्पर्धा आयोजित केली
आहे. यात सहभागी होण्यासाठी यासंदर्भातील संकेतस्थळाला भेट देऊन संविधानाची प्रस्तावना
वाचून नागरिकांना स्पर्धेत सहभागाचे प्रमाणपत्र मिळू शकते. ही प्रस्तावना देशातल्या
२२ राष्ट्रीय भाषांमध्ये वाचता येणार आहे. दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन
म्हणून पाळण्यात येतो.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ नोव्हेंबर
ला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. नागरिकांना
आपल्या विविध कल्पना आणि सूचना, माय जीओव्ही ओपन फोरम किंवा नमो या भ्रमणध्वनी
ॲपद्वारे, अथवा एक-आठ-शून्य-शून्य एक-एक-सात-आठ शू्न्य-शून्य या नि:शुल्क क्रमांकावरही पाठवता
येणार आहेत.
****
समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार, जायकवाडी
धरणात, अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्याबाबत दिलेल्या आदेशाची त्वरीत
अंमलबजावणी करावी,
या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं गोदावरी पाटबंधारे मराठवाडा
विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर आज मराठवाडा पाणी जनआंदोलन समितीतर्फे सर्वपक्षीय
आंदोलन करण्यात आलं. मराठवाड्याला न्याय हक्काचं पाणी मिळावं. मराठवाडा दुष्काळमुक्त
होण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा आदी मागण्या आंदोलकांनी केल्या. या आंदोलनात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश टोपे, भारतीय जनता पक्षाचे हरिभाऊ
बागडे, शिवसेनेचे संजय शिरसाट,
अर्जुन खोतकर, कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्यासह
विविध सामाजिक संघटना,
शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीडसह
अनेक जिल्ह्यातले शेतकरी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे
वाहतुकीवर काही काळ परिणाम झाल्याचं दिसून आलं.
****
लातूर जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना
रेशीम शेतीसाठी प्रोत्साहित करावे. तसेच सध्या रेशीम शेती परिसरात क्लस्टर निर्मितीसाठी
प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी
कार्यालय परिसरात 'महा रेशीम अभियान २०२४'
अंतर्गत जिल्हा रेशीम कार्यालयाने तयार केलेल्या रेशीम रथाच्या
उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे बोलत होत्या. जिल्ह्यात आजपासून ते २० डिसेंबर
पर्यंत महा रेशीम अभियान राबवले जात आहे. या काळात रेशीम शेतीची माहिती देण्यासाठी
जिल्हा रेशीम कार्यालयाने तयार केलेला रेशीम रथ पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातल्या ५२
गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना रेशीम शेतीबाबत माहिती देणार आहे. शासनामार्फत महात्मा
गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रेशीम शेतीसाठी ३ लाख ९७ हजार रुपयांपर्यंतचे
अनुदान दिले जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
वाचन संस्कृतीच्या जनजागृतीसाठी परभणी इथले
प्राथमिक शिक्षक विनोद शेंडगे यांनी सायकलने परभणी ते नागपूर प्रवास केला. वाचन संस्कृती
वाढवण्यासाठी छोटे छोटे प्रयोग झाले पाहिजे म्हणून गेल्या १५ तारखेपासून शेंडगे यांनी
परभणी इथून सुरू हा प्रवास सुरू केला. काल सायंकाळी नागपूर इथं पोहाचल्यावर त्यांचा
शाल आणि पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक शाळा, ग्रंथालय
आणि खेड्यातील कुटुबांना भेटी देऊन वाचनाचे महत्त्व पटवून दिले.
****
बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील
अती उच्चदाब वाहिनीच्या कामामुळे जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची
वाहतुक उद्या आणि परवा दोन दिवस दुपारी १२ ते ४ या वेळात बंद असणार आहे. महाराष्ट्र
राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता आणि प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी
ही माहिती दिली. उर्वरित वेळी वाहतुक सुरळीत सुरु राहणार असून बंद काळात पर्यायी मार्गावरुन
वाहतुक वळवली असल्याचंही संचालकांनी कळवलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटना-आय एस एस एफ च्या कतार इथं सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत तीन
सुवर्ण,
एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांसह भारत विश्वचषक पदकतालिकेत तिसऱ्या
स्थानावर आहे. सात सुवर्णपदकांसह चीन पहिल्या स्थानावर आहे. तर सर्बिया दुसऱ्या स्थानावर
आहे.
****
No comments:
Post a Comment