Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date : 27 December 2023
Time : 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी आज पंतप्रधानांचा दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद
· अत्याधुनिक क्षेपणास्त्राने सुसज्ज 'इम्फाळ विनाशिका' नौदलाच्या ताफ्यात दाखल
· राज्यात कोविड पार्श्वभूमीवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष कार्यदलाची स्थापना
आणि
· राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत अदिती स्वामी आणि मानव जाधव यांना सुवर्णपदक
सविस्तर बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. या संवादात विकसित भारत यात्रेचे देशभरातले हजारो लाभार्थी सहभागी होणार आहेत. त्या व्यतिरिक्त काही केंद्रीय मंत्री, खासदार आणि आमदारांसह स्थानिक पातळीवरचे लोक प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथं सूतगिरणी चौकात केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
****
दरम्यान, या यात्रेच्या निमित्ताने लोकांच्या आयुष्यात बदल करणाऱ्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत घेऊन जात असल्याचं, कराड यांनी म्हटलं आहे. ते काल परभणी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काल नांदेड इथं या यात्रेच्या चित्ररथाचं उद्घाटन केलं. शासकीय योजना वंचितांपर्यंत पोहोचाव्यात यादृष्टीने विकसित भारत संकल्प यात्रा अधिक महत्त्वाची असल्याचं महाजन यांनी नमूद केलं.
विकसित भारत संकल्प यात्रा काल छत्रपती संभाजीनगर मधल्या चिकलठाणा आणि पुंडलिक नगर परिसरात पोहचली. नागरिकांनी या यात्रेचं उत्साहात स्वागत केलं असून, केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या.
****
लातूर जिल्ह्यात विविध ग्रामपंचायतींमध्ये काल या यात्रेतल्या चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. लाभार्थ्यांना विविध लाभांचं वितरण करण्यात आलं, तसंच योजनांसाठी नाव नोंदणी करण्यात आली.
जालना जिल्ह्यात लावणी, आर्डा तोलाजी, झिरपी, मालखेडा इथं ग्रामस्थांनी या यात्रेचं स्वागत केलं. पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचं या नागरिकांनी सांगितलं.
जालना इथले गजानन रानोटे आणि परभणीचे मुरलीधर तायनात यांनी आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती दिली.
****
अत्याधुनिक क्षेपणास्त्र सज्ज 'इम्फाळ विनाशिका' काल भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली. मुंबईच्या नौदल तळावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नौदल प्रमुख अडमिरल आर. हरिकुमार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबईच्या माझगाव गोदीत तयार झालेल्या या युद्धनौकेची लांबी १६३ मीटर तर वजन सात हजार चारशे टन असून यातलं ७५ टक्के साहित्य स्वदेश निर्मित आहे.
****
सर्वसामान्य नागरिकांमध्ये हवामानाविषयक जागरुकता निर्माण होण्यासाठी पंचायत समिती पातळीवर लवकरच हवामानविषयक सुविधा सुरू करणार असल्याचं, पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं आहे. हवामान विभागाला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं काल नवी दिल्लीत बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.
****
बाल विज्ञान प्रदर्शनाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शवणारा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल, असा विश्वास, राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केला आहे. ते काल पुण्यात ५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचं उद्घाटन करताना बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी शाळांमधून अशा प्रदर्शनांचं आयोजन व्हावं, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
****
जळगाव जिल्ह्यात अमळनेर इथं येत्या दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून दोन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही मुरलीधर यांनी ४० लाख रुपये, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खास बाब म्हणून नगरोत्थान योजनेतून एक कोटी २० लाख, तर खासदार रक्षा खडसे यांच्याकडून २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
****
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
राज्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या आणि जे एन वन या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष कार्यदलाची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. या कृती दलाच्या अध्यक्षस्थानी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर हे आहेत. रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉल स्थापन करणं, उपचारात योग्य औषध प्रोटोकॉलची शिफारस करणं, आदी कार्यवाही हा कृती दल करेल .
राज्यात काल कोरोनाच्या तीन हजार ५०० हून अधिक चाचण्यात ३७ नव्या रुग्णांची नोंद झाली आणि ११ रुग्ण बरे झाले. नाशिक जिल्ह्यात काल जे एन वन चा एक रुग्ण आढळला आहे. सदर महिला त्र्यंबकेश्वर इथली असून, तिला जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आलं आहे.
दरम्यान शिर्डी इथल्या साईमंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
****
राज्य सरकारने वंचित बालकांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. मजूर, कामगार यांचं स्थलांतर, तसंच काही ठिकाणी लसीकरणाला असलेला विरोध, कर्मचाऱ्यांचं आंदोलन यामुळे लसीकरणाचं उद्दीष्ट पूर्ण होऊ शकलं नाही. हे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी जानेवारी महिन्यातही या मोहिमेचा पुढील टप्पा राबवला जाणार असल्याचं सहायक आरोग्य संचालक डॉक्टर प्रवीण वेदपाठक यांनी दिली.
****
जालना इथं उद्या “भरड धान्य मेळाव्या”चं आयोजन करण्यात आलं आहे. जेईएस महाविद्यालय परिसरात आयोजित या दोन दिवसीय मेळाव्यात भरड धान्य विक्री तसंच भरड धान्यापासून बनवण्यात आलेले विविध खाद्यपदार्थांचे सुमारे ३० स्टॉल राहणार आहेत. उद्या सकाळी ८ वाजता जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून विद्यार्थ्यांची जागृती फेरी निघणार आहे. या भरड धान्य मेळाव्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.
****
धाराशिव इथं सुरु असलेल्या २२ व्या राज्यस्तरीय सबज्युनियर धनुर्विद्या स्पर्धेत कंपाउंड प्रकारात वैयक्तिक मुलींच्या गटात साताऱ्याच्या अदिती स्वामी हिने ६९९ गुण, मुलांच्या गटात बुलढाण्याच्या मानव जाधवने ७०२ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावलं. मिश्र प्रकारात अदिती स्वामी आणि ओम कदम यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली.
****
महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नेस्टिक संघटनेच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्यात डेरवण इथं आर्टिस्टिक अजिंक्यपद स्पर्धा झाली, या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर इथल्या हर्षिका बेवाल हिनं दहा वर्षांखालील गटात सुवर्णपदक, तर बारा वर्षाखालील गटात रुद्राणी मिठावाला हिनं रौप्यपदक पटकावलं.
****
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त काल परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत विशेष चर्चासत्र घेण्यात आलं. संविधानाने दिलेले हक्क समजून घेत या हक्कांबाबत जागरुक राहण्याचं आवाहन गावडे यावेळी केलं.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आज नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रम होणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्याच्या जुन्या अभिलेख तपासणीत तापर्यंत एक हजार ५७२ कुणबी, कुणबी मराठा, मराठा- कुणबी नोंदी आढळल्या आहेत. एक हजार ७३३ नागरिकांना मराठा- कुणबी, कुणबी - मराठा, कुणबी जातीची प्रमाणपत्र देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
****
अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची काल तहसीलदार विलास तरंगे आणि मयुरी तरंगे यांच्या हस्ते पूर्णाहुतीने सांगता झाली. या सोहळ्यानंतर पालखी मिरवणूक काढण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.
****
वीर बाल दिवस काल देशभरात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पाळण्यात आला. नांदेड इथं पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सर्वधर्म संमेलन घेण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतही वीर बाल दिनानिममित्त अभिवादन करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment