Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 21 November
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
·
जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या
निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.
·
धनगर
आरक्षणाच्या मागणीसाठी जालना इथं काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण.
·
ज्येष्ठ सामाजिक
कार्यकर्ते अमर हबीब यांना पदमविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार प्रदान.
आणि
·
लातूर
महरपालिकेकडून वायू प्रदूषण तसंच धूळ कमी करणाऱ्या यंत्राचं लोकार्पण.
****
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला
स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे, त्यामुळे आता जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्यानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास
महामंडळानं जायकवाडीसाठी साडे आठ हजार दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश दिले होते.
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून या निर्णयाच्या विरोधात आधी मुंबई उच्च
न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली, या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं पाणी सोडण्याच्या निर्णयाला
स्थगिती न देण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. यावेळी
दोन्ही बाजूंच्या वकिलांसह पाटबंधारे विभागाचे अधिकारीही सर्वोच्च न्यायालयात उपस्थित
होते. दरम्यान, या प्रकरणी पुढची सुनावणी १२ डिसेंबरला होणार आहे.
****
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या १०७ हुतात्म्यांना आज राज्यात
आदरांजली वाहण्यात येत आहे. मुंबईत हुतात्मा चौक इथल्या हुतात्मा स्मारकाला मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. ‘या १०७ हुतात्म्यांच्या
बलिदानामुळेच मुंबई महाराष्ट्राला मिळाली असून त्यांचं बलिदान कधीही विसरता येणार नाही’,
अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आदरांजली वाहिली.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध
असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला आहे. ते आज कोल्हापूर
इथं अंबाबाईच्या दर्शनानंतर पत्रकारांशी बोलत होते. अन्य कोणत्याही
समाजावर अन्याय न करता, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यात
येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
****
बत्तीस लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी
सापडल्यामुळे आता चोवीस डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना आरक्षण
द्यायलाच हवं, अशी आग्रही मागणी मराठा
समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषदेत केली. सरकारनं
आरक्षणाबाबतचा पहिला अहवाल स्वीकारला आहेच, आता मराठा कुणबी
नोंदीचा दुसरा अहवाल स्वीकारून येत्या २२ ते २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावं
अन्यथा २५ डिसेंबरपासून आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल, असा
इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला.
****
धनगर समाजाला एस.टी. अर्थात अनुसूचित जमाती
या प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासह अन्य मागण्यांसाठी आज जालना
शहरात सकल धनगर समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातून
आलेल्या धनगर समाजबांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. धनगर समाजबांधवांच्या
मागण्यांचं निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य कुणी अधिकारी न आल्यानं
संतप्त मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात
शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या
काही शासकीय आणि खाजगी वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्यानं काही वेळ तणाव निर्माण
झाला होता. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या आवारातून बाहेर काढलं. त्यानंतर धनगर समाजाच्या एका शिष्टमंडळानं
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केलं.
****
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी आज विधानसभाध्यक्ष
राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी ठाकरे गटाचे विधीमंडळ प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात आली.
या प्रकरणी उद्यापासून २४नोव्हेंबर पर्यंत सुनावणी होणार आहे. त्यानंतर तीन
दिवसांच्या सुट्टीनंतर २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर पर्यंत सलग सात दिवस सुनावणी
होणार आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आज राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी नाशिक
जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातल्या दुर्गम आदिवासी भागातल्या कुशेगाव आणि मोडाळे या
गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी संवाद साधला. राज्यपालांच्या हस्ते, दुर्गम आदिवासी भागातल्या शाळेत जाणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना
प्रातिनिधिक स्वरूपात सायकलचं वाटपही यावेळी करण्यात आलं.
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आज राज्यातल्या पाच
जिल्ह्यांमध्ये छत्तीस ठिकाणी आरोग्य शिबीरं घेण्यात आली. नाशिक, नंदुरबार, पालघर,
नांदेड आणि गडचिरोली जिल्ह्यात सध्या ही यात्रा सुरू आहे.
नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातल्या जलधारा इथे ही
यात्रा आज पोहोचली.यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात तसंच लहान मुलांनीही
विविध वेषभूषा करून या यात्रेचं स्वागत केलं.
****
उत्तराखंडमधल्या निर्माणाधीन सिल्क्यारा
बोगद्यात अडकलेल्या एक्केचाळीस कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदत मोहीम
सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह
धामी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून या मदत आणि सुटका मोहिमेची माहिती घेतली.
या मोहिमेसाठी व्हर्टिकल ड्रिलिंग मशीन घटनास्थळी पोहचलं आहे. दरम्यान, दूरचित्रवाणी वाहिन्यांनी या बचाव मोहिमेचं
वृत्तांकन करताना संयम ठेवावा आणि याबाबत सनसनाटी वृत्तांकन करू नये, असे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज जारी केले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ नोव्हेंबर ला आकाशवाणीवरच्या मन की बात या
कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. नागरिकांना आपल्या विविध कल्पना
आणि सूचना, माय जीओव्ही ओपन फोरम किंवा नमो या
भ्रमणध्वनी ॲपद्वारे, अथवा एक-आठ-शून्य-शून्य
एक-एक-सात-आठ शू्न्य-शून्य या नि:शुल्क
क्रमांकावरही पाठवता येणार आहेत.
****
गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या ५४ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट
महोत्सव- इफ्फी मध्ये आज इंडियन पॅनोरमाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय माहिती आणि
प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांच्या हस्ते इंडियन पॅनोरमाचं उद्घाटन करण्यात आलं. आनंद एकार्शी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या अट्टम या मल्याळी
चित्रपटानं याची सुरुवात झाली. भारतीय पॅनोरमा या श्रेणीत दाखवल्या
जाणार असलेल्या चित्रपटांमध्ये विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द वॅक्सीन वॉर,
सुदिप्तो सेन यांचा द केरला स्टोरी हे हिंदी चित्रपट तसंच ऋषभ शेट्टी
दिग्दर्शित कंतारा हा कन्नड चित्रपट दाखवला जाणार आहे.
****
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा पदमविभूषण गोविंदभाई
श्रॉफ स्मृती पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांना आज प्रदान करण्यात
आला. छत्रपती संभाजीनगर इथं संस्थेच्या
सभागृहात झालेल्या समारंभात संस्थेचे अध्यक्ष एस बी वराडे यांच्याहस्ते २१ हजार रुपये आणि स्मृती चिन्ह या स्वरुपाचा हा पुरस्कार देऊन हबीब यांना सन्मानित करण्यात आलं. या सत्काराच्या उत्तरात केलेल्या भाषणात हबीब
यांनी, व्यवस्थेला आव्हान
देण्याचं काम चळवळीतला कार्यकर्ताच करू शकतो, असं मत व्यक्त केलं.
****
लातूर महानगरपालिकेतर्फे रस्त्यावरच्या वायू
प्रदूषण तसंच धूळ कमी करणाऱ्या यंत्राचं आज लोकार्पण करण्यात आलं. जिल्हाधिकारी
वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते या धूळशमन यंत्राचं लोकार्पण करण्यात आलं.केंद्र
सरकारच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम विभागाकडून लातूर शहर महानगरपालिकेला
वायु प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून, यातून महानगरपालिकेकडून शहरातलं वायू
प्रदूषण कमी करण्यासाठी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
****
नांदेड जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे आज
महा-रेशीम अभियान २०२४चा शुभारंभ करण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग
बोरगावकर यांनी रेशीम विभागाच्या फिरत्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून या अभियानाची सुरुवात
केली.नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन
रेशीम शेतीसाठी नाव नोंदणी करावी, असं आवाहन रेशीम विकास
अधिकाऱ्यांनी केलं आहे.नांदेड जिल्ह्यात हे अभियान येत्या
वीस डिसेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यातही आज महारेशीम अभियान २०२४ चा
शुभारंभ जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment