Thursday, 28 December 2023

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक :28.12.2023 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date : 28 December 2023

Time : 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २८ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांचा संवाद 

·      २०२४ वर्षाकरता सुक्या खोबऱ्यासाठीचे किमान हमी भाव निश्चित

·      एम फील हा अभ्यासक्रम यापुढे मान्यताप्राप्त नसल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्पष्ट

·      नांदेड जिल्ह्यात जलजीवन मिशनचं काम संथ गतीनं करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई 

आणि

·      चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर इथं ६७ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सविस्तर बातम्या 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. शेतकऱ्यांनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी आधारित जोड धंद्यांकडे वळावं, असं आवाहन, त्यांनी यावेळी केलं. पन्नास दिवसांपेक्षाही कमी कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रा लाखो गावांमध्ये पोहोचली असून, हा एक विक्रम असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात पुंडलिक नगर, सुतगिरणी चौक तसंच जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात पंतप्रधानांच्या या संवाद कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं. केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी वैजापूर इथल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या वेळी दिव्यांगांना आवश्यक साहित्य वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमास उपस्थित सुमारे ८०० नागरिकांनी विकसित भारत घडवण्याचा संकल्प केला.

नांदेड इथल्या लाभार्थ्यांनी या यात्रेदरम्यान आपलं मनोगत व्यक्त केलं.

****

हिंगोली तालुक्यात हिंगणी आणि लासीना, कळमनुरी तालुक्यात बिबगव्हाण आणि झरा, औंढा तालुक्यात पोटा, सेनगाव तालुक्यात लिंबाळा आमदरी आणि चिखलागर, तर वसमत तालुक्यात भेंडेगाव इथं विकसित भारत संकल्प यात्रेचं ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केलं. यावेळी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली.

****

विकसित भारत संकल्प यात्रा आज परभणी जिल्ह्यात अनेक गावांमध्ये जाणार असून, यावेळी ग्रामपंचायत विभागाचे विविध अधिकारी-कर्मचारी नागरीकांना योजनांची माहिती देतील.

****

राज्यात काल कोरोनाच्या सुमारे ११ हजार चाचण्यांमधून ८७ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यातले बहुतांश मुंबई महानगर क्षेत्र आणि पुण्यातले आहेत. राज्यात काल दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर १४ जण कोविडमुक्त झाले. सध्या राज्यभरात कोरोनाच्या २६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती इथं विशेष कार्यक्रम झाला, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना यावेळी पहिला डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत, तसंच बीड जिल्हाधिकारी कार्यालयातही पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली.

****

नागपूर इथं काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज परिवर्तनाचा संदेश दिला जाणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल नागपूर इथं ही माहिती दिली. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

साने गुरूजी यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीच्या औचित्यानं त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमधल्या नियोजित ९७ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ दिलं जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांच्यासह मान्यवरांनी काल मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं, त्यावेळी ते बोलत होते.

****

तंजावर इथं काल १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ झाला. शहाजी उर्फ शाहराज राजे भोसले यांच्या वाङमयाला वंदन करून आणि नटराज पूजन करुन या संमेलनाची सुरुवात करण्यात आली.  

****

सुक्या खोबऱ्यासाठीचे किमान हमी भाव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं मंजूर केले. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी काल समितीच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. २०२४ या वर्षाकरता करता तेलासाठीच्या खोबऱ्यासाठी हमीभावात प्रतिक्विंटल ३०० रुपये वाढ झाली असून, तो प्रतिक्विंटल ११ हजार १६० रुपये झाला आहे. गोटा खोबऱ्याच्या हमीभावात प्रतिक्विंटल अडीचशे रुपये वाढ झाली असून तो प्रतिक्विंटल १२ हजार रुपये  इतका झाला आहे.

****


एम फील हा अभ्यासक्रम यापुढे मान्यताप्राप्त नसल्याचं, विद्यापीठ अनुदान आयोगानं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात आयोगानं काल एक पत्रक जारी केलं. येत्या शैक्षणिक वर्षात या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणं थांबवावं अशी ताकीद आयोगानं विद्यापीठांना दिली आहे. २०२२ या वर्षापर्यंत प्रदान करण्यात आलेल्या एम फील च्या पदव्या वैध राहणार असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत

****

नांदेड जिल्ह्यात जलजीवन मिशनचं काम संथ गतीनं करणाऱ्या ३८७ कंत्राटदारांना प्रतिदिन पाचशे रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तसंच निकषाप्रमाणे वेळेत काम सुरू न केल्यामुळे १५ कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीनं दिलेल्या अहवालानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी ही कारवाई केली.

****

माजी आमदार तथा धर्मनिरपेक्ष जनता दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शरद पाटील यांचं काल सकाळी सांगली इथं निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. शरद पाटील १९९० आणि १९९५ अशा दोन वेळा कुपवाड-मिरज मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेले होते, तर २००२ ते २००८ मध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रकाश जावडेकर यांचा पुणे पदवीधर मतदार संघात पराभव करून विधान परिषदेवर ते निवडून गेले होते. मिरज इथल्या यशवंत शिक्षण संस्थेचे प्रमुख म्हणूनही ते कार्यरत होते.

****

चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर इथं काल १९ वर्षाखालील मुला, मुलींच्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खेळाडू बहाद्दूर सिंग चव्हाण, धावपटू हिमा दास आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेत देशभरातून जवळपास एक हजार ५५१ खेळाडू सहभागी झाले आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर विभागातल्या अकरा शासकीय निवासी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा, आज छत्रपती संभाजी नगर इथल्या विभागीय क्रीडा संकुलामध्ये होणार आहेत. धावण्याच्या स्पर्धा, लांब उडी, थाळीफेक, रस्सीखेच, खो-खो आणि कबड्डी या स्पर्धा याअंतर्गत होत आहेत.

****

परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यात मौजे वाघलगाव इथले शेतकरी मारोती घनवटे यांच्या शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचं उद्घाटन, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे हस्ते काल झालं. यावेळी मौजे गोपा इथले शेतकरी ग्यानदेव कदम यांच्या शेती पिकाची ई-पिक पाहणीची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली, तसंच कपाशी या आंतरपिकाची पाहणी करण्यात आली.

****

नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर यांनी मार्गदर्शन केलं. ऑनलाईन व्यवहारात होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी जागरूक राहावं असा आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सेंच्यूरियन इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दुसर्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात पाच बाद २५६ धावा झाल्या. तत्पूर्वी भारताने पहिल्या डावात २४५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ ११ धावांनी आघाडीवर आहे.

****

No comments: