Wednesday, 27 December 2023

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.12.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date : 27 December 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २७ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.

****

विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत आहेत. या संवादात देशभरातले हजारो लाभार्थी सहभागी झाले आहेत. त्या व्यतिरिक्त काही केंद्रीय मंत्री, खासदार आणि आमदारांसह स्थानिक पातळीवरचे लोक प्रतिनिधीही  आपापल्या परिसरातून सहभागी आहेत.

छत्रपती संभाजीनगर इथं सूतगिरणी चौकात केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरु आहे.

****

नांदेड महापालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती नागरीकांना दिली जात आहे. आज शहरातल्या मुथा चौक, वजिराबाद इथं या यात्रेचं नागरीकांनी स्वागत केलं. यावेळी आयुष्यमान भारत कार्डच्या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान आवास योजना, पीएम स्वनिधी योजना, पीएम उज्वला योजना आदी योजनांची माहिती महापालिकेच्या अधिकार्यांनी यावेळी दिली.

****

विकसित भारत संकल्प यात्रेचं आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर शहरात उत्साहात स्वागत करण्यात आलं. यात्रेच्या ठिकाणी राजापूर नगर परिषदेच्या वतीने शहरी भागासाठी पीएम आवास योजना, पीएम स्वनिधी योजना, पीएम उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत योजना, पीएम सुरक्षा विमा योजना यांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. ' बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरातही अनेक नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

दरम्यान, ही यात्रेला काल दापोली तालुक्यातल्या मौजे सुकोंडी, बांधतिवरे आणि साकुर्डे या गावांमध्येही ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

****

अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल परिसरात काल विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून  विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी उपक्रम संपूर्ण देशभरात राबवण्यात येत असून, या उपक्रमाच्या अंमलबजावणीत अहमदनगर जिल्हा राज्यात अग्रेसर असल्याचं, विखे पाटील यावेळी म्हणाले. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून या यात्रेच्या माध्यमातून सामान्यांची अपेक्षापूर्ती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

****

ग्रीन लातूर वृक्ष टीम या सामाजिक काम करणाऱ्या संस्थेच्या सदस्यांनी आज लातूर शहरात रस्ता दुभाजकाची स्वच्छता केली. गेल्या काही वर्षांपासून ग्रीन लातूर वृक्ष टीम दररोज न चुकता शहर स्वछता तसंच वृक्ष संवर्धनासाठी काम करत आहे. या टीमकडून सध्या स्वच्छ, सुंदर, हरित रस्ता हा उपक्रम हाती घेतला आहे. रस्ता स्वच्छतेबाबत या टीमकडून नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

****

सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यातल्या पांडे गावानजिक कंटेनर आणि कारच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. गुलबर्गा इथले भाविक शिर्डी इथं दर्शनासाठी जात असताना आज पहाटे हा अपघात झाला.

****

 

नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रसिद्ध अशा सारंगखेडा यात्रोत्सवाला काल दत्त जयंतीपासून सुरुवात झाली. याठिकाणच्या प्रसिद्ध असलेल्या घोडे बाजारामध्ये घोड्याच्या खरेदी विक्रीला दोन दिवसांपासूचन सुरवात करण्यात आली. अवघ्या दोन दिवसात ७२ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. यंदा सांरगखेड्याच्या घोडेबाजारात आतापर्यंत दोन हजार ७०० घोडे खरेदी- विक्रीसाठी दाखल झाले. आतापर्यंत सर्वात महाग घोड्याची तीन लाख ५१ हजार रुपयाला विक्री झाल्याची नोंद बाजार समितीकडे झाली आहे. सारंगखेडा चेतक महोत्सवामध्ये काल रंगलेल्या अश्वसौंदर्य स्पर्धेमध्ये स्टॅलीन प्रकारात यंदा पहिल्यांदाच प्रथम क्रमांकाचे मानकरी दोन घोडे ठरले आहेत. तर आज या महोत्सवात अश्वनृत्य स्पर्धा रंगणार आहे.

****

चंद्रपूर जिल्ह्यात आजपासून 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत आहे. बल्लारपूर इथल्या तालुका क्रीडा संकुलात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमं अजित पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. चंद्रपूर आणि बल्लारपूर इथं या स्पर्धा होणार आहेत.

****

पंतप्रधान येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा १०८वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

No comments: