Friday, 29 December 2023

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक :29.12.2023 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date : 29 December 2023

Time : 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २९ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      कोरोनाचा जेएन-वन उपप्रकार घातक नाही-मात्र कोविड प्रतिबंधासाठी अनुरूप वर्तणुकीचं पालन करावं-आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचं आवाहन;मराठवाड्यात कोविडचे १४ नवे रुग्ण

·      शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात कृषी विभागाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

·      जालना इथं दोन दिवसीय भरडधान्य महोत्सवाला कालपासून प्रारंभ

·      नाशिकच्या भविष्य निर्वाह निधी आयुक्तासह दोघांना दोन लाख रुपयांची लाच घेताना अटक

आणि

·      छत्रपती संभाजीनगर इथले शास्त्रीय गायक गिरीष गोसावी यांना बैजु बावरा राष्ट्रीय संगीत पुरस्कार प्रदान

सविस्तर बातम्या 

कोरोनाचा जेएन-वन हा नवीन उपप्रकार घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी, घाबरून न जाता कोविड प्रतिबंधासाठी अनुरूप वर्तणुकीचं पालन करावं, असं आवाहन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. कोरोना कृती दलाची काल पुणे इथं पहिली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.

कृती दलाचे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर यावेळी उपस्थित होते, जेएन वन या उपप्रकारामुळे मोठा धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती सध्या नसल्याचं गंगाखेडकर यांनी सांगितलं.

****

जे एन वन बाबत काळजी करण्याची गरज नसून, सावध राहण्याची गरज असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे. त्या काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, तामिळनाडूमध्ये जे एन वन बाधित रुग्ण आढळले आहेत. केंद्र सरकार या सर्व राज्यांच्या संपर्कात असून आवश्यक सहकार्य करत असल्याचं, पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, मराठवाड्यात काल कोरोनाची लागण झालेले १४ नवे रुग्ण आढळले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या आठ, बीड पाच, तर हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. तर धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं जे एन वन या प्रकारचा एक रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातल्या नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं आहे.

****

राज्यातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तरतूद करण्यात आलेला निधी विहित कालावधित १०० टक्के खर्च करण्याचे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे. काल मुंबईत कृषी विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. हा निधी खर्च करताना केंद्र आणि राज्यसरकारच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, त्यामुळे शेती उत्पादनामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांच्या राहणीमानात सुधारणा होईल असंही मुंडे यावेळी म्हणाले.

****

विकसित भारत संकल्प यात्रेने काल छत्रपती संभाजीनगर इथं शिवाजीनगर, विजयनगर आणि भारतनगर भागात जनजागृती केली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शिवाजीनगर इथं कार्यक्रमात सहभागी होत, नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड साठी नोंदणी करुन लाभ घेण्याचं आवाहन केलं. यावेळी उपस्थितांनी भारताच्या विकासाचा संकल्प केला.

****

नांदेड इथंही काल या यात्रेअंतर्गत जंगमवाडी आणि महाराणा प्रतापसिंह चौकात शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. महाराणा प्रताप सिंह चौकात झालेल्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या लाभाची माहिती दिली.

****

ही यात्रा आज परभणी जिल्ह्यात विविध गावांमध्ये जाणार असून, या यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.

****

आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य वर्षानिमित्त जालना इथं दोन दिवसीय भरडधान्य महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. निरोगी शरीरासाठी भरडधान्य अत्यंत गरजेचे असून, दररोजच्या आहारात भरडधान्यापासून बनवलेले पदार्थ जरुर खावेत, असं आवाहन विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केलं. सुमारे तीस स्टॉलच्या माध्यमातून भरड धान्य विक्री, खाद्य पदार्थांचे स्टॉल, भरड धान्याचे महत्त्व सांगणारे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले आहेत.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत

****

नाशिकच्या विभागीय भविष्य निर्वाह निधी आयुक्तासह दोन अधिकाऱ्याना काल दोन लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. केंद्रीय गुन्हे अन्वेषण पथक - सीबीआयनं ही कारवाई केली. बांधकाम क्षेत्रातल्या एका उद्योजकाने पीएफ थकवल्याच्या प्रकरणाचा तपास थांबवण्यासाठी ही लाच मागण्यात आली. या प्रकरणी सापळ रचून त्याला अटक केल्यानंतर आयुक्त गणेश आरोटे यांच्या सांगण्यावरुन आपण लाच घेतल्याचं संबंधितांनी सांगितलं. या तिघांना जिल्हा आणि सत्र न्यायालयाने चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

****

छत्रपती संभाजीनगरचे शास्त्रीय गायक गिरीष गोसावी यांना ग्वाल्हेर इथल्या वैदिक योग आणि संगीत संस्थानचा प्रतिष्ठित बैजु बावरा राष्ट्रीय संगीत पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातल्या विशेष योगदानाबद्दल त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. अलाउद्दीन संगीत अकादमीचे संचालक जयंत भिसे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोसावी यांनी अनेक वर्ष आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रात संगीत कलाकार म्हणून सेवा दिली आहे. 

****

काल राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. प्रत्येकाने ग्राहक संरक्षण कायदा जाणून घेण्याची गरज जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अमोल गिराम यांनी यावेळी व्यक्त केली.

हिंगोली इथंही राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीणकुमार धरमकर यांनी ग्राहक कल्याणासाठी समाजामध्ये जागरुकता निर्माण करावी, असं आवाहन केलं.

****

परभणी जिल्ह्यात 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान राबवण्यात येत आहे. सामाजिक हेतूने यात सर्वांनी सहभागी होऊन निकोप स्पर्धा करण्याचं आवाहन शिक्षणाधिकारी गणेश शिंदे यांनी केलं आहे.

****

रामराज्य युवा यात्रा काल छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाली. भव्य शोभायात्रा काढून या यात्रेचं स्वागत करण्यात आलं. पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, राम मंदिराच्या अक्षता कलशाची धाराशिव शहरातून उद्या ३० तारखेला शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या अक्षता रथयात्रेत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे.

****

क्रांतीसूर्य जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज परभणी जिल्ह्याच्या जिंतूर इथं सकल आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं यावेळी अनावरण करण्यात येणार आहे.

****


आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या उपस्थितीत आज बीड इथं आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीची बैठक होणार आहे. केंद्र शासनाच्या तसंच राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांना मिळावा याकरता "विकसित भारत संकल्प यात्रा २०२४" अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संबंधित योजनांची आढावा बैठकही यावेळी होणार आहे. 

****

जालना मुंबई वंदे भारत रेल्वे उद्यापासून धावणार आहे. काल जालना ते मनमाड मार्गावर या रेल्वेची चाचणी घेण्यात आली. या रेल्वेचं आरक्षण आजपासून सुरू होत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

उत्तर भारतातील धुक्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे, यामुळे नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज नांदेडहून १२ तास उशीरा म्हणजेच नियमित वेळेऐवजी रात्री साडे नऊ वाजता निघणार आहे. 

****

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघादरम्यान काल मुंबईत झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा सहा गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने दिलेलं २८३ धावांचं लक्ष्य, ऑस्ट्रेलियाच्या संघानं ४७ व्या षटकात पूर्ण केलं.

****

सेंच्यूरियन इथं काल झालेल्या पुरुषांच्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा एक डाव आणि ३२ धावांनी पराभव केला. सामन्याच्या कालच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात ४०८ धावा करुन १६३ धावांची आघाडी घेतली होती. भारताचा दुसरा डाव अवघ्या १३१ धावांवर संपुष्टात आला. 

****

No comments: