आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ डिसेंबर २०२३ सकाळी ११.००
वाजता
****
भगवान येशू ख्रिस्ताचा
जन्मदिवस नाताळ आज साजरा होत आहे. मध्यरात्री १२ वाजता ठिकठिकाणच्या चर्चमध्ये
येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करुन प्रार्थना करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासीयांना नाताळच्या शुभेच्छा
दिल्या आहेत. समाजात शांतता आणि सौहार्द कायम राखण्यासाठी येशू ख्रिस्तांची शिकवण
नेहमीच उपयुक्त ठरते, आपल्या जीवनात येशू ख्रिस्ताच्या
शिकवणींचं अनुसरण करूया, असं राष्ट्रपतींनी आपल्या
शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच राज्यपाल रमेश बैस यांनीही जनतेला नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
माजी पंतप्रधान
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आज सुशासन दिवस म्हणून साजरी केली जात आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इंदूरमध्ये मजदूरों का हित
मजदूरों का समर्पित,
या कार्यक्रमाला दूरस्थ पद्धतीने सहभागी होणार आहेत. हुकूमंचंद गिरणी कामगारांच्या थकीत २२४ कोटी रुपयांचा धनादेशही ते सुपूर्द करतील.
****
राज्यात कोरोनाच्या
जे एन.वन प्रकारच्या नऊ रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे इथं
पाच, पुणे महापालिका हद्दीत दोन, तर पुणे
जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. या सर्वांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली असून, गृहविलगीकरणात
असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती पुणे आरोग्य विभागाचे सहसंचालक
डॉक्टर प्रतापसिंह सारणीकर यांनी दिली आहे.
****
मुंबई इथं
नायर रुग्णालयांतर्गत विशेष मुलांसाठी नव्याने सुरू झालेल्या प्रारंभिक उपचार आणि
पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. या केंद्राच्या
माध्यमातून विशेष मुलांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.
****
सर्वांनी आपल्या
नावात वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावण्याची विनंती, उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी केली आहे. ते काल बारामती इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. आईच्या नावाच्या समावेशानं महिलांप्रती आदर वाढेल,
असं ते म्हणाले. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आणि
धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार
योग्य कार्य करत असल्याचं पवार यांनी यावेळी नमूद केलं.
****
No comments:
Post a Comment