Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date : 30 December 2023
Time : 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३० डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· छत्रपती संभाजीनगर इथल्या आदर्श महिला नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द
· जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला आजपासून प्रारंभ
· टपाल खात्याच्या दोन लहान बचत योजनांवरील व्याजदरात वाढ
· नौदल अधिकाऱ्यांसाठी स्कंधपट्टिका जारी;छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा समावेश
आणि
· परभणी जिल्ह्यातले पाच कर्मचारी कर्तव्यात कसूर प्रकरणी निलंबित
सविस्तर बातम्या
छत्रपती संभाजीनगर इथल्या आदर्श महिला नागरी सहकारी बँकेचा परवाना रिजर्व्ह बँकेनं रद्द केला आहे. त्यामुळे या बँकेला यापुढे काहीही व्यवहार करता येणार नाहीत. या बँकेवर अवसायक नेमण्याची विनंती रिजर्व्ह बँकेनं सहकार निबंधकांना केली आहे. बँकेच्या ठेवीदारांना विमा संरक्षणातून पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळेल. बँकेच्या ९९ पूर्णांक ७७ शतांश टक्के खातेदारांना या निर्णयाचा लाभ होईल. यासाठी आवश्यक असलेली १८५ कोटी ३८ लाख रुपये रक्कम जारी करण्यात आली आहे.
****
जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान सुरू होत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला आजपासून प्रारंभ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी अकरा वाजता या रेल्वेला दूरदृष्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. यानिमित्त जालना रेल्वेस्थानकात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेड विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार यांनी काल जालना इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जागतिक दर्जाच्या मानकांशी जुळणाऱ्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली ही वंदे भारत रेल्वे सर्वात जलद, सोयीस्कर, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा सक्षम पर्याय ठरत आहे.
****
राज्यात काल कोरोना संसर्गाचे नवे १२९ रुग्ण सापडले. तर १९ रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं काल कोविडचे १२ नवे रुग्ण आढळले आहेत.
****
केंद्र सरकारने जानेवारी-मार्च २०२४ या तिमाहीसाठी टपाल खात्याच्या दोन लहान बचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याज दर आठ टक्क्यांवरून, आठ पूर्णांक २० शतांश टक्के करण्यात आला आहे. तर तीन वर्षांच्या मुदत ठेवीवरील व्याज दर सात टक्क्यांवरून, सात पूर्णांक १० शतांश टक्के करण्यात आला आहे. इतर सर्व लहान बचत योजनेवरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
****
भारतीय नौदलानं काल एडमिरल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गणवेशातील स्कंधपट्टिका अर्थात खांद्यावरच्या पट्टीवर लावायचं मानचिन्ह प्रसिद्ध केलं. या चिन्हाचा आकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेसारखा असून, यात अशोक चिन्ह लावण्यात आलं आहे. सर्वसमावेशक दीर्घकालीन दृष्टीकोन असा या चिन्हाचा अर्थ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण इथं ४ डिसेंबरला झालेल्या नौदल दिनाच्या कार्यक्रमात यासंदर्भातली घोषणा केली होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा एकशे आठावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रावरुन सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
विकसित भारत संकल्प यात्रेतल्या आरोग्य शिबिरांचा आतापर्यंत दोन कोटींहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे. या आरोग्य शिबिरांमध्ये ८० लाखांहून अधिक नागरिकांची क्षयरोगासाठी, साडे आठ लाख नागरिकांची सिकल सेलसाठी, तर उच्च रक्तदाब, मधुमेह यासाठीही दीड कोटी नागरिकांची चाचणी झाली. साडे ३२ लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड याअंतर्गत वितरीत झाली असून सुमारे दीड कोटी कार्ड तयार झाली आहेत
****
ही यात्रा काल छत्रपती संभाजीनगर शहरात हनुमान नगर परिसरात पोहोचली. केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधला. मंत्र्यांच्या हस्ते लाभार्थींना आयुष्मान कार्ड आणि गॅस जोडणी देण्यात आली. विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान उर्वरित कालावधीत सर्वसामान्य लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावे, असे निर्देश कराड यांनी दिले. नागरिकांनीही या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं.
Byte….
यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरीबांना घर देणे, उज्वला योजनेअंतर्गत गरीबांना गॅस देणे, आयुषमान भारत अंतर्गत पाच लाखाचा आरोग्याचा विमा देणे आणि त्याचबरोबर विश्वकर्मा योजनेअंतर्गत तीन लाखाची मदत देणे अशा बऱ्याच योजना माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात शहरी भागात आणि ग्रामीण भागात चालू आहेत. मी जनतेला आवाहन करतो, की या विकासाच्या यात्रेमध्ये आपण सामील व्हा आणि स्वतःचा विकास करा. तुमचा विकास म्हणजे भारताचा विकास. गरीबीरेषेच्या वर आपल्याला या सर्व लोकांना आणायचंय.
****
२४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा नांदेड महापालिका हद्दीत आज समारोप होणार आहे. या यात्रेअंतर्गत काल नांदेड शहरात अण्णाभाऊ साठे चौकात नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत लाभार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती दिली. सुमन धनाडे आणि निहाल शेख यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं.
****
आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली काल बीड इथं विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत विविध योजनांची आढावा बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातल्या सर्व वयोगटातल्या नागरीकांना आयुष्यामान भारत मिशन अंतर्गत योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत, असं आवाहन शेटे यांनी केलं. आयुष्मान भारत योजनेतंर्गत नागरिकांना लाभ देण्यासाठी विशेष शिबीरं घेण्याचे निर्देश शेटे यांनी यावेळी दिले.
****
परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातल्या पाच कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसूर प्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये प्रत्येकी एक अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य सेवक, शाखा अभियंता, ग्रामसेवक तसंच एका मुख्याध्यापकाचा समावेश आहे. या सर्वांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या कामात कसूर केल्यानं, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी ही कारवाई केली.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले उद्या सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्ताने काल त्यांचा सेवागौरव समारंभ पार पडला, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याहस्ते येवले यांचा सपत्निक गौरव करण्यात आला. येवले यांनी विद्यापीठात गेल्या साडे चार वर्षात अनेक सुधारणा केल्या, शैक्षणिक क्षेत्रात होणारं राजकारण कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, असं डॉ कराड म्हणाले. सत्काराला उत्तर देताना येवले यांनी, आपल्याला मराठवाड्याचं प्रचंड प्रेम मिळालं असून, आपण या भागाचे ॠणी असल्याची भावना व्यक्त केली.
****
बॉम्बे सैपर्स युध्द स्मारक शताब्दी आणि कारगिल विजयाच्या पंचविसाव्या वर्षानिमित्त, ‘पर्वत से सागर तिरंगा’ या भारतीय सैन्याच्या अभियानाअंतर्गत, नांदेड विमानतळावर काल चार छोटी विमानं उतरवण्यात आली. नव्या पिढीत राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धींगत व्हावी या उद्देशाने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हे माइक्रोलाइट अभियान सुरु करण्यात आलं आहे. आज ही विमानं बिदरकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती कर्नल मन कंवलजीत यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं राज्यस्तरीय वरिष्ठ महिलांच्या हँडबॉल स्पर्धेचा अंतिम सामना आज सोलापूर आणि कोल्हापूर संघादरम्यान होणार आहे. काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात सोलापूरच्या संघाने ठाणे संघाचा, तर कोल्हापूरच्या संघाने नाशिक संघाचा पराभव केला.
****
अयोध्येतल्या राम मंदिर लोकार्पणानिमित्त अयोध्या इथून आलेल्या अक्षता कलशाची धाराशिव शहरातून आज शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या अक्षता रथयात्रेत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात काल हायवा टिप्परने दिलेल्या धडकेने दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. भोकर तालुक्यातल्या मोघाळीजवळ काल दुपारी ही घटना घडली.
****
No comments:
Post a Comment