आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२२ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण बरखास्त करा, अशी मागणी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. नाशिक शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार लागणाऱ्या पाण्याचा व्यवहारिक ताळेबंद न करताच जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा आदेश देण्यात आला, या प्राधिकरणाऐवजी निवृत्त न्यायमूर्तींची समिती गठीत करावी, असं गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
राज्य शासन धनगर समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांबाबत सकारात्मक असून धनगर समाजाचे प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील, असं राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे. मंत्री देसाई आणि इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री अतूल सावे यांच्या उपस्थितीत धनगर समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगानं मंत्रालयात काल आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
****
कार्तिकीवारीनिमित्त पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रोषणाईमुळं मंदिर परिसर उजळून गेला आहे. एकादशीनिमित्त पंढरपूर इथं येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य विभागाच्यावतीनं आजपासून तीन दिवस महाआरोग्य शिबीरं घेण्यात येणार आहे.
****
श्री गुरुनानक देवजी यांच्या जयंती निमित्त दक्षिण मध्य रेल्वे हुजूर साहिब नांदेड इथून बीदर इथं जाण्याकरता विशेष गाडी चालवणार आहे. पूर्णपणे आरक्षण नसलेली ही विशेष गाडी नांदेड इथून येत्या सव्वीस तारखेला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी निघणार आहे. तर परतीच्या प्रवासात ही गाडी येत्या अठ्ठावीस तारखेला, मंगळवारी दुपारी तीन वाजता बीदरहून निघणार आहे.
****
येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील.
****
वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रशासन आणि वैद्यकीय आरोग्य यंत्रणा असे दोन स्वतंत्र विभाग कार्यरत असावेत, याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागानं आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. पवार यांनी काल वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
****
No comments:
Post a Comment