Regional Marathi Text
Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 December
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
· कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान सखोल समजून घ्या - पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांचं तरुणांना आवाहन.
· मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागू शकतो - राज्याचे
संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांचे संकेत.
· वाळूजच्या आगीच्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री
साहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये मदत घोषित.
आणि
· नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला वणीचं सप्तशृंगी मंदिर आणि शिर्डी इथलं
साईबाबा मंदिर दर्शनासाठी रात्रभर राहणार खुलं.
****
कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान
भविष्यात सभा,
चित्रपटगृहं, शाळा, रुग्णालयं
आणि न्यायालयांमध्ये व्यापक प्रमाणात वापरलं जाईल, फार मोठं परिवर्तन
घडून येणार आहे,
असं निरीक्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नोंदवलं.
आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी आज देशवासीयांशी संवाद
साधला. तरुण पिढीनं रीअल टाइम ट्रान्सलेशनशी संबंधित कृत्रिम बुद्धिमत्ता साधने, अर्थात
एआय टूल्स सखोल समजून घ्यायला हवीत असं आवाहन करताना, जो
देश नावीन्याला महत्त्व देत नाही, त्याचा विकास थांबतो. भारत आता कधीच
थांबणार नाही, असंही ते म्हणाले.
जीवनशैलीशी निगडित आजार ही तरुणांसाठी
चिंतेची बाब आहे. त्यावर मात करण्यासाठी निरोगी राहा, तंदुरुस्त
राहा, असा नव्या वर्षाचा संकल्प मंत्रही पंतप्रधानांनी दिला. फिट इंडियाचं स्वप्न
साकार करण्याच्या दिशेनं नावीन्यपूर्ण आरोग्यसेवा प्रदान करणाऱ्या काही
स्टार्टअप्सचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी
बोलणारे सद्गुरु जग्गी वासुदेव, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, ग्रँडमास्टर
विश्वनाथन आनंद आणि अभिनेता अक्षय कुमार यांचे अनुभवही मन की बात मध्ये शेअर
करण्यात आले.
****
विकसित भारत संकल्प यात्रेमुळे सर्व
स्तरातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत आहे. या यात्रेचं काम इथंच संपत
नसून ही यात्रा पुढच्या पिढ्यांनाही विकासाचा महामार्ग दाखवते, असं
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा
नागनाथ आणि कळमनुरी तालुक्यातल्या सेलसुरा या गावात विकसित भारत संकल्प यात्रा
पोहोचली, त्यावेळी यादव बोलत होते. ते म्हणाले...
योजनाएं जब सौ प्रतिशत जमीनपर पहुंचेगी, तो इसके बाद हमको विकसित
भारत का संकल्प भी साथ के साथ करना चाहिये. आज मै जितने भी लाभार्थियोंसे मिला हुं,
प्रधानमंत्री आवास योजना का पैसा, किसान सम्मान निधी का पैसा, वो आपके अकाऊंट मे, जो
हमारे दिव्यांग भाई है, उनका पैसा उनके अकाऊंट में, ये जो जन धन अकाउंट है, ये देश
के इकानॉमीका सबसे बडे माध्यम बना है. इन सब को देश की आर्थिक ताकत के साथ जोडनें का
काम, ये प्रधानमंत्रीजीने किया है.
यावेळी वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या
१७० लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभांचं वाटप करण्यात आलं. खासदार हेमंत
पाटील, आमदार संतोष बांगर,
आमदार तानाजी मुटकुळे यावेळी उपस्थित होते. दरम्यान, मेरी
कहानी मेरी जुबानी अंतर्गत नागरिकांनी आपल्या लाभाची माहिती दिली...
बाईट – मुंजा कदम आणि शांताबाई
चव्हाण, जि.हिंगोली
नांदेड इथं विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत
महापालिका हद्दीत २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत १३ ठिकाणच्या ५ हजार ७४४
नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. यामध्ये ३ हजार १७३ पुरुष आणि २ हजार
१७१ महिलांचा समावेश आहे. पीएम स्वनिधी अंतर्गत १ हजार ३१५ नागरिकांचे अर्ज भरले
गेले, तर १ हजार ८५५ नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ देण्यात आला. या यात्रेला चांगला
प्रतिसाद मिळाल्याचं नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी
सांगितलं.
****
राज्यातल्या साडेबारा कोटी लोकसंख्येची
माहिती गोळा करायला वेळ लागेल. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एक
वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे संकेत राज्याचे संसदीय कार्य मंत्री
चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. ते सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं बोलत होते.
२०१४ ते २०१९ काळात मी हा प्रश्न जवळून हाताळला होता. त्यावेळी मागासवर्ग आयोगाला
अहवाल द्यायला एक वर्ष लागलं होतं, असं पाटील म्हणाले.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतल्यानं तो अहवाल उच्च
न्यायालयात टिकला. पण पुढच्या सरकारला सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू प्रभावीपणे
मांडता न आल्यानं तिथं टिकू शकला नाही, अशी कबुलीही पाटील यांनी
दिली. मराठा समाज मागास असल्याचा अहवाल आल्याशिवाय सरकारला विशेष अधिवेशन बोलवता
येणार नाही,
असंही ते म्हणाले.
****
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक
वसाहतीत झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री साहाय्यता
निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
दिले आहेत. याशिवाय जखमी कामगारांना तातडीनं शासकीय खर्चानं सर्व वैद्यकीय उपचार
द्यावेत, अशाही सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. दरम्यान, पोलिस
आयुक्त मनोज लोहिया यांनी सकाळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.
पालकमंत्री संदिपान भुमरे,
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही
घटनास्थळी भेट देत,
दुर्घटनेची माहिती घेतली.
****
नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला
भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातल्या वणीच्या श्री सप्तशृंगी
देवीचं मंदिर आणि शिर्डी इथलं साईबाबांचं मंदिर आज दर्शनासाठी रात्रभरही खुलं
ठेवण्यात येणार आहे. स्वामी मेळा मित्र मंडळाच्या वतीनं नाशिकच्या रामकुंडावर
रात्री १२ वाजता सहस्रदीप प्रज्वलन कार्यक्रम होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
महाराष्ट्र शासनाच्या वतीनं देण्यात
येणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य
आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयानं प्रवेशिका मागवल्या आहेत. २०२३ या वर्षात
प्रकाशित झालेल्या पुस्तकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. नवी दिल्लीसह
बृहन्महाराष्ट्रातील मराठी लेखक, तसंच प्रकाशकांना सरफोजीराजे भोसले
बृहन्महाराष्ट्र पुरस्कारासाठी महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी
दिल्ली इथं प्रवेशिका पाठवता येतील, असं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज दुसऱ्या
फुले-शाहू- आंबेडकरी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. प्रसिद्ध कवी फ. मुं. शिंदे
यांच्या हस्ते या संमेलनाचं उदघाटन करण्यात आलं. ज्येष्ठ विचारवंत लक्ष्मण माने या
संमेलनाचे अध्यक्ष आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, कविसंमेलन
आणि प्रकट मुलाखती होणार आहेत.
****
'हे आंबेडकर आमचे नाहीत'
या प्रकाश त्रिभुवन लिखित पुस्तकाचं आज छत्रपती संभाजीनगर
इथं ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्या हस्ते प्रकाशन झालं. डॉ.
बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य प्रभाकर शिरोळे उपस्थित होते. प्रकाशनाच्या
कार्यक्रमानंतर नाट्यवाचन करण्यात आलं.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर
तालुक्यातल्या अणदूर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम
भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी थेट उसाच्या फडात जाऊन उसतोड
कामगारांबरोबर ऐकला.
****
अयोध्येतल्या राम मंदिर
लोकार्पणानिमित्त अयोध्येतून आलेल्या अक्षता कलशाची आज हिंगोली शहरातल्या संकट
मोचन हनुमान मंदिर परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
****
No comments:
Post a Comment