Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 22 November 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २२ नोव्हेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज सलग दुसऱ्या दिवशी विधानभवनात सुनावणी सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांची फेरसाक्ष घेतली जात आहे. विधीमंडळ सदस्यांची बैठक बोलावण्यासाठी पक्षप्रमुखांनी सूचना केली होती, त्यामुळं पक्षाचा प्रतोद म्हणून व्हीप बजावला होता, असं सुनील प्रभू यांच्यावतीनं सांगण्यात आलं आहे. यावर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी लिखित कागदपत्रांच्या पुराव्याबाबतही प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, सकाळच्या सत्रानंतर दुपारच्या सत्रातदेखील ही सुनावणी सुरू राहणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तरकाशी इथल्या सिलक्यारा इथं निर्माणाधीन बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या बचावकार्याबद्दल दुरध्वनीवरुन माहीती जाणून घेतल्याचं उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. अडकलेल्या कामगारांना अन्न, औषधं आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तसंच त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधानांनी विचारपूस केली. चालू असलेलं बचाव कार्य आणि गेल्या चोवीस तासांत झालेल्या सकारात्मक प्रगतीची माहिती पंतप्रधानांना देण्यात आल्याचंही धामी यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी जोमानं बचावकार्य सुरू असून बोगद्याच्या वरुन खालच्या दिशेनं उभं खोदकाम सुरू आहे.
****
डिजीटल व्यवहारात आपला देश अव्वल असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विक्री विभागाच्या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घघाटन प्रसंगी ते काल बोलत होते. नागरिकांना नवतंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासोबतच कागद विरहीत कामकाज वाढवावे, यासाठी एजंट, विकास अधिकाऱ्यांनी योगदान द्यावे, असं आवाहनही डॉ. कराड यांनी योवळी केलं.
****
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव धान्य बाजार समितीत चाळीस दिवसांत ६२ कोटी तीन लाख रूपयांच्या सोयाबीनची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल खाजगी व्यापाऱ्यांना न विकता तो माजलगाव बाजार समितीत आणून विक्री करावा असं, आवाहन सभापती जयदत्त नरवडे आणि सचिव हरिभाऊ सवणे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात वाळूचोरीच्या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या दोन आरोपींना एक वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुणावण्यात आली. गेवराईतील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नीलेश रणदिवे यांच्या न्यायालयानं ही शिक्षा सुनावली. वाळूचोरी प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाच्या वतीनं पाच साक्षीदार तपासण्यात आले यात फिर्यादी, तलाठी आणि तपासी अधिकाऱ्याची साक्ष महत्त्वाची ठरली.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचे नववे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यात अहमदपूर इथं घेण्यात येणार आहे. २० आणि २१ जानेवारी रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी बीडच्या पुरोगामी विचारवंत ज्येष्ठ कथालेखिका विधिज्ज्ञ उषा दराडे यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली.
****
धुळे जिल्ह्यातल्या सर्व टपाल कार्यालयात ‘नारी शक्ती विशेष अभियाना’ अंतर्गत आठ डिसेंबरपर्यंत महिला सन्मान बचत पत्र योजनेत खाते उघडण्याची विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. अशी माहिती प्रवर अधीक्षक प्रतापराव सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. शहरी तसंच ग्रामीण भागातल्या जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन सोनवणे यांनी केलं आहे.
****
मराठवाड्यात २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लातूर तसंच बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
विद्यूत रोहीत्र जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी त्वरीत दुरुस्त विद्यूत रोहीत्र बसवून वीज पुरवठा त्वरीत सुरू करण्यासाठी महावितरणनं राज्यभर मोहीम सुरू केली आहे. रोहीत्रं जळाल्यानंतर त्याची तक्रार 1800 212 3435 या टोल फ्री क्रमांकावर करावी.असं आवाहन महावितरणच्या वतीनं करण्यात आलं आहे. महावितरणला रोहीत्रं बिघडल्याची माहिती मिळाल्यानंतर तीन दिवसांत रोहीत्रं बदलण्यात येत आहे. मात्र, रोहीत्रं जळाल्याचं लवकर कळवल्यास वीज पुरवठाही लवकर सुरू करता येईल त्यामुळं वीज ग्राहकांनी महावितरणला मदत करावी, असे आवाहन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment