Regional
Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date
: 24 December 2023
Time
: 7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
· मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह
याचिकेवर २४ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
· मनोज जरांगे पाटील यांचा २० जानेवारी पासून मुंबईत आमरण
उपोषणाचा इशारा
· छत्रपती संभाजीनगर इथं कोविडचा आणखी
एक रुग्ण
· धाराशिव शहरातल्या ज्योती क्रांती पतसंस्थेवर सशस्त्र
दरोडा
आणि
·
विकसित
भारत संकल्प यात्रेसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल
क्युरेटिव्ह याचिका न्यायालयानं स्वीकारली असून, येत्या २४
जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणी दरम्यान मराठा समाज
मागास असल्याची खात्री न्यायालयाला पटवून देऊ आणि मराठा आरक्षणातल्या त्रुटी दूर
करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. यासाठी निष्णात वकिलांची फौज
उभी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मराठा समाज बांधवांनी तोपर्यंत संयम
बाळगावा, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, जातीय सलोखा टिकून राहिल यादृष्टीनं प्रयत्न करण्याचं आवाहन
मुख्यमंत्र्यांनी केलं.
याचिकाकर्ते विनोद पाटील यांनीही या बाबत समाधान व्यक्त करत, क्युरेटिव्ह
याचिकेच्या माध्यमातून मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल असा विश्वास व्यक्त केला
आहे.
****
मराठा
आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २० जानेवारी पासून मुंबईत आझाद मैदानावर आमरण
उपोषणाचा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
काल बीड इथं झालेल्या सभेत जरांगे बोलत होते. या सभेसाठी बीड शहरात जरांगे यांचं जल्लोषात
स्वागत करण्यात आलं.
****
हिंगोलीचे
खासदार हेमंत पाटील यांना परदेशातून धमकीचे फोन आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या
नांदेड इथल्या निवासस्थानी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या धमकी बाबत पाटील
यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र देऊन माहिती दिली. खासदार पाटील यांना पहिला धमकीचा
फोन गेल्या १४ डिसेंबर रोजी आला होता. त्यानंतर
२० डिसेंबर रोजी पुन्हा धमकीचे दोन फोन आले. दुसऱ्यांदा आलेला फोन कॉल , इजिप्त या देशातून
आला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
****
पुण्यातल्या
भिडेवाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नियोजित स्मारकाची रचना आकर्षक
आणि भव्य प्रकारची करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पवार यांनी काल पुण्यात स्मारकासंदर्भात आढावा बैठक घेतली, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार
यावेळी उपस्थित होते. या वास्तूचं 'सावित्रीबाई फुले पहिली
मुलींची शाळा' असं नामकरण करण्याची सूचना मंत्री भुजबळ यांनी
केली.
****
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने उसावरील चाबूक काणी
रोगासाठी प्रतिकारक्षम स्रोत म्हणून चार जननद्रव्यांची नवी दिल्लीच्या राष्ट्रीय वनस्पती
अनुवंशिक संसाधन ब्युरोकडे नोंदणी केली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी. जी. पाटील यांनी ही माहिती
दिली. हे स्रोत वापरून उसाचे जास्त उत्पादन तसंच अधिक साखर उतारा
देणाऱ्या प्रतिकारक्षम वाणांचं उत्पादन करता येईल, असं पाटील
यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल कोविडचा आणखी एक रुग्ण आढळला. हर्सुल सावंगी परिसरातील एका १८ वर्षीय मुलीला कोविडची लागण
झाल्याचं तिच्या अहवालावरुन स्पष्ट झालं. महापालिकेने कोविड चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून दिली
असून, संभाव्य रुग्णांवर उपचारासाठीची
यंत्रणा सज्ज ठेवली असल्याचं, महापालिकेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून
सांगण्यात आलं.
****
कोविडच्या पार्श्वभूमीवर
लातूर जिल्ह्यात शासकीय आरोग्य संस्थांमधील साहित्याची तपासणी करावी, असे निर्देश
क्रीडा आणि युवक मंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत. ते काल याबाबतच्या आढावा
बैठकीत बोलत होते. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या रुग्णांसाठी ५० खाटा राखीव
ठेवण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
या
बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
धाराशिव शहरातल्या ज्योती क्रांती पतसंस्थेवर काल सशस्त्र
दरोडा पडला. सायंकाळी साडे पाच
वाजेच्या सुमारास बँकेत दाखल झालेल्या सुमारे पाच दरोडेखोरांनी व्यवस्थापक तसंच रोखपालाला पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवत,
अंदाजे ५० तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि काही लाखांची रोकड लुटली.
दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या घटनेचा तपास सुरू झाला असून,
पोलीसांची २ पथकं दरोडेखोरांचा माग घेण्यासाठी रवाना करण्यात
आली आहेत.
****
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आज छत्रपती संभाजीनगरच्या
दौऱ्यावर येत आहेत. केंद्रीय अर्थ राज्य
मंत्री डॉ भागवत कराड यांच्यासह ते विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होऊन लाभार्थ्यांच्या
घरी भेट देणार आहेत. गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यावेळी उपस्थित
असतील. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून योजनांची
नोंदणी करून लाभ घ्यावा असं आवाहन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक
जी श्रीकांत यांनी केलं आहे.
दरम्यान, या यात्रेनं काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यात भराडी,
फुलंब्री तालुक्यात आळंद, पैठण तालुक्यात कावसान,
सोयगाव तालुक्यात घोसला तर गंगापूर तालुक्यात धानोरी खुर्द इथं जनजागृती
केली.
ही यात्रा आजपासून
लातूर जिल्ह्यातल्या २४ गावांमध्ये जाणार आहे. २६ तारखेपर्यंत विविध गावांमध्ये
फिरणाऱ्या या यात्रेतील उपक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा
प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
****
या यात्रेत मेरी कहानी
मेरी जुबानी अंतर्गत अनेक नागरिक आपल्याला झालेल्या लाभाची माहिती देत आहेत. धाराशिव जिल्ह्यात
गुळहळ्ळी इथले रामकिसन काळे तसंच कुंदन हळकुंभे यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त
केलं....
रामकिसन काळे आणि कुंदन हळकुंबे, गुळहल्ली, ता.तुळजापूर, जि.धाराशिव
****
मराठवाडा हा वाङमय क्षेत्रात हजार वर्षांपासून समृद्ध
असल्याचं मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ प्रल्हाद लुलेकर यांनी व्यक्त केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं शेतकरी साहित्य
पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलत होते. सांजड कथासंग्रहाच्या लेखिका
सुचिता घोरपडे यांना लुलेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ कथाकार आसराम लोमटे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात झालेल्या कामकाजाबद्दल विरोधी
पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद घेऊन माहिती
दिली. छत्रपती
संभाजीनगरचा पाणी पुरवठा प्रश्न, समन्यायी पाणी वाटप धोरण,
मराठवाडा तसंच विदर्भातल्या मागासलेपणाची स्थिती, अवकाळी पावसानं झालेलं नुकसान आणि नुकसान भरपाई, आदी
प्रश्न सदनात उपस्थित केल्याचं दानवे यांनी सांगितलं.
****
सोलापूरच्या लोकमंङ्गल फाऊंडेशनचे साहित्य
पुरस्कार काल जाहीर झाले. शांता गोखले लिखित निर्मला पाटील
यांचं आत्मकथन, राजू बाविस्कर यांच्या काळ्यानिळ्या
रेषा आणि वसंत गायकवाड यांना गौतमबुद्ध या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला. २५ हजार रुपये,
स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या सात जानेवारीला सोलापुरात हे पुरस्कार प्रदान करण्यात
येणार आहेत.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त उद्या २५ तारखेला
धाराशिव इथं मराठवाडा स्तरीय लोकसेवा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला
आहे. मुरुड इथले कृषी संशोधक विद्यासागर कोळी, उपेक्षित आणि
निराधार मुलांचं संगोपन करणारे औसा
तालुक्यातील बुधोडा इथले शरद झरे आणि परंडा तालुक्यातील जगन्नाथ साळुंखे यांना
मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यासाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र
माळेगाव यात्रेसाठी राज्याच्या विविध भागांसह कर्नाटक तसंच तेलंगणातील अनेक भक्त हजेरी
लावत असतात. या
यात्रेत सुरक्षेच्यादृष्टीनं पोलिस विभागानं एक हजार ३३८ पोलिस कर्मचारी नेमले असून यात ४०० गृहरक्षकांचा समावेश आहे. यात्रेतील महत्त्वाच्या
ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत.
****
No comments:
Post a Comment