Monday, 20 November 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 20.11.2023 रोजीचे सकाळी : 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 20 November 2023

Time : 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ० नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      पुण्याच्या सैन्यदल वैद्यकीय महाविद्यालयाला सर्वोच्च राष्ट्रपती सन्मान; येत्या एक डिसेंबरला राष्ट्रपतींच्या हस्ते होणार प्रदान

·      ठाणे इथं नियोजित भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

·      कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान महाआरोग्य शिबीर

·      धाराशिव इथं आज रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार

आणि

·      एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघ सहाव्यांदा अजिंक्य

 

सविस्तर बातम्या

पुण्याच्या सैन्यदल वैद्यकीय महाविद्यालयाला सर्वोच्च राष्ट्रपती सन्मान जाहीर झाला आहे. येत्या एक डिसेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रेसिडेंट कलर अर्थात राष्ट्रपती निशाण या महाविद्यालयाला प्रदान करण्यात येईल. या महाविद्यालयाचं यंदाचं हे ७५ वं स्थापना वर्ष आहे. या सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष टपाल तिकीट तसंच विशेष नाण्याचं प्रकाशनही केलं जाणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४५ व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या ३० तारखेला पुण्यात होणार आहे. राष्ट्रपती या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

****

ठाणे इथं भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचा भूमीपूजन सोहळा काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. संगीताचा वारसा पुढील पिढीला देण्यासाठी हे विद्यालय मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले...

 

Byte...

शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, भावसंगीत सर्व परंपरा आपण जतन केली पाहिजे. हा वारसा आपण येणाऱ्या पुढील पिढीला देखील दिला पाहिजे. आणि पुढील पिढीला देखील हे सगळं अवगत झालं पाहिजे या साठीच खरं म्हणजे आज हा छोटासा प्रयत्न झालेला आहे.

 

या कार्यक्रमाला ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

****

राज्यातल्या खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना २०२३-२४ या आर्थिक वर्षातील वेतनेतर खर्च भागवण्यासाठी ४९ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. हे अनुदान वितरित करण्यासंबंधीचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

****

सर्व शाळांना शासकीय शाळेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचं, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी‌ म्हटलं आहे. ते काल जळगांव जिल्ह्यात फैजपूर इथं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या ६२ व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनाच्या समारोप सत्रात बोलत होते. अशी मान्यता मिळाल्यास, केंद्राकडून सर्व शाळांना अनेक सुविधा मिळतील, असं केसरकर यांनी सांगितलं. आधार प्रमाणीकरणासंदर्भातल्या अडचणी दूर झाल्यानंतर शिक्षकांच्या ८० टक्के रिक्त पदांची भरती करण्यात येईल, अशी ग्वाही केसरकर यांनी दिली.

****

जागतिक वारसा सप्ताहाला कालपासून सुरूवात झाली आहे. युनेस्को या आंतरराष्ट्रीय संघटनेच्यावतीनं दरवर्षी १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान जागतिक वारसा सप्ताह पाळण्यात येतो. देशातल्या ३७ जागतिक वारसा स्थळांना नागरिकांनी भेटी द्याव्या यासाठी शासनातर्फे याकाळात सवलती देण्यात येतात. यात देशातल्या २९ सांस्कृतिक आणि ७ नैसर्गिक ठिकाणांचा समावेश आहे. यानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथल्या बिबी का मकबरा सह इतर पर्यटन स्थळांवर पर्यटकांना मोफत प्रवेश देण्यात आला.

****

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य विभागाच्यावतीनं २२ ते २४ नोव्हेंबर या तीन दिवसांत महाआरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबीराचा जास्तीत-जास्त नगरिकांनी आणि भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आरोग्य सेवा उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार यांनी केलं आहे. याठिकाणी प्राथमिक आरोग्य तपासणी, रक्ताच्या मोफत चाचण्या, डोळ्याची तपासणी, हाडांची तपासणी, दंत तपासणी, औषध वितरण, कान-नाक-घसा तपासणी, आयुष्यमान कार्ड वितरण, ह्दयरोग तपासणी, चषम्यांचे वाटप,  इसीजी तपासणी मोफत केली जाणार आहे.

****

धाराशिव इथं सुरू असलेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आज केसरी किताबासाठी झुंज होणार आहे. धाराशिव इथं श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात आज, गादी गटातून गतवेळेचा केसरी नांदेडचा शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात तर माती गटातून हिंगोलीचा गणेश जगताप आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात अंतिम सामना होणार आहे. या दोन्ही सामन्यात विजयी होणारे मल्ल यांच्यात केसरी किताबासाठी लढत होईल.  ९२ किलो गादी गटात सोलापूरचा रामा कांबळे याने पुण्याचा अभिजित भोईर यांला पराभूत करत सुवर्ण पदक आणि बुलेट गाडी पटकावली. अभिजित भोईरला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.

****

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून अजिंक्य असलेल्या भारताचा विजयरथ रोखत ऑस्ट्रेलियाने अजिंक्यपद पटकावलं आहे. काल अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी क्रीडा संकुलावर झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं दिलेलं २४१ धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियानं चार गडी गमावत ४३ व्या षटकांत पार केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उप-पंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांच्याहस्ते विजेत्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याला विश्वकरंडक प्रदान करण्यात आला. या सामन्यात १३७ धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड ला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेत सहा अर्धशतकं आणि तीन शतकांसह एकूण ७६५ धावा करणारा विराट कोहली मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने या स्पर्धेत ५९७ धावा करत, विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार म्हणून नवा विक्रम केला.

कालच्या या विजयासाठी पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलिया संघाचं अभिनंदन केलं, तर भारतीय संघाचंही संपूर्ण स्पर्धेतल्या कामगिरीसाठी कौतुक करत, आम्हाला तुमचा अभिमान असल्याचं, ट्वीट संदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, येत्या गुरुवारपासून ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या टी ट्वेंटी मालिकेला सुरवात होत आहे. विशाखापट्टणम इथं पहिला सामना होणार आहे.

****

विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत काल नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील मलकापूर खेर्डा आणि मारेगाव इथं आदिवासी बांधवांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. गावकऱ्यांनी मलकापूर आणि मारेगाव इथं संकल्प रथाचे आदिवासी संस्कृतीच्या माध्यमातून उत्साहात स्वागत केलं.

****

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेच्या माध्यमातून शासकीय योजनांचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या विशेष मोहिमेच्या पूर्वतयारीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

****

बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी ओबीसी जन मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. ते काल लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. शेंडगे यांनी काल धाराशिव इथंही पत्रकार परिषद घेतली, मराठा समाजाला आरक्षणासाठी ओबीसी समाजाचा पाठींबा आहे, मात्र त्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याऐवजी स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं, अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा शेंडगे यांनी यावेळी दिला.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या संत एकनाथ रंग मंदिर इथं काल राज्यस्तरीय मराठी बालनाट्य महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवामध्ये अंतिम फेरीत पोहोचलेल्या सहा नाटकांचे काल सादरीकरण झालं. या महोत्सवात बीड तसंच कोल्हापूर इथल्या चाळीस बाल नाट्यकर्मींनी सहभाग घेतला.

दरम्यान, राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं छत्रपती संभाजी नगर इथं आजपासून ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत शहरातील तापडिया नाट्यमंदिर इथं दररोज सायंकाळी सात वाजता एक नाटक सादर होणार आहे.

****

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेत धाराशिव जिल्ह्यातल्या १५ हजार विश्वकर्मा कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा लाभ मिळवून दिला जाणार असल्याचं, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितलं आहे. पारंपारिक कौशल्य असलेल्या व्यक्तींना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेअंतर्गत टप्याटप्याने कर्ज दिलं जातं. बारा बलुतेदारांसह पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा या योजनेचा उद्देश असून जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.

****

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी काल नांदेड मार्गे तेलंगणात प्रचार दौऱ्यावर गेल्या. प्रियंका गांधी यांचं काल सकाळी साडे अकराच्या सुमारास विशेष विमानाने नांदेड विमानतळावर आगमन झालं. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गांधी यांचं यावेळी स्वागत केलं. तेलंगणात दोन प्रचार सभांना संबोधित केल्यानंतर प्रियंका गांधी या नांदेड मार्गे दिल्लीला परतल्या.

****

No comments: