Sunday, 31 December 2023

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक : ३१ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date : 31 December 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक :  ३१ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.

****

भारताच्या विकासाचा सर्वाधिक फायदा तरुणांनाच होणार आहे; पण त्यासाठी देशातील तरुण सुदृढ असले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आगामी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी आज देशवासीयांशी संवाद साधला. या मालिकेचा हा एकशे आठावा भाग होता. या भागात त्यांनी मावळत्या वर्षातील यशाचा मागोवा घेतला.

नारी शक्ती वंदन कायदा, जी ट्वेंटी परिषद आणि चांद्रयान मोहिमेचं यश, तसंच भारत जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था झाल्याबद्दल अनेक देशवासीयांनी पत्र लिहून आनंद व्यक्त केल्याचं पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केलं. त्याबरोबरच नाटु-नाटु ला मिळालेला ऑस्कर पुरस्कार, 'द एलिफंट व्हिस्परर्स'ला मिळालेला सन्मान, आशियाई खेळ आणि पॅरा गेम्समध्ये खेळाडूंनी मिळवलेली पदकं, क्रिकेट विश्वचषकातील कामगिरी, १९ वर्षांखालील टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतील विजय अशा अनेक महत्वपूर्ण घटनांचाही आपल्या भाषणात उल्लेख करत त्यांनी २०२४ मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. ‘आझादी का अमृत महोत्सवआणिमेरी माटी मेरा देशया मोहिमा, ७० हजार अमृत तलावांचं निर्माण हेदेखील संपूर्ण देशाचं सामूहिक यश असल्याचं ते म्हणाले.

३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यानिमित्तानं बोलताना, सावित्रीबाई आणि महात्मा जोतिराव फुले यांचं मानवतेला समर्पित जीवन आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देतं, अशा शब्दांत पंतप्रधानांनी अभिवादन केलं.

****

राज्यभरातील सुमारे ५३ हजार शिधा वाटप, म्हणजेच रेशन दुकानदारांनी विविध मागण्यांसाठी उद्या १ जानेवारीपासून बेमुदत बंद पुकारला आहे. या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ सहभागी होणार आहेत. रेशन दुकानदारांना किमान उत्पन्नाची हमी ५० हजार रुपये करावी, टू-जी ऐवजी फोर-जी मशीन द्यावं, कालबाह्य नियमात बदल करावेत, आनंदाचा शिधा कायमस्वरूपी राबवून कांदा, चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करून द्याव्यात, आदी मागण्यांसाठी हा बंद असल्याचं कळवण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतील हातमोजे तयार करणाऱ्या एका कारखान्याला मध्यरात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी सकाळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. कारखान्यात मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास मोठा स्फोट होऊन आग लागली होती. या आगीतून सुमारे १५ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं, तर होरपळलेल्या सहा कामगारांना घाटी रुग्णालयात नेण्यात आलं असता, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत आज महा स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. गेट वे ऑफ इंडिया इथल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना मुख्यमंत्र्यांनी पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर महाराष्ट्र गीतानं अभियानाची सुरुवात करण्यात आली. मुंबईत दहा ठिकाणी हे स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. शिंदे  यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून अभियानाचा आढावा घेतला.

****

परभणी जिल्ह्यात रब्बी हंगामासाठीच्या प्रधानमंत्री पीक विमा संरक्षण योजनेसाठी जिल्ह्यातल्या सव्वा पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ३ लाख ८९ हजार हेक्टरवरील ज्वारी, हरभरा, गहू आणि भुईमुगासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे. यात हरभरा पिकाचे सर्वाधिक २ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

****

बीड जिल्हा रुग्णालयात काल आयुष अभियान अंतर्गत विविध आजारांचं रोगनिदान आणि उपचार शिबीर घेण्यात आलं. एक हजार दोनशे ३५ रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला.

****

लातूर शहरात पंतप्रधान आवास आणि रमाई आवास योजनेच्या माध्यमातून २०२३ या वर्षात एकूण २ हजार ८३६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. या वर्षभरात एक हजार सातशे ७६ कुटुंबांनी नव्या घरात प्रवेश केला, असं लातूर महानगरपालिकेने कळवलं आहे.

****

No comments: