Tuesday, 21 November 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 21.11.2023 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२१ नोव्हेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहूती देणाऱ्या १०७ हुतात्मांना, हुतात्मा दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत हुतात्मा चौकातल्या स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं. या दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

****

उत्तराखंड मधील उत्तरकाशी जिल्ह्यात सिल्कयारा निर्माणाधीन बोगदा ढासळल्यानंतर त्यात अडकलेल्या ४१ मजुरांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. १२ नोव्हेंबर पासून आत अडकलेल्या या मजुरांना एका पाईपच्या माध्यमातून अन्न,औषधी आणि इतर सामानं पुरवलं जात आहे.   

****

राज्यात लवकरच चौथ्या महिला धोरणाची अंमलबजावणी करणारं तसंच बालकांच्या हक्क आणि सुरक्षेवर भर देणारे बाल धोरण तयार करणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. मुंबईत काल 'बालकांचे हक्क आणि सुरक्षितता अभियान' या कार्यक्रमाच्या उद्घघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

****

मुंबईत उद्या बाल स्नेही पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी काल ही माहिती दिली. बालकांचा सर्वांगीण विकास, बाल हक्क संरक्षण, त्यांची सुरक्षा, आरोग्य अशा क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.

****

४३ वं मराठवाडा साहित्य संमेलन येत्या दोन आणि तीन डिसेंबरला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं आयोजित करण्यात आलं आहे. प्रसिद्ध लेखक जगदीश कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाच्या साहित्य नगरीला दिवंगत कविवर्य ना. धों. महानोर यांचं नाव देण्यात आलं आहे.

****

६२ व्या राज्यस्तरीय हौशी मराठी नाट्य स्पर्धेअंतर्गत काल चंद्रपूर केंद्रावर प्राथमिक फेरीला उत्साहात सुरुवात झाली. या अंतर्गत एकूण अठरा नाटकांचं सादरीकरण होणार आहे. 

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली आहे, २३९ केंद्रांवर या परीक्षा घेतल्या जात आहे.

****

No comments: