Wednesday, 27 December 2023

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.12.2023 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२७ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. या संवादात देशभरातले हजारो लाभार्थी सहभागी होणार आहेत. त्या व्यतिरिक्त काही केंद्रीय मंत्री, खासदार आणि आमदारांसह स्थानिक पातळीवरचे लोक प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर इथं सूतगिरणी चौकात केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

****

जम्मू काश्मीरमध्ये पुंछ जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी सुरु केलेल्या शोध मोहिमेत तीन संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून काही शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. गेल्या गुरुवारी पुंछ इथं लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराच्या चार जवानांना वीरमरण आलं.

****

आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या आधारे तयार केल्या जाणाऱ्या डीपफेक अर्थात बनावट फोटो-व्हिडीओच्या आधारे गैरसमज पसरणार नाही यासाठी माहिती तंत्रज्ञान नियमावलीचं कठोर पालन करण्याच्या सूचना केंद्र सरकारनं सर्व सोशल मिडिया कंपन्यांना दिल्या आहेत. निर्बंध घातलेल्या साहित्याची स्पष्ट सूचना वापरकर्त्यांना द्यावी, असंही यात म्हटलं आहे.

****

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल जपानमधल्या कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात काल हा कार्यक्रम झाला. ही पदवी आपण राज्यातल्या जनतेला समर्पित करत असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.

****


भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सेंच्यूरियन इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात कालच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात आठ बाद २०८ धावा झाल्या. मोहम्मद सिराज फलंदाजीसाठी उतरला असून, लोकेश राहुल ७० धावांवर खेळत आहे.

****

पंजाबसह उत्तर भारतात थंडीची लाट आणखी वाढली असून, अनेक जिल्ह्यांमध्ये दाट धुकं पसरलं आहे. रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक प्रभावित झाली आहे. जालंधरसह १२ जिल्ह्यांमध्ये दाट धुक्याबाबत हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.

****

No comments: