Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date : 25 December 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २५ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ राज्यात उत्साहात साजरा करण्यात येत
आहे. मुंबईतल्या कार्टर रोड इथं आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सहभागी झाले होते.
नाशिकमध्ये नाताळ नाशिक रोड, जेल रोड, उपनगर परिसरात उत्साहात साजरा झाला. नागपुरात कामठी रोडवरील संत फ्रँकिस
डे स्लैस कथेड्रल चर्च मध्ये येशू ख्रिस्तचा जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
करण्यात आला.
नाताळनिमित्त अहमदनगर शहरातले
आणि जिल्ह्यातले अनेक चर्च आणि घरे विद्युत रोषणाईनं उजळले आहेत. जिल्ह्यात
चर्चची मोठी परंपरा आहे. कॅथलिक आणि प्रोटेस्टंट या दोन्ही पंथाचे चर्च नगर
जिल्ह्यात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याचं, सेंट झेवियर चर्चचे प्रशांत पगारे यांनी सांगितले.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आज सुशासन दिवस म्हणून
साजरी केली जात आहे. नवी दिल्लीस्थित सदैव अटल या त्यांच्या
स्मृतीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप
धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
यांनी पुष्पांजली अर्पण केली. आजपासून अटलजींच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होत
आहे.
सुशासन दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी इंदूर इथं मजदूरोंका हित मजदूरो
को समर्पित या कार्यक्रमात दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते हुकूमचंद गिरीणीमधल्या कामगारांना २२४ कोटी
रुपयांचं थकीत मानधन देण्यात आलं.
****
बनारस विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांच्या १६२ व्या जयंतीनिमित्त जुन्या संसद भनवामध्ये म्हणजेच
संविधान सदनामध्ये पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्र्यांनी मालवीय यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
दरम्यान, मालवीय यांच्या विचारांचं लेखन संकलित
असलेल्या ११ खंडाच्या प्रथम शृंखलेच्या पुस्तकाचं प्रकाशन आज पंतप्रधानांच्या हस्ते
होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम
मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी तसंच
दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
या कार्यक्रम मालिकेचा हा १०८ वा भाग असेल.
****
राज्यात कोरोनाच्या जे एन.वन प्रकारच्या नऊ रुग्णांची
नोंद झाली आहे. ठाणे महापालिका हद्दीत पाच, पुणे महापालिका हद्दीत दोन, तर पुणे जिल्हा आणि अकोला
महापालिका हद्दीत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. या सर्वांमध्ये
सौम्य लक्षणे दिसून आली असून, गृहविलगीकरणात असलेल्या सर्व रुग्णांची
प्रकृती सुधारत असल्याची माहिती पुणे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर प्रतापसिंह सारणीकर
यांनी दिली आहे.
****
गुलामगिरी मानसिकता झुगारून आजचा भारत एका नव्या आत्मविश्वासासह पुन्हा उभा
राहत असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
म्हटलं आहे. ते काल मुंबईत श्रीविद्या लक्षार्चन कार्यक्रमात बोलत होते. विचारांबरोबर
व्यवहार आणि व्यापारात तसंच सामरिक ताकदीमध्येही भारत जगात अग्रेसर होत आहे,
असं फडणवीस यांनी नमूद केलं.
****
देशात विमुद्रीकरण अर्थात नोटबंदीचा निर्णय यशस्वी झाल्याचं, अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनी म्हटलं आहे. काल राष्ट्रीय ग्राहक दिन आणि
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त यवतमाळ इथं जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या बचत भवनात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशात ६०
वर्षांवरील नागरिकांची संख्या १५ कोटी एवढी आहे. या सर्व ज्येष्ठ नागरिकांना
देशाची संपत्ती मानण्यासाठी मसुदा तयार करण्यात आल्याचं बोकील यांनी सांगितलं.
****
गुवाहाटी इथं पार पडलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अनमोल खरब हिनं
तन्वी शर्माचा पराभव करुन महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात तीन सेटनंतर तन्वीनं दुखापतीमुळे सामना सोडण्याचा
निर्णय घेतला. पुरुष एकेरीत चिराग सेन यानं थारुन एम याचा २१
- १४, १३ - २१, २१ - ९ असा पराभवकरत विजेतेपद पटकावलं.
पुरुष दुहेरीत पृथ्वी रॉय-सूरज गोला, महिला दुहेरीत प्रिया देवी आणि श्रुती मिश्रा, तर मिश्र
दुहेरीत ध्रूव कपिला आणि तनिषा क्रेस्टो जोडीने विजेतेपद पटकावलं आहे.
****
अकोल्यातल्या वसंत देसाई स्टेडियमवर काल ६७ व्या राष्ट्रीय शालेय मुष्टीयुद्ध
स्पर्धांची सुरुवात झाली. भारतीय मुष्टीयुद्ध संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक जी.एस.
संधू यांच्या हस्ते मशाल पेटवून या स्पर्धेचं उद्धाटन झालं. २९ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचं अकोल्यात प्रथमच आयोजन करण्यात
आलं आहे. या स्पर्धेत २८ राज्यातल्या एक हजार २०० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
यामध्ये विविध वयोगटातले एकूण २६ संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी
विविध राज्यातल्या शालेय स्पर्धकांनी पथसंचलन केलं तसंच पारंपरिक वेशभूषाही परिधान
केल्या होत्या.
****
No comments:
Post a Comment