Tuesday, 21 November 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 21.11.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 21 November 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २१ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज विधानभवनात सुनावणी सुरू झाली असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शिंदे गटानं कागदपत्रं सादर करण्यासाठी वेळ वाढवून मागितला. त्यानुसार, आता शिंदे गट येत्या २४ नोव्हेंबर पर्यंत विधानसभा अध्यक्षांकडे कागदपत्रं सादर करणारं आहे. यावेळी ठाकरे गटाकडून देखील कागदपत्रं सादर करण्यात आले. सुनावणीदरम्यान, शिंदे गटाकडून वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाकडून वकील देवदत्त कामत यांनी एकमेकांवर वैयक्तिक टीकाटिप्पणी केली, मात्र या प्रकरणामुळं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांच्या वकिलांवर नाराजी व्यक्त करत, वैयक्तिक टीका नको, मुद्दा कायदेशीर रित्या मांडला पाहीजे असं यावेळी सांगितलं

****

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात सिलक्यारा बोगदा कोसळल्यानंतर १२ नोव्हेंबरपासून आत अडकलेल्या ४१ मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बोगद्यात ५३ मीटर खाली सहा इंची पाईप टाकण्यात आला आहे, त्याद्वारे बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत अन्न, औषधं आणि इतर आवश्यक साहित्य सहज पोहोचवता येत असल्याचं राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे ​​संचालक मनीष खालखो यांनी सांगितलं. दरम्यान, बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या प्रशासन सतत संपर्कात असून सर्व कामगार सुखरूप आहेत.

****

गोव्यातील पणजी इथं सुरू असलेल्या ५४ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव- इफ्फी मध्ये आज इंडियन पॅनोरमाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांच्या हस्ते इंडियन पॅनोरमाचं उद्धघाटन करण्यात आलं. याअंतर्गत २५ फीचर फिल्म आणि २० बिगर फीचर फिल्म्स दाखवले जाणार आहेत. तसंच सेव्हंटी फाईव्ह क्रिएटीव्ह माईंड्स ऑफ टूमारो या तरुण कलाकारांसाठीच्या विशेष उपक्रमाचंही उद्धघाटन मंत्री ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, या चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून मीरा वेलणकर दिग्दर्शित बटरफ्लाय या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. हा चित्रपट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया मध्येही दाखवला जाणार असून या दोन्ही ठिकाणी दाखवला जाणारा हा एकमेव मराठी चित्रपट आहे.

****

लातूर जिल्हा परिषदेत काल विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्यासह अनेक पदाअधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना कार्ड वितरणं तसंच विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं.  

****

४३ वं मराठवाडा साहित्य संमेलन येत्या दोन आणि तीन डिसेंबरला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं आयोजित करण्यात आलं आहे. प्रसिद्ध लेखक जगदीश कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाच्या साहित्य नगरीला दिवंगत कविवर्य ना. धों. महानोर यांचं नाव देण्यात आलं आहे.

****

कतार इथं सुरू असलेल्या जागतिक बिलियड्‌र्स अजिंक्यपद स्पर्धेत काल भारताच्या पंकज अडवाणी आणि सौरव कोठारी यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पंकज डवाणीनं रुपेश शाहचा तर सौरव कोठारीनं ध्रुव सितवालाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला परवा गुरुवारपासून सुरुवात होत आहे. मालिकेतला पहिला सामना विशाखापट्टणम् इथं खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ काल जाहीर करण्यात आला. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातल्या या संघात श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड हे दोन उपकर्णधार, ईशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जीतेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, आणि मुकेश कुमार यांचा समावेश आहे.

****

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पुन्हा दोन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत हा ब्लॉक घेतला जात आहे. रस्ते आणि परिवहन विकास महामंडळाकडून या द्रुदगती महामार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि चिन्हांचे फलक लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, त्यामुळं या कालावधीत पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे.

****

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण आणि राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधमोहिम सहा डिसेंबरपर्यंत राबवली जात आहे..

****

   

No comments: