Tuesday, 26 December 2023

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.12.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date : 26 December 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २६ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.

****

भारत आता आपल्या वारशाचा अभिमान बाळगत असून, त्यामुळे जगाचाही भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. श्री गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र, साहिबजादा बाबा जोरावर सिंग जी, आणि बाबा फतेह सिंग जी, यांच्या बलिदानाचा दिवस आज वीर बाल दिन म्हणून पाळण्यात येत आहे. यानिमित्त नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. देश गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडत असून, आपल्याला आपल्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास असल्याचं ते म्हणाले. साहिबजादा बाबा जोरावर सिंग जी, आणि बाबा फतेह सिंग जी या दोघांचं बलिदान म्हणजे राष्ट्रीय प्रेरणा असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. वीर बाल दिनानिमित्त देशातल्या मुलांनी, युवकांनी आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

वीर बाल दिनानिमित्त नांदेड इथं सर्वधर्म संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री सचखंड गुरुद्वारा साहिबचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी आणि पंजप्यारे सहिबान यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री गुरु ग्रंथ साहिब भवन इथं होणाऱ्या संमेलनास पालकमंत्री गिरीश महाजन, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दिनानिमित्त रक्तदान शिबीर तसंच आरोग्य शिबिर भरवण्यात आलं आहे.

****

स्वदेशी बनावटीचं, अत्याधुनिक स्टेल्थ गाईडेड क्षेपणास्त्र सज्ज युध्दनौका आयएनएस इंफाळ, आज भारतीय नौदलात दाखल होणार आहे. मुंबईतल्या नौदलाच्या तळावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. बंदर आणि समुद्रात कठोर तसंच सर्वसमावेशक चाचणी घेतल्यानंतर, गेल्या ऑक्टोबर महिन्यात ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. ईशान्येकडील शहराचं नाव देण्यात आलेली इंफाळ, ही पहिली युद्धनौका असून, तीची लांबी १६३ मीटर, तर वजन सात हजार ४०० टन आहे. इंफाळ युद्धनौकेचा नौदलात समावेश झाल्यानं आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला आणखी बळकटी मिळणार आहे.   

****

अरबी समुद्रात ड्रोन हल्ला झालेलं एम व्ही केम प्लूटो हे भारतीय तटरक्षक दलाचं व्यावसायिक जहाज, काल मुंबईत पोहोचलं. जहाजावर हल्ला कसा झाला हे शोधण्यासाठी भारतीय तटरक्षक दल, भारतीय नौदल, गुप्तचर संस्था, आणि इतर संबंधित अधिकार्यांकडून संयुक्त तपास केला जात आहे.

****

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज जपानमधल्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठातल्या दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित राहतील. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण आणि सामाजिक समानता, यासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून, फडणवीस यांना या पदवीनं सन्मानित करण्यात येत आहे. ऑगस्टमध्ये फडणवीसांच्या जपान दौऱ्याच्या वेळी कोयासन विद्यापीठानं यासंबंधीची घोषणा केली होती. हे विद्यापीठ आपल्या १२० वर्षांच्या इतिहासात प्रथमच परदेशी व्यक्तीला मानद डॉक्टरेट प्रदान करत आहे.

****


विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर मधल्या चिकलठाणा आणि पुंडलिक नगर परिसरात पोहचली. नागरिकांनी या यात्रेचं उत्साहात स्वागत केलं असून, केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या.

अहमदनगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातल्या देवळाली इथं काल विकसित भारत संकल्प यात्रेचं शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आलं. शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

सण, उत्सवांच्या काळात कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं तसंच मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातून काल मुंबईहून आलेल्या १०२ बटालियनच्या शीघ्रकृती दलाच्या तुकडीसह जालना पोलिसांनी पथसंचलन केलं.

****

उजनी धरणातून कालव्यात सोडलेलं पाणी तातडीनं बंद करावं, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या वतीनं काल उजनी धरणावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. पाणी सोडणं बंद न केल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा युवासेनेच्या वतीनं देण्यात आला आहे.

****

महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नेस्टिक संघटनेच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्यात डेरवण इथं काल झालेल्या आर्टिस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर च्या दोन जिम्नैस्टनी प्रत्येकी एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावलं आहे. दहा वर्षांखालील गटात हर्षिका बेवाल हिनं सुवर्णपदक, तर बारा वर्षाखालील गटात रुद्राणी मिठावाला हिनं रौप्यपदक पटकावलं. या दोन्ही बाल जिम्नैस्टचं विविध माध्यमातून कौतुक होत आहे.

****


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दोन क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आजपासून सेंच्युरीयन इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

No comments: