आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२९ डिसेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांच्या तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. जमीन आणि मालमत्ता, वीज, पिण्याचं पाणी, आरोग्य आणि शालेय शिक्षण या प्रमुख सुविधा तळागाळापासून सर्वांना मिळाव्यात याकरता विविध योजनांची आखणी आणि अंमलबजावणी यावर परिषदेत चर्चा होत आहे.
****
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा १३८ वा स्थापना दिन काल साजरा करण्यात आला. यानिमित्त काल नागपूर इथं झालेल्या 'है तय्यार हम' या कार्यक्रमात, काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला.
****
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात राज्यात ६५ हजार ५०२ कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. कर्नाटक, गुजरात आणि दिल्ली या तीन राज्यातल्या एकत्रित गुंतवणुकीइतकी ही रक्कम असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षात १ लाख १८ हजार ४२२ कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करुन महाराष्ट्र पहिल्याच स्थानी होता असंही ते म्हणाले.
****
ऑनलाइन क्रिकेट सट्ट्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयानं दिनेश राठी आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्यांची ३ कोटी ६८ लाख रुपयांची संपत्ती जप्त केली. त्यात २ कोटी १४ लाख रुपयांची रोख रक्कम आणि इतर मालमत्तेचा समावेश आहे. पुणे, कोलकता आणि ओडिशातून ही मालमत्ता जप्त केली आहे.
****
श्रेष्ठा योजनेंतर्गत अनुसुचित जातीतील अडीच हजार विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिल्याचं, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे सांगितलं आहे. उच्च शिक्षण देणाऱ्या अनुदानित शिक्षणसंस्था आणि निवासी माध्यमिक शाळा यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठीची ही योजना आहे.
****
उत्तर भारतातील धुक्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून, नांदेडहून धावणारी नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज १२ तास उशिरा निघणार आहे. ही गाडी आज तिच्या नियमित वेळेऐवजी रात्री साडे नऊ वाजता निघणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड कार्यालयानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment