Regional Marathi Text
Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 December
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
· जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसला
प्रारंभ.
· विकसित भारत संकल्प यात्रा सर्वसामान्यांसाठी लाभदायक-केंद्रीय मंत्री
भूपेंद्र यादव.
· डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने अंबाजोगाईत कौशल्य विकास केंद्र.
आणि
· भारतीय महिला संघांच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर
२५९ धावांचं आव्हान.
****
जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसला आजपासून प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी अयोध्या धाम रेल्वे स्थानकातून दूरदृष्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा
दाखवून पाच वंदे भारत रेल्वे आणि दोन अमृत भारत रेल्वेना रवाना केलं. दरम्यान, अयोध्या
इथं नूतनीकरण करण्यात आलेल्या अयोध्याधाम जंक्शन रेल्वे स्थानकाचं पंतप्रधानांच्या
हस्ते उद्घाटन झालं. नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाच्या उद्घाटनासह, १५
हजार ७०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण देखील मोदी यांच्या
हस्ते आज करण्यात आलं.
जालना इथं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब
दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतले विरोधी
पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
रावसाहेब दानवे यांनी यावेळी रेल्वेसाठी होणाऱ्या तरतुदींचा आढावा घेत, देशात
२०२४ पर्यंत संपूर्ण रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण होणार असल्याचं सांगितलं...
मनमाडपासून
संभाजीनगर पर्यंत एक हजार कोटी रुपयांच्या दुहेरीकरणाला मान्यता मिळाली. मार्चपर्यंत
काम सुरु होणार आहे. १४ ते २३ या काळामध्ये रेल्वेवरचे बजेट वाढलेलं आहे. रेल्वेला
या वर्षी बारा हजार कोटी रुपयाचे बजेट मोदीजींनी दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की,
२००६ ते २०१४ पर्यंत दररोज फक्त चार किलोमीटरचा रस्ता पूर्ण होत होता. आता २०२३ ला
बारा किलोमीटर पर डे व्हायला लागला. आणि २०२४ नंतर पर डे सोळा किलोमीटरचा रस्ता केला
जाणार आहे.
राज्यातली ही सहावी वंदे भारत रेल्वे
जालन्यातून सुरु झाल्याबद्दल त्यांनी संपूर्ण मराठवाड्यातल्या जनतेचं अभिनंदन
केलं. यानंतर या रेल्वे लातूरच्या रेल्वे बोगी कारखान्यात बांधण्यात येतील, असं
फडणवीस यांनी सांगितलं...
महाराष्ट्रातील सहावी वंदे
भारत ट्रेन ही आता जालन्यातून सुरु झाली आहे. महाराष्ट्रामध्ये एक लाख सहा हजार कोटी
रुपयांची रेल्वेची कामं ही आज सुरु आहे. आणि या वर्षी तेरा हजार कोटी रुपये हे आपल्याला
त्याठिकाणी मिळालेले आहेत. हा अभुतपूर्व असा रेल्वेचा विस्तार जो यापुर्वी कधीच झाला
नव्हता तो आपण केला. ही संपूर्ण भारतीय बनावटीची ट्रेन आहे. आणि पुढच्या काळामध्ये
आपल्या लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये अशाच प्रकारची वंदे भारत ट्रेन ही मराठवाड्यात त्या
ठिकाणी बनणार आहे.
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर या
रेल्वेचं उत्साहास स्वागत करण्यात आलं. शालेय विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येनं
उपस्थित होते.
दरम्यान, ही रेल्वे सध्या
मुंबईत पोहोचते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या रेल्वेच्या स्वागतासाठी छत्रपती
शिवाजी महाराज टर्मीनसवर उपस्थित राहणार आहेत.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती
संभाजीनगर शहरात मयूरबन कॉलनीत पोहोचली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड
यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधला. शासनाच्या विविध
योजनांची यावेळी माहिती देण्यात आली.
विकसित भारत संकल्प यात्रा
सर्वसामान्यांसाठी लाभदायक ठरत आहे, असं केंद्रीय मंत्री
भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील फाळेगाव इथं आज विकसित भारत
संकल्प यात्रा पोहोचली,
या यात्रेला यादव संबोधित करत होते. शालेय विद्यार्थ्यांना
यावेळी यादव यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी पॉलिथिनच्या
वापरावर निर्बंध घालावा,
प्लास्टिक मुक्तीची ही चळवळ भविष्यासाठी महत्वाची ठरेल, असं
यादव यांनी यावेळी सांगितलं. आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी
उपस्थित होते.
****
नांदेड इथल्या तरोडा खुर्द भागात आज
विकसित भारत संकल्प यात्रेचा महानगरपालिका हद्दीत समारोप करण्यात आला, यावेळी
खासदार प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित होते. नांदेड महापालिका हद्दीत २४ डिसेंबर ते
३० डिसेंबर या कालावधीत ही यात्रा शहरातल्या १३ प्रभागांमध्ये नेण्यात आली.
जिल्ह्यातल्या १६ नगर परिषद आणि नगर पंचायत कार्यक्षेत्रात आजपासून विकसित भारत
संकल्प यात्रा सुरु होत आहे. अर्धापूर नगर पंचायतपासून या यात्रेला सुरुवात होत
असून, नागरिकांनी विविध योजनांसाठी अर्ज सादर करावेत, योजनांचा लाभ घ्यावा
असं आवाहन नगरपालिका प्रशासन विभागाचे जिल्हा सह आयुक्त गंगाधर इरलोड यांनी केलं
आहे.
दरम्यान मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत
नागरिक आपल्याला झालेल्या लाभाची माहिती देत आहेत. सुशीलाबाई हराळे आणि सय्यद
युसूफ यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं...
बाईट – सुशीलाबाई हराळे आणि
सय्यद युसूफ, जि.नांदेड
****
अयोध्येत येत्या २२ जानेवारीला
नवनिर्मित श्रीराम जन्मभूमी मंदिरामध्ये प्रभू श्रीराम यांच्या बालमूर्तीची
प्रतिष्ठापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसंच विश्व
हिंदू परिषदेने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. प्रत्येक घराघरात मंगल अक्षता
देऊन निमंत्रण देण्यास एक जानेवारीपासून प्रत्यक्ष प्रारंभ होत आहे. आज छत्रपती
संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या भव्य सोहळ्याला जाणाऱ्या
चार हजार संतांसाठी छत्रपती संभाजीनगरमधून भगवी वस्त्रे अयोध्येला पाठवली जाणार
आहेत. विभागात २० हजार मंदिरांमध्ये मोठ्या स्क्रीनवर अयोध्येतला सोहळा दाखवण्याची
व्यवस्था करण्यात आली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११
वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमाचा हा एकशे आठावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व
केंद्रावरुन या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्यावतीने अंबाजोगाई शहरात कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येणार
आहे. या केंद्रासाठी राज्य शासनाने २५ एकर जमीन मंजूर केली असून कुलगुरु डॉ.प्रमोद
येवले यांच्या उपस्थितीत ही जागा ताब्यात घेऊन फलक लावण्यात आला. पठाण मांडवा
रस्त्यावर असलेल्या या जागेवर कौशल्य विकासाचे विविध अभ्यासक्रम सुरु केले जाणार
असून, त्यासाठी केंद्र राज्यशासनाकडे २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला
असल्याची माहिती विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.
****
कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन
म्हणजेच १५ जानेवारी हा दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास शासनाने
मान्यता दिली असून,
त्यानुसार क्रीडा सप्ताह आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या
अनुदानामध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती, क्रीडा आणि युवक
कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे. ते मुंबई इथं बोलत होते.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट
संघांतला मुंबईतल्या वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्यात प्रथम
फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया संघाने निर्धारित ५० षटकात ८ बाद २५८ धावा केल्या आहेत.
भारताच्या दीप्ती शर्मा हीने ५ खेळाडू बाद करण्याची किमया केली आहे. शेवटचं वृत्त
हाती आलं तेंव्हा भारतीय संघाच्या ६ षटकात ३२ धावा झाल्या होत्या.
****
बीड इथं दिवंगत झुंबरलाल खटोड सामाजिक
प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाला उद्यापासून
सुरुवात होत आहे. खटोड प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या २० वर्षापासून मावळत्या वर्षाला
निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत अध्यात्मिक विचारांनी करण्यासाठी हा महोत्सव आयोजित
केला जातो.
****
गोंदिया जिल्ह्यातल्या अदासी गावात आज गोंदिया ग्रामीण पोलिसांनी ८० हजार रुपयांचा बेकायदेशीररित्या वाहून
नेण्यात येणार दारु साठा जप्त करण्यात आला. देशी-विदेशी दारूसह मोहफुलाची दारू
देखील वाहून नेण्यात होती अशी माहिती पोलिसांनी दिली.
****
धुळे महानगरपालिकेच्या पंचवार्षिक
कार्यकाळाची मुदत आज पूर्ण झाली. त्यामुळे राज्य शासनाने धुळे महापलिकेच्या
प्रशासक पदावर आयुक्त अमिता दगडे पाटील यांची नियुक्ती केली आहे. तसे आदेश
शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी जारी केले आहेत. अखेरच्या दिवशी
मावळत्या महापौर प्रतिभा चौधरी यांनी शहराच्या विकासासाठी काम केल्याची भावना
व्यक्त केली.
****
यवतमाळ पोलिसांनी प्रतिबंधित नॉयलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई करत आज साडे पाच
लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हे
दाखल करण्यात आले.
****
No comments:
Post a Comment