Regional Marathi Text
Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 December
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
· कोरोना जे एन. वन प्रकाराबाबत काळजी करण्याची गरज नसली तरी सावध राहावं- केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार
यांचं आवाहन.
· इसीससाठी भरती आणि निधी उभारण्यात गुंतलेल्या सहा जणांवर एनआयएचं आरोपपत्र
दाखल.
· छत्रपती संभाजीनगर,
नांदेडमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचं उत्साहात स्वागत.
आणि
· भारतीय महिला क्रिकेट संघाचं ऑस्ट्रेलियासमोर २८३ धावांचं आव्हान.
****
देशात कोरोनाच्या जेएन.वन या
प्रकाराच्या बाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असून, या
पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. जे
एन.वन प्रकाराबाबत काळजी करण्याची गरज नसून, सावध राहण्याची
गरज असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्य
मंत्री डॉ. भारती पवार यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. ज्या
राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत त्या सर्व राज्यांवरही आरोग्य
मंत्रालय लक्ष ठेवून असल्याचं मंत्री पवार यावेळी म्हणाल्या. दरम्यान, देशात
गेल्या २४ तासांत कोविडच्या ५२९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या चार हजार ९७
रुग्ण उपचाराधीन आहेत.
****
राष्ट्रीय तपास संस्था -एनआयएनं जागतिक
दहशतवादी संघटना इसीससाठी भरती आणि निधी उभारण्यात गुंतलेल्या सहा जणांवर आरोपपत्र
दाखल केलं आहे. महाराष्ट्रातल्या इसीस दहशतवादी कारवाया प्रकरणातल्या
आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय संबंध आणि परदेशी-आधारित दहशतवाद्यांचा सहभाग असलेला
मोठा कट उघड झाला आहे. मुंबईचा ताबीश नासेर सिद्दीकी, झुल्फिकार
अली बडोदावाला,
शर्जील शेख आणि बोरिवली-पडघा इथले आकीफ अतीक नाचन, तसंच
जुबेर नूर मोहम्मद शेख आणि पुण्यातल्या डॉ. अदनानली सरकार अशी या आरोपींची नावं
आहेत. ते सर्व प्रतिबंधित इसीस संघटनेचे सदस्य आहेत आणि त्यांनी देशाच्या
धर्मनिरपेक्ष आचारसंहिता, संस्कृती आणि लोकशाही शासन प्रणालीच्या
सुरक्षेला धोका निर्माण करण्याच्या उद्देशानं दहशतवादी कारवायांना पुढे नेण्याचा
कट रचला होता,
असं एनआयएनं म्हटलं आहे.
****
केंद्र शासनाची विकसित भारत संकल्प
यात्रा आज छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगर, विजयनगर आणि भारतनगर
परिसरात दाखल झाली तेंव्हा यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रीय अर्थ
राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे शिवाजीनगर इथं यात्रेस उपस्थित राहिले. अद्यापही
ज्या नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड घेतलेलं नाही,
त्यांनी नोंदणी करुन या आरोग्य योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन
त्यांनी यावेळी केलं. विकसित भारतात कोणीही गरीब राहू नये अशी अपेक्षा डॉ. कराड
यांनी यावेळी व्यक्त केली. अभियानाच्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेतर्फे आधार अद्ययावत
करणारं वाहन उपलब्ध होते. सुकन्या समृद्धी योजना, उज्ज्वला गॅस योजना, आरोग्य
विभागाचे सर्वांसाठी मोफत उपचार, आरोग्य तपासणी, रक्त
तपासणी, महानगरपालिकेचे हर घर जल, पंतप्रधान शहरी आवास योजना, पंतप्रधान
आत्मनिर्भर भारत,
अन्न सुरक्षा योजना आदी योजनांबाबत माहिती देणाऱ्या
दालनांना नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी डॉ.कराड यांच्या समवेत उपस्थित
सर्वांनी विकसित भारताचा संकल्प करणारी शपथ घेतली.
****
नांदेड महापालिका हद्दीतही विकसित भारत
संकल्प यात्रेअंतर्गत आज शहरातल्या जंगमवाडी आणि महाराणा प्रताप सिंह चौक इथं
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. यावेळी
नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीस चांगला प्रतिसाद दिला. महाराणा प्रताप
सिंह चौकात झालेल्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.
नांदेड इथं नागरिकांनी या यात्रेसंदर्भातल्या भावना आकाशवाणीकडे व्यक्त केल्या.
बाईट
– विमल ठोंबरे आणि गोदावरी गोडबोले, जि.नांदेड
****
विदर्भातल्या ४७ सिंचन प्रकल्पांना आज
सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यामाध्यमातून दोन लाख २३ हजार ४७४
हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज
मुंबईत सांगितलं. यावेळी कृष्णा पाटबंधारे विकास महामंडळ, तापी
पाटबंधारे विकास महामंडळ,
कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, गोदावरी
पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाचीही बैठक झाली.
****
काँग्रेस पक्ष हा नेहरू, गांधी, महात्मा
फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालतो तर भारतीय जनता पक्ष हा
समानतेच्या विरुद्ध चालणारा पक्ष असल्याची टिका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन
खरगे यांनी केली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा १३८ वा स्थापना दिन आज
साजरा होत आहे,
त्यानिमित्त नागपूर इथं ' है तय्यार हम ' या
मेळाव्यात खरगे बोलत होते. केंद्रात आगामी काळात काँग्रेस पक्षाचं सरकार आल्यास
आपण जात निहाय जनगणना करू असं आश्वासन राहुल गांधी यांनी यावेळी दिलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद
पवार दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर असून आज त्यांनी अचलपूर तालुक्यातल्या विविध
कार्यक्रमांना भेट दिली. यादरम्यान त्यांनी अंबादास पंत वैद्य अंध अपंग मुलांचे
वसतीगृह वझर इथं भेट दिली. यावेळी अठरा वर्षावरील बौद्धिक अक्षम असलेल्यांसाठी
शासन स्तरावर कायदा करण्यासाठी आपण आग्रही भूमिका घेणार असल्याचं पवार यावेळी
म्हणाले.
****
यवतमाळमध्ये आज स्वतंत्र विदर्भ
राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी स्वतंत्र बोरी इचोड नागपूर-
हैदराबाद महामार्गावर दोन तास चक्काजाम आंदोलन केलं. ग्रामीण भागातले नागरिक आणि
महिलांची या आंदोलनात उपस्थिती होती. वेगळं विदर्भ राज्य देऊ असं आश्वासन देऊन
सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विदर्भातल्या जनतेचा विश्वासघात
केला असल्याचं आंदोलकांनी यावेळी नमुद केलं.
****
छत्रपती संभाजीनगरचे शास्त्रीय गायक
गिरीष गोसावी यांना ग्वाल्हेर इथला प्रतिष्ठित बैजु बावरा राष्टीय संगीत पुरस्कार
नुकताच प्रदान करण्यात आला. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातल्या विशेष
योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. गोसावी यांना वैदिक योग
आणि संगीत संस्थानचा हा पुरस्कार अलाउद्दीन संगीत अकादमीचे संचालक जयंत भिसे
यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्यातल्या उमरी, मुदखेड, बिलोली
आणि नायगाव तालुक्यांतल्या २२० गावांमधून सांडपाणी आणि पिण्याचं पाणी
व्यवस्थापनासाठी जनजागृती रथ फिरणार आहे. काल जिल्हा परिषद प्रांगणात मुख्य
कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या रथाला रवाना
करण्यात आलं. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले
यांच्यासह प्रशासनातले अधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
धुळे इथं क्रीडा परिषद आणि जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे १७ वर्ष वयोगटातली मुलांची राज्यस्तरीय शालेय
क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत पुणे संघानं छत्रपती संभाजीनगर संघावर तर
कोल्हापूर संघानं लातूर संघावर मात केली. अन्य सामन्यांत मुंबई संघानं नागपूरवर
आणि नाशिक संघानं अमरावती संघावर विजय मिळवला. या स्पर्धेमध्ये राज्यातल्या आठ
विभागांतले दोनशे खेळाडू,
निवड चाचणी सदस्य, व्यवस्थापक सहभागी झालेले
आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट
संघादरम्यान मुंबईत सुरु असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, भारतानं
ऑस्ट्रेलियासमोर २८३ धावांचं आव्हान ठेवलं आहे. काही वेळापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या
नवव्या षटकात एक बाद ५७ धावा झाल्या होत्या. भारताकडून जेनिमा
रॉड्रीक्सनं ८२,
पूजा वस्त्रकारनं ६२ तर यास्तिका भाटियानं ४९ धावा केल्या.
****
दक्षिण आफ्रिकेनं भारताविरुद्ध
सेंच्युरीयन इथं सुरू पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी पहिल्या
डावामध्ये १६३ धावांची आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात ४०८ धावा
केल्या आहेत. काही वेळापुर्वी भारतानं आपल्या दुसऱ्या डावात दोन बाद १८ धावा केल्या होत्या.
****
आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे
प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या उपस्थितीत उद्या बीड इथं आयुष्मान भारत मिशन
महाराष्ट्र समितीची बैठक होणार आहे. केंद्र शासनाच्या तसंच राज्य शासनाच्या
योजनांचा लाभ सर्वांना मिळावा याकरता "विकसित भारत संकल्प यात्रा २०२४" अंतर्गत
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संबंधित योजनांची आढावा बैठकही उद्या बीडमध्ये होणार
आहे.
****
No comments:
Post a Comment