आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
३० डिसेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान सुरू होत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला आजपासून प्रारंभ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या इथून या रेल्वेला दूरदृष्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. जालना इथं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यासह इतर पाच वंदे भारत रेल्वेला देखील यावेळी सुरुवात होईल.
दरम्यान, अयोध्या इथं नूतनीकरण करण्यात आलेल्या अयोध्याधाम जंक्शन रेल्वे स्थानकाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाच्या उद्घाटनासह, १५ हजार ७०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण देखील त्यांच्या हस्ते होणार आहे.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्यसंमेलनाचा मुहूर्तमेढ सोहळा काल सांगली इथं राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झाला. अल्प दरात नाट्य रसिकांना नाटकाचे प्रयोग बघता यावेत यासाठी, राज्यात सौर ऊर्जेवर चालणारी वातानुकूलित अशी ७५ नाट्यगृहं उभी केली जाणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
****
राज्यसरकाने दुष्काळग्रस्त परिमंडळांमध्ये शेती कर्ज वसुलीस स्थगिती आणि कर्ज पुनर्गठन शासनादेश जारी केला आहे. ही शेतकर्यांना खरीखुरी मदत नसल्याची टीका, अखिल भारतीय किसान सभा राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले यांनी केली आहे. सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
****
समृद्धी महामार्गाचा विस्तार आता गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर पर्यंत होणार आहे. नवीन आराखड्यात १४२ किलोमीटर लांबीच्या भंडारा ते गडचिरोली, १९४ किलोमीटर लांबीच्या नागपूर ते चंद्रपूर, १६२ किलोमीटर लांबीच्या नागपूर ते गोंदिया या मार्गांचा विस्तार केला जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
शिर्डी इथं काल आयोध्येहून आलेल्या श्रीराम मंगल अक्षदा कलशाचा पूजन कार्यक्रम श्री साईबाबा संस्थानच्या वतीने पार पडला. कलशाचं पूजन करून कलश समाधी मंदिरात साईभक्तांना दर्शनाकरता ठेवण्यात आला होता.
****
No comments:
Post a Comment