Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date : 29 December 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २९ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अयोध्येला भेट देणार असून, नूतनीकरण करण्यात आलेल्या अयोध्याधाम जंक्शन रेल्वे स्थानकाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसंच ते अमृत भारत आणि वंदे भारत या रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करतील. याबरोबरच अनेक रेल्वे प्रकल्पांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाच्या उद्घाटनासह, १५ हजार ७०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
****
दरम्यान, पंतप्रधान येत्या १२ जानेवारीला नाशिकच्या दौऱ्यावर येणार असून, राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. युवा दिनाचं औचित्य साधून १२ ते १६ जानेवारी या कालावधीत हा युवक महोत्सव होणार आहे. या कार्यक्रमासाठी जागा निश्चित करण्यासाठी केंद्र शासनाचं एक पथक काल नाशिकमध्ये दाखल झालं होतं, या पथकाने शहरात पंचवटीतल्या तपोवन इथं मैदान निश्चित केलं आहे.
****
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं देशातल्या पाच उच्च न्यायालयातल्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी न्यायाधीशांच्या नावांची शिफारस केली आहे. राजस्थान, पंजाब आणि हरियाणा, गुवाहाटी, अलाहाबाद आणि झारखंड इथल्या उच्च न्यायालयांमध्ये या न्यायाधीशांची नियुक्ती होणार आहे. देशाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड हे या कॉलेजियमचे अध्यक्ष असून, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि बी आर गवई हे अन्य सदस्य आहेत.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर शहरात हनुमाननगर, एन फोर इथं पोहोचली. केंद्र शासनाच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी यावेळी जनजागृती करण्यात आली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यावेळी उपस्थित होते. नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेण्यासाठी गर्दी केली होती. आयुष्मान कार्डचं वितरण कराड यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आज नांदेड शहरात अण्णाभाऊ साठे चौकात नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आयुष्यमान भारत कार्डसाठी नागरिकांनी याठिकाणी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली. २४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा नांदेड महापालिका हद्दीत उद्या समारोप होणार आहे.
****
राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेणार आहेत. या प्रचाराचा पहिला टप्पा सहा जानेवारी रोजी यवतमाळ इथून सुरू होणार असून, ११ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर इथल्या सभेनं पहिल्या टप्प्याची सांगता होईल. दुसरा टप्पा २५ जानेवारी पासून शिर्डी इथून सुरु होणार असून, ३० जानेवारीला हातकणंगले इथं या मेळाव्याचा समारोप होणार आहे.
****
पुणे जिल्ह्यात कोरेगाव भिमा इथं एक जानेवारीला ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखो नागरिक येतात. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी चोख नियोजन केलं आहे. कोरेगाव भीमा बंदोबस्तासाठी जवळपास तीन हजार २०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या अभिवादन कार्यक्रमासाठी महावितरणकडून वीजपुरवठा आणि वीज सुरक्षेकरता विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
****
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या वतीनं काल मुंबईत एकदिवसीय जागरुकता कार्यशाळा घेण्यात आली. काळानुरुप कायद्यात बदल करत ते अधिक व्यापक करण्यात आले आहेत, मात्र यंत्रणांच्या संवेदनशीलतेबरोबरच समाजाची मानसिकता बदलणंही आवश्यक आहे, असं मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
सांगली जिल्ह्यातल्या खंडेराजुरी इथं जिल्हा परिषद मॉडेल स्कूलचं पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्या हस्ते काल लोकार्पण झालं. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातल्या १७१ आणि दुसऱ्या टप्प्यात १४३ शाळांची निवड करण्यात आली आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूलचा उपक्रम राज्य सरकारनं अंगीकारला असल्याचं मंत्री खाडे यांनी यावेळी सांगितलं.
****
अयोध्या इथल्या राम मंदिर लोकार्पणानिमित्त आयोध्या इथून आलेल्या अक्षता कलशाची धाराशिव शहरातून उद्या ३० तारखेला शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या अक्षता रथयात्रेत नागरीकांनी सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे.
****
जालना मुंबई वंदे भारत रेल्वे उद्यापासून धावणार आहे. काल जालना ते मनमाड मार्गावर या रेल्वेची चाचणी घेण्यात आली. या रेल्वेचं आरक्षण आजपासून सुरू झालं असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
उत्तर भारतातील धुक्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे, यामुळे नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज नांदेडहून १२ तास उशीरा म्हणजेच नियमित वेळेऐवजी रात्री साडे नऊ वाजता निघणार आहे.
****
No comments:
Post a Comment