Regional Marathi Text
Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 December
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
· देशभरातल्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारावर;नागरिकांना खबरदारी घेण्याचं शासनाचं आवाहन.
· माजी
पंतप्रधान भारतरत्न अटल
बिहारी वाजपेयी यांच्या
जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली.
· धाराशीव इथल्या लोकसेवा समितीचे लोकसेवा पुरस्कार समारंभपूर्वक
प्रदान.
आणि
·
जालना
मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडी येत्या तीस तारखेला धावण्याचे
संकेत.
****
देशभरातल्या कोरोना बाधित सक्रिय रुग्णांची संख्या चार हजार चोपन्नवर पोहोचली आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात एका रुग्णाचा या संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कोविड 19 चा हा जे एन वन उपप्रकार वेगानं पसरणारा असला तरी त्यानं गंभीर आजार होत नाही आणि रुग्ण कोणत्याही गुंतागुंतीशिवाय बरे होत आहेत, असं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तरीही, लोकांनी मास्क वापरण्यासह कोविड प्रतिबंधाच्या सगळ्या नियमांचं पालन करावं, असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे.
दरम्यान, राज्यातल्या कोरोना परिस्थितीवर सरकारचं पूर्ण लक्ष असून, नागरिकांनीही मागच्या साथीचा अनुभव लक्षात घेत योग्य ती काळजी घ्यावी,
असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात
प्रसार माध्यमांशी बोलत होते.
पहिल्यांदा
तर पॅनिक होण्यासारखी स्थिती नाहीये, मात्र काळजी घेण्यासारखी स्थिती आहे. त्याच्यामुळे
या संपूर्ण परिस्थितीकडे आपण लक्ष ठेवून आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक
घेऊन यासंदर्भात काय काय काळजी घेतली पाहिजे, त्यासंदर्भातले आदेश दिले आहेत. जी सुसज्जता
असली पाहिजे, त्याच्याकडे देखील आपण लक्ष ठेवून आहोत. आणि मला असं वाटतं की कुठल्याही
परिस्थितीचा सामना करण्याकरता आपण तयार आहोत, पण आपण अपेक्षा करू या की, फार या ठिकाणी
त्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही. जनतेला आवाहन हेच असेल की, आपला पुर्वानुभव हा लक्षात
घेता, आणि हा किती गतीने वाढतो, आणि कसा बेमालूमपणे वाढतो, हे आपण सगळ्यांनी अनुभवलं
आहे. आणि म्हणून ज्या काही मिनीमम प्रिकॉशन्स या ठिकाणी घ्यायच्या आहेत, त्या सर्वांनी
घ्याव्यात एवढीच आमची विनंती असणार आहे.
****
काँग्रेस पक्षाच्या एकशे अडोतिसाव्या स्थापना दिवसाचा मेळावा येत्या अठ्ठावीस तारखेला
नागपूर इथे एका महारॅलीच्या आयोजनासह साजरा होणार असून, या मेळाव्याच्या मैदानाला भारत जोडो मैदान असं नाव देण्यात आलं आहे आणि रॅलीचं
घोषवाक्य-है तय्यार हम, असं आहे,
अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले
यांनी दिली आहे. ते आज नागपूर इथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आज सुशासन दिवस म्हणून
पाळली जात आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी पंडित मदन मोहन मालवीय
यांचीही आज जयंती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी
आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. संसदेतल्या घटना भवनाच्या मध्यवर्ती सभागृहातही आज अनेक खासदार, मंत्री आणि नेत्यांनी वाजपेयी आणि मालवीय यांच्या प्रतिमांवर पुष्पांजली वाहिली.
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अटलबिहारी
वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना आदरांजली वाहिली आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात वाजपेयी यांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी सहायक आयुक्त संजय सुरडकर
यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
अटलजींच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात होत आहे.
वाजपेयी यांच्या जयंतीच्या औचित्यानं धाराशीव
इथे आज, लोकसेवा समितीच्या वतीनं
दिल्या जाणाऱ्या लोकसेवा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. लातूर जिल्ह्याच्या औसा
तालुक्यातल्या बुधोडा इथे उपेक्षित निराधार मुलांचं संगोपन करण्याचा प्रकल्प
चालवणारे शरद झरे, परंडा इथल्या मंदिराचा जीर्णोद्धार करून
स्मशानभूमीचं नंदनवन करणारे जगन्नाथ साळुंखे आणि लातूर जिल्ह्यातल्या मुरुड इथले
कृषी संशोधक विद्यासागर कोळी यांना यावेळी
लोकसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. सद्भावनेतून सत्कार घडवण्याचा
अटलजींचा कार्यभाव समाजामध्ये रुजावा या उद्देशानं निरपेक्ष भावनेनं काम करणाऱ्या
लोकसेवकांना लोकसेवा पुरस्कार दिला जातो, असं प्रतिपादन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विद्याभारतीचे क्षेत्रीय मंत्री शेषाद्री डांगे यांनी या
पुरस्कार वितरणाच्या वेळी केलं.
****
नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं उद्या 'वीर बाल
दिना' निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र
मोदी सहभागी होणार आहेत. नागरिकांना, विशेषत: लहान मुलांना,
श्री गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा बाबा जोरावर सिंग जी
आणि बाबा फतेह सिंग जी यांच्या अतुलनीय शौर्य गाथांची माहिती करून देण्याच्या
उद्देशानं देशभरात विविध कार्यक्रमांचं
आयोजन केलं जाणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन
की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी
तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारीत होईल.
या कार्यक्रम मालिकेचा हा १०८ वा भाग असेल.
****
जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडी येत्या तीस तारखेपासून सुरू होण्याची
शक्यता आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज
जालन्यात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भाजप
कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात याबाबतचे संकेत दिले आहेत. जालना रेल्वे स्थानक व्यवस्थापकांकडूनही या वृत्ताला दुजोरा मिळाला असून,
रेल्वे स्थानकावर यासाठीची आवश्यक तयारी दिसून येत असल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तीस डिसेंबरला
सकाळी अकरा वाजता जालना रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून जालना मुंबई वंदे
भारत एक्सप्रेस रेल्वेगाडीची सुरूवात केली जाईल आणि या गाडीची जालना इथली नियमित वेळ
सकाळी पाच वाजून पाच मिनिटं तर छत्रपती संभाजीनगरहून सकाळी पाच वाजून पन्नास मिनिटं
असेल, असं वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.
****
विविध शासकीय योजनांची माहिती देणारी विकसित भारत संकल्प यात्रा देशाच्या
विविध भागात फिरत आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं आज रामनगर आणि
मुकूंदवाडी परिसरात या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध
योजना जाणून घेतल्या.
या यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी या अंतर्गत
अनेक नागरिक आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती देत आहेत. परभणी इथले कमलाजी लोखंडे आणि पार्वती बोबडे
यांनी आपले अनुभव कथन केले.
बाईट - कमलाजी लोखंडे आणि पार्वती
बोबडे, जि.परभणी
सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातल्या बेंद्री या
गावात पोहोचलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचं नागरिकांनी
आज स्वागत केलं.
मुंबईत भांडूप इथे या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आयुष्यमान
भारत कार्ड, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, उज्ज्वला योजना, आरोग्य तपासणी यांच्या दालनांना
महिलांच्या रांगा लागल्या होत्या आणि स्थानिक नागरिक उत्सुकतेनं केंद्र सरकारच्या
योजनांची माहिती समजावून घेत होते, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे. यावेळी खासदार मनोज कोटक यांनी विकसित भारत संकल्प
यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला.
धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या
जेबापूर ग्रामपंचायतीतही आज विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजनांबाबत
जनजागृती करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment